रामेश्वर महादेव मंदिर

एडगाव, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


कोकणच्या भूमीत प्राचीन काळापासून शिवशंकराच्या विविध रूपांची, विविध नावांनी पूजा केली जाते. वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथे शंकराचे रामेश्वर या स्वरूपातील मंदिर पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील रावराणे कुटुंबांचे कुलदैवत असलेले रामेश्वर महादेव एडगावचे ग्रामदैवत आहे, तर वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी ते एक आहे. हे मंदिर खास कोकणातील मंदिरशैलीत बांधलेले उतरत्या छपराचे आहे.

शिवशंकराच्या रामेश्वर या स्वरूपाबद्दल विविध पौराणिक आख्यायिका आहेत. तुलसी रामायणानुसार रावण हा ब्राह्मण होता. श्रीरामाने त्याचा वध केल्यामुळे श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्या पापाचे क्षालन कसे करावे असे श्रीरामाने ऋषींना विचारले. त्यावेळी ऋषींनी श्रीरामाला शिवलिंगाची स्थापना करून त्याची सीता लक्ष्मणासह पूजा करण्यास सांगितले. ऋषींच्या सांगण्यानुसार श्रीरामाने समुद्रतिरी शिवलिंगाची स्थापना करण्याचे ठरवले. मात्र आपण सर्वांत मोठ्या शिवलिंगाची पूजा करावी, असे श्रीरामाला वाटले. तेव्हा त्यांनी हनुमानास हिमालयातून शिवलिंग आणण्यासाठी पाठवले; परंतु पूजेचा मुहूर्त जवळ आला तरी हनुमान शिवलिंग घेऊन आल्याने सीतने बनवलेल्या वालुकालिंगाची श्रीरामाने स्थापना केली. ते लिंग तमिळनाडूतील रामेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात आहे. हनुमान जेव्हा दिव्य शिवलिंग घेऊन आला, तेव्हा हे वालुकालिंग पाहून तो नाराज झाला. त्यावेळी या वालुकालिंगाजवळच दिव्य लिंग स्थापन करण्यास श्रीरामाने हनुमानास सांगितले दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वर दर्शनाचे यात्रेकरूंना फळ मिळणार नाही, असे हनुमंताला आश्वासन दिले. रामाने स्थापिलेले शिवलिंग रामेश्वरम् किंवा रामनाथ हनुमानाने स्थापलेले ते हनुमंदीश्वर शिवलिंग म्हणून ओळखले जाते. यानंतर भारतात अनेक ठिकाणी रामेश्वर शिवलिंगाची स्थापना झाली.

एडगाव येथील रामेश्वर मंदिरातील शिवलिंग हे उर्ध्वपाषाण लिंग स्वरूपातील आहे. या मंदिरास विस्तीर्ण प्रांगण आहे त्यास चारी बाजूंनी आवारभिंत घालण्यात आलेली आहे. येथे प्रवेश करताच समोरच एका दगडी चौथऱ्यावर पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. त्याच्या बाजूस उंच चौथऱ्यावर सात आसरांचे छोटे देऊळ आहे. आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या जलदेवता असतात त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना साती आसरा म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा मकरी अशी त्यांची नावे होत. या सात आसरांच्या मंदिराच्या बाजूस सटवाईचे मंदिर आहे. त्यास रावांची सटवाई असेही संबोधतात. दीपस्तंभाच्या समोर छत्रीसारखे लहानसे मंदिर आहे, त्यात एक शिळा ठेवलेली आहे. हे गावातील गुरव समाजाचे देऊळ मानले जाते.

दीपस्तंभापासून पुढे काही अंतरावर उंच जागतीवर रामेश्वर महादेव मंदिर बांधलेले आहे. मंदिराचा सभामंडप दोन पातळ्यांवर बांधलेला आहे. तीन पायऱ्या चढून सभामंडपातील खालच्या भागात प्रवेश होतो. हा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. येथील भिंतींमध्ये भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. पुढे काही अंतरावर दोन पायऱ्या चढून सभामंडपाची वरची पातळी आहे. बाहेरच्या बाजूस मधेमधे मोठ्या खिडक्या असलेली भिंत आणि त्यापासून काही जागा सोडून दोन्ही बाजूंस उभारलेले चार अष्टकोनी खांब अशी या सभामंडपाची रचना आहे. वर लाकडी तुळयांवर उतरते कौलारू छप्पर आहे. येथे नंदीची मूर्ती आहे. बाजूलाच ग्रामदेवतांच्या काठ्या मांडलेल्या आहेत. त्यात रामेश्वर रवळनाथाचा हात, ब्राह्मणदेवाचा कलश, पावणादेवीचा मुखवटा, अश्वारूढ नवलादेवी, गांगो देव आणि वाघावर असलेली इटलादेवी या काठ्या आहेत. पालखीच्या वेळी या काठ्यांना साड्या नेसवल्या जातात. समोरील गाभाऱ्याच्या दर्शनीभिंतीस लोखंडी सळया लावलेल्या आहेत. या भिंतीलगत गणेशाची दगडी मूर्ती आहे. आत जमिनीवर छोट्याशा चौथऱ्यावर उर्ध्वपाषाण स्वरूपाचे शिवलिंग आहे. त्याच्या बाजूला दोन लोकदेवतांच्या दगडी मूर्तीही आहेत. या गर्भगृहाला सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे.

या मंदिरात महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, देवदीपावली, शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. महाशिवरात्रीला येथून ग्रामदेवतांच्या काठ्यांची मूळ पालखीसमवेत वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. या सर्व उत्सवांना पंचक्रोशीतील नागरिक, तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

एडगाव हे पोलीस निरीक्षक आणि मुंबई पोलीस दलातीलएन्काऊंटर स्पेशालिस्टविजय साळसकर यांचे गाव. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यात ते शहीद झाले. अजमल कसाब याने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. मृत्यूपूर्वी साळसकर हे मुंबईतील खंडणीविरोधी सेलचे प्रमुख होते. त्यांची देशभक्ती आणि शौर्याचा आदर करून भारत सरकारकडून त्यांना २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रामेश्वर मंदिरापासून जवळच एडगावमध्ये शहीद साळसकर स्मारकही बांधण्यात आलेले आहे.

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून किमी, तर खारेपाटणपासून २३ किमी अंतरावर
  • वैभववाडी, खारेपाटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home