वैभववाडी तालुक्यातील कुसूर हे चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेले असे निसर्गसमृद्ध गाव आहे. या गावात बारा वाड्या आहेत. गगनगडाच्या पायथ्याशी उगम पावलेली गडनदी या गावाच्या मध्यातून वाहते. येथील ग्रामदैवत स्वयंभू रामेश्वर दारूबाईचे मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात साजरा होणारा दोन दिवसीय ‘वाडिया जत्रोत्सव’ हा येथील प्रसिद्ध उत्सव आहे. ‘माहेरवाशिणींची यात्रा’ म्हणून ही यात्रा कोकणात प्रसिद्ध आहे. या उत्सवासाठी कोकणासह गोव्यातील भाविकही हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.
येथील दारूबाई ही देवता श्री महाकालीचे रूप मानण्यात येते. हिंदू पुराणकथांनुसार काली ही शिवशक्ती पार्वतीचा उग्र अवतार आहे. काल म्हणजे शंकर व त्याची पत्नी ती काली असे सांगण्यात येते. कालीने अनेक दैत्यांचा वध केल्याच्या कथा पुराणांत आहेत. त्यातीलच एका दैत्याचे नाव दारूकासुर असे होते. याबाबतची पौराणिक कथा अशी आहे की दारूक नावाचा एक असुर ब्रह्मास प्रसन्न करून अत्यंत शक्तिशाली झाला होता. या दारूकास असा वर प्राप्त झाला होता की त्यास कोणताही देव, यक्ष, गंधर्व, पुरुष यांपासून मृत्यू येणार नाही. त्याला केवळ स्त्रीच मारू शकेल. यामुळे उन्मत्त होऊन त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. तेव्हा सर्व देवता शंकरास शरण आल्या. शंकराने आपल्या व पार्वतीच्या अंशातून कालीमातेस जन्म दिला. तिच्या केवळ हुंकाराने दारूक दैत्यासह त्याची असुर सेना जळून भस्म झाली. या दारूक राक्षस मारणारी देवी म्हणून कालीमातेचे नाव दारूबाई असे पडले, अशी कथा सांगण्यात येते.
महाराष्ट्रात दारूबाईचे एक मंदिर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वेगरे–निरगुड वाडी परिसरात होते. टेमगर धरणामुळे येथील गावे, वाड्यांचे स्थलांतर झाले असले, तरी नदीपात्रात त्या मंदिराचे दगडी बांधकाम दिसते. राज्यातील दारूबाईचे दुसरे मंदिर कुसूर येथे आहे. तेथे दारूबाई व रामेश्वर महादेव यांची प्रतिष्ठापना एकाच मंदिरात करण्यात आलेली आहे. एकाच सभामंडपात त्यांची समोरासमोर दोन स्वतंत्र गर्भगृहे आहेत.
या मंदिर परिसरात गर्द झाडी असल्यामुळे मंदिराच्या प्रांगणात येईपर्यंत या मंदिराच्या उंच कळसाचेही दर्शन होत नाही. या प्रांगणात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चौथरे असून त्यावर दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभाच्या शेजारी एक तुळशी वृंदावन आहे. येथेच नंदीची दगडी मूर्ती तसेच एका चौथऱ्यावर दगडी पादुका आहेत. दारूबाई मंदिर हे जमिनीपासून काहीसे उंच जोत्यावर असून चार पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या प्रकारातील असून येथील प्रत्येक खांब कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत.
प्रवेशद्वाराजवळून पुढे गेल्यावर डाव्या हाताला शक्ती दारूबाई व उजव्या हाताला देव रामेश्वर यांची गर्भगृहे आहेत. दारूबाईच्या गर्भगृहात एका मोठ्या चौरंगसदृश्य आसनावर दारूबाईची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. उठावशिल्प प्रकारातील या मूर्तीच्या एका हातात खड्ग असून देवीने त्रिशूलही धारण केलेले आहे. या मूर्तीच्या मागे पितळी पत्र्याने मढविलेला मखर आहे. त्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. मखराच्या वरच्या बाजूला तीन कळस आहेत. दारूबाईच्या मूर्तीच्या बाजूलाच एक गोलाकार दगडाचा तांदळा आहे. त्यासही हळदी–कुंकू वाहून पुजले जाते.
रामेश्वराच्या गर्भगृहासमोर एका लहानशा चौथऱ्यावर नंदीची मूर्ती असून गर्भगृहाच्या आत मध्यभागी रामेश्वराची पिंडी आहे. या पिंडीच्या मध्यभागी दोन पितळी नाग आहेत. हे मंदिर कौलारू असले तरी दारूबाईच्या गर्भगृहावर लहान शिखर व रामेश्वराच्या गर्भगृहावर मोठे व वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीचे शिखर आहे. या मंदिराच्या शेजारी म्हणजेच शक्ती दारूबाई गर्भगृहाच्या मागील बाजूस एक विहीर व एक पाण्याचे दगडात बांधलेले एक कुंड आहे. मंदिराच्या प्रांगणातून दहा पायऱ्या उतरून या कुंडाजवळ जाता येते. असे सांगितले जाते की या कुंडात बाराही महिने पाणी असते.
या मंदिरातील माहेरवाशिणींची (या गावातील स्त्रिया ज्या लग्न करून दुसऱ्या गावी गेल्या आहेत) यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दर कार्तिक वद्य चतुर्दशीस या दोन दिवसीय यात्रोत्सवास प्रारंभ होतो. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या उत्सवास सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास मंदिरात पूजा–अर्चा, देवीची ओटी भरणे, देवतांना नैवेद्य, वाडी दाखवणे आदी कार्यक्रम होतात. ग्रामस्थांकडून गोळा केलेल्या शिदोरीतून देव–देवीला महानैवेद्य म्हणजेच वाड्या दाखवतात. यामुळे या यात्रेस ‘वाडिया जत्रोत्सव’ असेही म्हणतात. दुसऱ्या दिवशी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. यावेळी माहेरवाशिणी, लेकी–सुना–माता दारूबाईची ओटी भरतात. तसेच देवाला नवस बोलले जातात. माहेरवाशिणींच्या हाकेला धावून जाणारी आई, अशी ख्याती असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने माहेरवाशिणी, लेकी–सुना देवीची खणा नारळाने सहकुटुंब ओटी भरण्यासाठी आवर्जून हजर राहतात. गावात वाडिया जत्रोत्सव, शिमगोत्सव, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा असे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.