महाभारत काळात अर्जुनपुत्र बभ्रुवाहन राजाच्या नातवाचे लष्करी तळ असलेल्या राजनापूर (खिनखिनी) येथे राजेश्वर महादेवाचे प्राचीन शिवमंदिर आहे. शिवभक्त राक्षसांनी एका रात्रीत हे मंदिर उभारल्याची आख्यायिका आहे. प्राचीन स्थापत्यशैलीचा वारसा सांगणाऱ्या या मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवर मानवी जीवनशैलीवर आधारीत कोरीव शिल्पे आहेत. खोल भुयारात वसलेले येथील स्वयंभू व जागृत शिवलिंग हे विदर्भातील ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. ३०० वर्षांची परंपरा असलेला, चैत्र शुद्ध द्वादशीच्या मुहुर्तावर पार पडणारा शिव-पार्वतीचा विवाहसोहळा हे येथील मुख्य आकर्षण असते.
हे मंदिर नेमके केव्हा व कोणी उभारले याबाबत संदिग्धता आहे. मात्र नवनाथ ग्रंथ तसेच जैन धर्मांतील काही ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. काही अभ्यासकांच्या मते हेमाडपंती स्थापत्यशैलीचे हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेले असावे. अशी मान्यता आहे की महाभारत काळात राजनापूर हे अर्जुनपुत्र बभ्रुवाहन राजाच्या नातवाचे लष्करी तळ होते. राजेश्वर महादेवावरून या गावाला ‘राजनापूर’ असे नाव पडले, असेही सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात अनेक पुरातन मूर्ती सापडल्या. त्या नागपूर येथील अजब बंगल्यात तसेच पुरातत्त्व विभागाच्या मुंबईतील संग्रहालयात ठेवण्यात आल्या
आहेत. प्राचीन काळापासून या मंदिर परिसरात जैन मुनींचेही वास्तव्य होते. त्यामुळे आजही अनेक जैन मुनींचा येथे मुक्काम असतो. या मंदिराचे कालौघात अनेक जीर्णोधार झाले. १९९९ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर डोंगराळ भागात राजनापूर (खिनखिनी) हे गाव वसलेले आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर नंदीमंडपातील एका चौथऱ्यावर नंदीचे स्थान आहे. मंदिराच्या मुखमंडपात चार नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. मुखमंडपात कक्षासनांची रचना आहे.
यातील पहिले दोन स्तंभ हे या कक्षासनांमध्ये व पुढील दोन स्तंभ हे सभामंडपाच्या भिंतीत आहेत. या स्तंभांच्या दर्शनी बाजूला भारवाहक यक्षशिल्पे आहेत. मुखमंडपाच्या वर असलेल्या देवकोष्टकात शिवशंकराची प्रतिमा आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेल्या प्रत्येकी सहा द्वारशाखा आहेत. यातील पहिल्या स्तंभशाखा सोडल्यास उर्वरित शाखांवर खालच्या बाजूला द्वारपाल व विविध शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या मंडोवरावर किर्तीशिल्प, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व उत्तरांगावर सुंदर नक्षीकाम आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील शिल्पांकित स्तंभ हा येथील अनमोल ठेवा समजला जातो. या स्तंभांवर मानवी जीवनशैलीवर आधारित शेकडो शिल्पे व दशावतार कोरलेले आहेत. प्रत्येक स्तंभाच्या वरील बाजूला चार भारवाहक यक्षशिल्पे आहेत. या सभामंडपात एकसमान आकाराच्या ११ शिवपिंडी आहेत. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये तांडवनृत्य करणारी शिवमूर्ती, श्रीविष्णूच्या तसेच सीतामातेच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींसह देव-देवतांच्या प्राचीन मूर्ती जतन करून ठेवलेल्या आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या द्वारशाखांवरही सभामंडपाच्या द्वारशाखांप्रमाणेच कोरीवकाम व द्वारपालशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाचे स्थान आहे. सभामंडपापासून सुमारे ३ फूट खाली येथील गर्भगृह आहे. प्रवेशद्वारापासून चार पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी राजेश्वर महादेवाची प्राचीन पिंडी आहे. या पिंडीवर शंकर महादेवाचा पितळी मुखवटा ठेवलेला असतो. वरच्या बाजूस असलेल्या पंचधातूच्या गलंतिकेतून या पिंडीवर अभिषेक होत असतो. असे सांगितले जाते की या पिंडीखाली असलेल्या विहिरीतून उमा नदीच्या पात्रात जाणारा भुयारी मार्ग होता. या शिवलिंगाला दोन्ही बाजूंनी छिद्रे असून त्यात नाणी टाकल्यास पाण्याचा आवाज येतो.
मंदिराच्या छतावर बाशिंगी कठडा आणि गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर आमलक व कळस आहेत. मंदिराच्या आवारात गजानन महाराजांची शुभ्र संगमरवरी मूर्ती असलेले लहान मंदिर आहे.
मंदिर परिसरात एक पायविहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
महाशिवरात्र हा येथील मोठा उत्सव असतो. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शेकडो भाविक या दिवशी दर्शनासाठी येथे येतात. चैत्र शुद्ध द्वादशीच्या मुहुर्तावर पार पडणारा शिव-पार्वतीचा विवाहसोहळा हे येथील मुख्य आकर्षण आहे. घरचे कार्य असल्याप्रमाणेच सर्व ग्रामस्थ या विवाह सोहळ्यात सहभागी होतात. या विवाहासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात येतात. विवाहासाठी मंदिरासमोर मंडपही बांधण्यात येतो. दरवर्षी गावातील दोन नवीन कुटुंबांना वर-वधूच्या आई-वडिलांचा मान दिला जातो. लग्नासाठीची वऱ्हाडीमंडळींची धावपळ, वरपक्षाच्या सरबराईसाठी वधू पक्षाची लगबगही पाहायला मिळते. विवाहसोहळ्याच्या दिवशी रितीरिवाजाप्रमाणे सकाळी घाटीचा तसेच देवकुंडीचा कार्यक्रम होतो. दुपारी शिवलिंगावर अभिषेक होतो. नंतर गावातून वाजंत्रींच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत गावातील लहानथोर मंडळी सहभागी होतात. यावेळी हातात फलक धरून ग्रामस्थ पर्यावरण संरक्षण, हुंडाबंदीसारखे सामाजिक संदेश देतात. ही मिरवणूक मंदिरात आल्यावर व्याहीभेटीचा कार्यक्रम होतो. सायंकाळी विवाहसोहळा पार पडतो. तत्पूर्वी शिवलिंगावर फेटा बांधण्यात येतो. तसेच पार्वतीमातेच्या मुखवट्याला वधूप्रमाणे सजविले जाते. वधू-वरांमध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लागल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी वऱ्हाडींना तुळशीचे रोपही भेट म्हणून दिले जाते. हा विवाहसोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थही येथे आवर्जून येतात. या मंदिरात रामनवमी, गजानन महाराज प्रगटदिन, कृष्ण जन्माष्टमी, तुकाराम बीज, जगन्नाथ महाराज पुण्यतीथीनिमित्तही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.