रामलिंग बेट

समर्थस्थापित मारुती मंदिर

बाहे, ता. वाळवा, जि. सांगली

मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या तीरावर झाला. मानवाने नदीच्या काठावर प्रथम शेती केली. अनेक नगरे देवालये नदीतीरावर वसली विकसित झाली. परंतु एखादे मंदिर भर नदीपात्रात शेकडो वर्षांपासून स्थित आहे, असे म्हटल्यास चटकन विश्वास बसणार नाही. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बाहे गावाजवळ कृष्णा नदीच्या पात्रात मधोमध असलेल्या एका बेटावर प्राचीन श्रीरामलिंग मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग प्रत्यक्ष श्रीरामाने स्थापन केले असल्याचे सांगितले जाते. हे देवस्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर चौदाव्या शतकातील असावे, असा अंदाज वर्तविला जातो. या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मारुती मंदिरातील मारुतीची मूर्ती रामदास स्वामींनी शके १५७३ (.. १६५१) मध्ये स्थापित केल्याची नोंद आहे. या स्थानाची आख्यायिका अशी की लंकेहून अयोध्येस परतताना श्रीरामांनी कृष्णाकाठावरील या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले. त्याच वेळी कृष्णेला पूर आला. ते पाणी रोखण्यासाठी हनुमानाने विशाल रूप धारण केले. श्रीरामाच्या मागे उभे राहून त्यांनी आपले बाहू पसरवले. त्यामुळे कृष्णेचे पात्र दोन भागात विभागले जाऊन मध्यभागी बेट तयार झाले. मारुतीने बाहू पसरवल्याने तयार झालेल्या या परिसरास बाहे म्हणून ओळखले जाऊ लागले. हनुमान श्रीरामाच्या मागे उभे राहिले होते. म्हणून येथे मारुतीचे मंदिर राममंदिराच्या मागे असल्याचे सांगितले जाते

या बेटावरील मंदिराकडे जाण्यासाठी नदीच्या पात्रात पूलवजा बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यावरून अथवा नदीपात्रातून चालतच मंदिरापर्यंत यावे लागते. पुढे काही अंतरावर असलेल्या सुमारे पंचवीस पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुमारे सहा फूट उंचीच्या सुरक्षाभिंती आहेत. पायऱ्या, सुरक्षाभिंती प्रवेशद्वाराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे

स्वागतद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टक आत पहारेकरी कक्ष आहेत. हे प्रवेशद्वार १८१४ साली उभारले असल्याची येथे नोंद आहे. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या चहूबाजूने आवारभिंत असलेले फरसबंदी केलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. या आवारभिंतीलगत भाविकांच्या सुविधेसाठी आसने आहेत. उजव्या बाजूला प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या चौथऱ्यावर मंदिर आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर शिवपिंडी नंदी आहे. या चौथऱ्याच्या चारही बाजूंनी लोखंडी स्तंभ त्यावर छत आहे. पुढे तिनही बाजूंनी प्रवेशद्वार असलेला बंदिस्त स्वरूपाचा (गुढमंडप) सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूंचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत प्रत्येक चार स्तंभांच्या मधे छतात घुमट आहेत

पुढे जाळीदार भिंत द्वार असलेले अंतराळ त्यापुढे अरूंद प्रवेशद्वार असलेले गर्भगृह आहे. गर्भगृहात जमिनीवर कासव शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग छताला टांगलेले अभिषेक पात्र आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात श्रीराम, लक्ष्मण, सीता हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर चारही बाजूंनी नक्षीदार कठडा चारही कोनांवर चार षट्कोनी उपशिखरे आहेत. मध्यभागी तीन थरांचे मुख्य शिखर आहे. त्यातील पहिल्या थरात चारही बाजूंना चार देवकोष्टके वरील दोन्ही थरांत उभ्या स्तंभांच्या नक्षी आहेत. शिखरात शीर्षभागी कमळ फुलांची नक्षी असलेले आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे

रामलिंग मंदिराच्या मागे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या मारुतीचे मंदिर आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हे एक स्थान आहे. असे सांगितले जाते की हनुमंताचे दर्शन होईल या अपेक्षेने येथे समर्थ रामदास स्वामी आले होते. त्यांना येथे हनुमंताचे मूर्तीरूपात दर्शन झाले नाही. तेव्हा त्यांनी हनुमंताचा धावा केला. त्याचवेळी मागच्या डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. त्या आवाजाचा अंदाज घेऊन समर्थांनी डोहात उडी मारली आणि तेथील मूर्ती बाहेर काढून तिची या मंदिरात स्थापना केली. याचे वर्णन त्यांनी पुढीलप्रमाणे केले आहे – 

हनुमंत पाहावयालागी आलो

दिसेना सखा थोर विस्मित जालो।

तयाविण देवालये ती उदासे,

जळातूनी बोभाईला दास दासे।।

मारुती मंदिरासमोर कठडा पत्र्याचे छत असलेला सभामंडप आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर अस्पष्ट नक्षी ललाटबिंबस्थानी गणपती आहे. गर्भगृहात मागील भिंतीतील देवकोष्टकात आठ फूट उंचीची मारुतीची उभ्या स्थितीतील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मूर्तीच्या अंगावर वस्त्र अलंकार कोरलेले आहेत. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य मंदिरांतील हनुमानाची मूर्ती हातात द्रोणागिरी वा गदा धारण केलेली असते. तसेच ती मूर्ती एक पाय उंचावलेला अशा स्थितीत असते. येथील मूर्ती मात्र दोन्ही हात अंगाच्या बाजूस खाली मोकळे सोडलेल्या अशा मुद्रेत आहे. हे दोन्ही हात कृष्णेच्या महापुराचे पाणी अडवण्याच्या पवित्र्यात असल्याची भाविकांची धारणा आहे. गर्भगृहाच्या छतात घुमट आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा चारही कोनांवर लघुशिखरे आहेत. मध्यभागी तीन थरांचे अष्टकोनी मुख्य शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात चारही बाजूने कोष्टके आहेत. दुसऱ्या तिसऱ्या थरावर १८ उरूश्रूंगी शिखरे आहेत. तिसऱ्या थरात कमळ फुलांची नक्षी असलेले आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे

या मंदिराच्या बाजूला गणेशाचे मंदिर येथून काही अंतरावर लक्ष्मण मंदिर आहे. रामलिंग मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, दासनवमी, हनुमान जयंती महाशिवरात्री आदी उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. कृष्णा नदीच्या पात्रातील बेटावर असलेले निसर्गसोंदर्य अनुभवण्यासाठी दररोज शेकडो पर्यटकही या मंदिराला भेट देतात

उपयुक्त माहिती

  • वाळवा शहरापासून १७ किमी, तर सांगलीपासून ५२ किमी अंतरावर
  • वाळवा, शिराळा कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home