रामेश्वर महादेव मंदिर

राजूर, ता. मोताळा, जि. बुलडाणा

बुलडाण्यातील राजूर घाटातील निसर्गरम्य परिसरात वसलेले रामेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अजिंठा पर्वतरांगांतून निघालेल्या नळगंगा नदीच्या तीरावर तेराव्या शतकातील हेमांडपंती स्थापत्यशैलीतील या मंदिराचे गर्भगृह जमिनीत बारा फूट खाली आहे. त्यातील शिवलिंग हे जागृत मानले जाते. हा महादेव नवसाला पावणारा आहे. संकटाच्या काळात किंवा दुष्काळात जेव्हा भाविक या मंदिरात येऊन मनोभावे अभिषेक करतात, तेव्हा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होते, असा भाविकांचा विश्वास आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे भरणाऱ्या दोन दिवसीय यात्रेदरम्यान संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव…’च्या जयघोषाने दुमदुमून जातो.

या मंदिराची आख्यायिका अशी की त्रेतायुगात जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले होते, तेव्हा त्यांनी दंडकारण्यात मोठा काळ व्यतीत केला होता. पौराणिक मान्यतेनुसार, श्रीरामांनी नाशिकपासून सुरू झालेल्या आपल्या प्रवासात अनेक ठिकाणी शिवाची स्थापना करून त्यांची पूजा केली होती. राजूर येथील या मंदिरासंदर्भात लोककथा अशी की रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांना ब्रह्महत्येचा दोष लागला होता. रावण हा जरी प्रवृत्तीने राक्षस असला तरी तो ऋषी पुलस्त्यांचा नातू आणि एक परमज्ञानी ब्राह्मण होता. या दोषातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे आणि इतर पवित्र स्थानी पूजा करणे आवश्यक होते. राजूर येथील नळगंगा नदीच्या शांत पात्रात स्नान करून श्रीरामांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि आपली तपस्या पूर्ण केली. म्हणूनच या मंदिराला रामेश्वर असे नाव प्राप्त झाले. हे स्थान ‘रामगमन मार्गा’तील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

मंदिराजवळून वाहणाऱ्या नलगंगा नदीबद्दलची कथा ही राजा नल आणि त्याची पत्नी दमयंती यांच्याशी जोडलेली आहे. महाभारतातील वनपर्वात राजा नलाची कथा येते. असे मानले जाते की जेव्हा राजा नल आपले राज्य द्यूतात हरला आणि त्याला वनवासाला जावे लागले, तेव्हा त्याने आपल्या पत्नीसह या डोंगररांगांमध्ये आश्रय घेतला होता. त्यांच्या वास्तव्यामुळेच या नदीला नलगंगा असे नाव पडले. ही नदी गंगेप्रमाणेच पवित्र मानली जाते.

रामेश्वर महादेवाचे हे मंदिर प्राचीन काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९५० ते १९५५ या कालावधीत खांडवा येथील दिवंगत स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज, बुलडाण्यातील विनायकराव केशवराव सूर्यवंशी, धनजी शिवनाथ शर्मा तसेच राजूर येथील नारायण गंगाराम उदयकार यांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या जीर्णोद्धारानंतर झालेल्या होम-हवन तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत गाडगे महाराज उपस्थित होते, असे सांगण्यात येते. १९६२ मध्ये या मंदिराच्या न्यासाची नोंदणी करण्यात आली.

बुलडाणा-मलकापूर महामार्गापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर राजूर हे गाव आहे. गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर शांत व प्रसन्न वातावरणात हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या परिसरात वटवृक्षासह विविध प्रकारचे वृक्ष आहेत. मंदिरासमोर फरसबंदी केलेले मोठे प्रांगण आहे. प्रांगणात डाव्या बाजूस छोटे शिवमंदिर आहे. या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आणि त्रिशूळ आहे. नजीकच असलेल्या तुळशीवृंदावनाजवळ काही प्राचीन मूर्ती आहेत.

सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात, गर्भगृहासमोरील चौथऱ्यावर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. रांगेच्या व्यवस्थापनासाठी येथे स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. त्यांपैकी डावीकडे असलेल्या चौथऱ्यावरील एका आसनावर स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज यांची प्रतिमा आहे. या चौथऱ्यांच्या मधून गर्भगृहात उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभशाखांवर कोरीव काम आहे आणि त्यांत खालील बाजूस द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या समोरील भिंतीवर शिवशंकरांची मोठी प्रतिमा आहे. येथून सुमारे सोळा पायऱ्या उतरून बारा फूट खोल असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. रांगेच्या व्यवस्थापनासाठी या पायरी मार्गाच्या मध्यभागी स्टीलचे रेलिंग लावलेले आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये रामेश्वर महादेवाचे लंबगोलाकार शिवलिंग आहे. त्यावर मोठ्या फणाधारी नागाने छत्र धरले आहे. शाळुंकेवर पितळी पत्र्याचे आवरण आहे. छताला टांगलेल्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. शिवपिंडीच्या मागील बाजूस असलेल्या चौथऱ्यावरील मोठ्या देवकोष्टकात गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे पार्वतीमातेची तर उजवीकडे शेगावच्या गजानन महाराजांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर मोठे घुमटाकार शिखर आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे.

या मंदिरात वर्षभर विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. रामेश्वर महादेवाच्या जागृत शिवलिंगाच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेपोटी असंख्य भाविक येथे येतात. महाशिवरात्री आणि श्रावण मास हे येथील मोठे उत्सव आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे अलोट गर्दी उसळते. बुलडाणा जिल्ह्यासह शेजारी असलेल्या जळगाव आणि अकोला जिल्ह्यांतूनही भाविक त्यावेळी दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला येथे दोन दिवसांची यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागतात. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे गर्दी असते. यावेळी अनेक भाविक नलगंगा नदीतून कावडीने पाणी आणून या महादेवाला अभिषेक करतात. याशिवाय या मंदिराच्या आधुनिकीकरणात ज्यांनी योगदान दिले, त्या स्वामी आत्मानंद सरस्वती महाराजांच्या जयंतीदिनी (३ सप्टेंबर) मंदिरात विशेष श्रद्धांजली सभा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • मोताळा येथून १२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ११ किमी अंतरावर
  • बुलडाणा व मोताळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीच्या सुविधा आहेत

रामेश्वर महादेव मंदिर

राजुर, ताल. मोटाला, जिला. बुलढाणा

Back To Home