सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील ग्रामदैवत रामेश्वर मंदिर हे कोकणातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्याच्या या भव्य देवालयाची उभारणी १९७९–८० मध्ये करण्यात आलेली आहे. कोकणातील धार्मिक स्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराची माहिती त्यावेळी तिसरीच्या भूगोलाच्या पुस्तकात देण्यात आली होती. बालभारतीच्या या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील काही मोजक्या मंदिरांना स्थान देण्यात आले होते, त्यात या मंदिराचा समावेश होता.
रामेश्वर या नावाबद्दल एक कथा अशी सांगण्यात येते की रावण हा ब्राह्मण होता. श्रीरामाने त्याचा वध केल्यामुळे श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्या पापाचे क्षालन कसे करावे, असे श्रीरामाने ऋषींना विचारले. त्यावेळी ऋषींनी श्रीरामाला शिवलिंगाची स्थापना करून त्याची सीता व लक्ष्मणासह पूजा करण्यास सांगितले. ऋषींच्या सांगण्यानुसार श्रीरामाने समुद्रतिरी सीतने बनवलेल्या वालुकालिंगाची स्थापना केली. रामाने स्थापिलेले शिवलिंग रामेश्वरम् म्हणून ओळखले जाते. यानंतर भारतात अनेक ठिकाणी रामेश्वर शिवलिंगाची स्थापना झाली. रामेश्वर मंदिराच्या स्थापनेच्या वेळी ऋषींनी श्रीरामाला रामेश्वर या नावाचा अर्थ विषद करून सांगण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामाने सांगितले की ‘रामस्य ईश्वरः सः यः रामेश्वरः’ म्हणजे जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. शिवशंकर हा माझा ईश्वर आहे. त्यावेळी शंकराने सांगितले की रामेश्वर या शब्दाचा अर्थ असा नाही, तर तो ‘रामः ईश्वरो यस्य सः रामेश्वरः’ असा आहे. म्हणजे राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. हरि आणि हर हे एकच आहेत, असे या कथेतून सांगण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या उत्तर–पूर्वेस सुमारे चार किमी पसरलेल्या मानगा या डोंगररांगेच्या कुशीत कणकवलीतील भिरवंडे हे गाव वसले आहे. या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील परिसरात ग्रामस्थांनी घनदाट देवराई राखलेली आहे. इतिहासकथेनुसार, येथील भिरवंडेकर सावंत (पटेल) धारपवार यांचे मूळ पुरुष भान सावंत यांनी येथे वसाहत स्थापन केली. या गावामध्ये प्राचीन रामेश्वर मंदिरासह रूई, गांगो, रवळनाथ, होळदेव, विठलाई, मेळेकार ही जागृत देवस्थाने आहेत. या गावात रामेश्वराचे प्राचीन मंदिर होते. १९८० च्या सुमारास त्याचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करताना ग्रामस्थांकडून जुन्या मंदिराचे दोन अवशेष जतन करण्यात आले आहेत. त्यामध्ये जुन्या मंदिरासमोर असणारा दगडी कोरीव दीपस्तंभ आणि मंदिरातील एक कमी उंचीचा सुबक दगडी खांब यांचा समावेश आहे. या खांबाचा आकार खालील बाजूस दंडगोलाकार, त्यावर घटपल्लव या त्याच्यावरील बाजूस घंगाळ्यासारखा आहे. त्यावर कमळाच्या पाकळ्यांची नक्षी आहे. या अवशेषांच्या सौंदर्यावरून मूळ मंदिराच्या सौंदर्याची प्रचिती येते.
रस्त्यापासून काहीसे खालच्या स्तरावर रामेश्वराचे मंदिर आहे. मंदिराभोवती सर्व बाजूने जांभ्या दगडांची तटबंदी आहे. तटबंदीमध्ये असणाऱ्या प्रवेशद्वारावर कोकणी पद्धतीचे कौलारू छत आहे. त्याच्या बाजूला दोन लहान दिंडी दरवाजे आहेत. प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. तेथे मंदिराच्या समोर एका चौथऱ्यावर नव्याने बांधलेली काहीशी शंकूच्या आकाराची दीपमाळ आहे. दीपमाळेसमोर जुना दगडी दीपस्तंभ व त्याच्या बाजूला छोटे तुळशी वृंदावन आहे. दीपमाळेपासून जवळच प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर गजराजाचा भव्य पुतळा व एक कृत्रिम धबधबा आहे.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपास तीन बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा, लांबीला मोठा, प्रशस्त व दुमजली आहे. कोकणी स्थापत्यशैलीचा बाज तेथील बांधकामात दिसतो. सभामंडपाच्या बाह्य भिंती खांब आणि त्यामध्ये कमानदार खिडक्यांच्या आहेत. या खिडक्यांच्या खालच्या बाजूला कक्षासने आहेत. त्यांपासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंना सभामंडपाचे खांब आहेत. त्यावर मध्यभागी छतापर्यंत खुला असा भाग आहे. त्याच्या चारी बाजूने वरच्या मजल्याचा बाल्कनीसारखा भाग आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
अंतराळाचा दरवाजा रुंद आणि लाकडी आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना जय–विजय हे चतुर्भुज गदाधारी द्वारपाल आहेत. जय–विजय आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीत खूप साम्य असते. त्यात फरक एवढाच असतो की विष्णूच्या एका हातात सुदर्शन चक्र असते. रामेश्वर मंदिरात मात्र जय–विजय यांच्या हातात सुदर्शन चक्र दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या उंच मूर्तींच्या बाजूला दोन पायऱ्या आहेत. त्यावर ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या हत्तीच्या दोन छोटेखानी पितळी मूर्ती ठेवलेल्या आहेत. पायऱ्यांसमोर जमिनीवर कासवाची मूर्ती आहे. अंतराळाच्या पुढच्या भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोरीव काम केलेले लाकडी स्तंभ आहेत. या दोन्ही स्तंभाच्या वरच्या बाजूला अनेक पितळी घंटा लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर खाली अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. तिच्या मागच्या बाजूला पितळी पत्र्यावर पाच फण्यांचा शेषनाग कोरलेला आहे. त्याच्या मागे धातूचे मोठे बेलपत्र आहे.
रामेश्वर मंदिरात दरवर्षी रथसप्तमीपासून अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. वर्षातील हा मोठा उत्सव असतो. सात दिवस येथे हरिनामाचा अखंड जयघोष सुरू असतो. या उत्सवासाठी ग्रामस्थ, चाकरमानी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित असतात. या सात दिवसांत मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. या उत्सवासाठी मंदिराची रंगरंगोटी करून मंदिर व परिसरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली जाते. या सप्ताहानिमित्त भिरवंडे गावासह जिल्ह्यातील नामवंत बुवांची भजने सादर होतात. याशिवाय तालुक्यातील विविध शाळांचे चित्ररथ येथे येतात. दिंड्या, गोफनृत्य असे विविध कार्यक्रम होतात. या सप्ताहादरम्यान दररोज रात्री देव रामेश्वराची ढोल–ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते. उत्सवासाठी आलेल्या भाविकांना मंदिर संस्थानातर्फे येथील भक्त निवासात राहण्याची व महाप्रसादाची सोय करण्यात येते.