ब्रह्मज्ञानापेक्षा भगवद्भक्ती श्रेष्ठ असून, सर्वांना सहजसुलभ असलेल्या भक्तीमार्गाने परमेश्वराची प्राप्ती करता येईल असे सांगून हरिनामाचे माहात्म्य प्रस्थापित करणारे बंगालमधील लोकोत्तर वैष्णव संत म्हणजे चैतन्य महाप्रभू. त्यांनी सांगितलेल्या गौडिय वैष्णव तत्त्वविचारांवर चालणारी आणि जगभरात कृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ (इस्कॉन) या संस्थेतर्फे जगभरात अनेक ठिकाणी सुंदर आणि भव्य कृष्णमंदिरे उभारण्यात आली आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील आणि वैदिक धर्मातील तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे कार्य या मंदिरांतर्फे चालते. मिरा रोड येथील राधा गिरीधारी मंदिर हे त्यातीलच एक मंदिर होय.
ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद हे इस्कॉनचे संस्थापक आहेत. श्रील प्रभूपाद या नावानेही ते ओळखले जातात. स्वामींचा जन्म १ सप्टेंबर १८९६ रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव अभयचरण डे. त्यांचे वडील गौरमोहन डे व आई रजनी हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्याकडून स्वामींवर लहानपणापासूनच कृष्णभक्तीचे संस्कार झाले. कोलकात्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. इंग्रजी, संस्कृत आणि विविध विषयांवर त्यांनी तेथे प्रभुत्व मिळवले. १९२२ मध्ये प्रभूपाद यांची भेट भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर या श्री गौडिय वैष्णव परंपरेतील महान संताशी झाली.
१९३३ मध्ये प्रभूपाद यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्याकडून औपचारिक दीक्षा घेतली आणि ते वैष्णव परंपरेचे प्रचारक बनले. आपला संसार चालवण्यासाठी काही काळ त्यांनी औषध निर्मितीचा व्यवसाय केला; परंतु १९५० नंतर त्यांनी संसारिक जीवनातून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ कृष्णभक्ती आणि आध्यात्मिक प्रचाराला वाहून घेतले. १९५९ मध्ये त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. या आश्रमात त्यांनी ए. सी. भक्तिवेदांत स्वामी हे नाव धारण केले.
प्रभूपाद स्वामी यांनी श्रीकृष्णाची शिकवण इंग्रजी भाषेत न्यावी, तिचे धडे पाश्चात्त्य जगतात पोचवावेत, अशी त्यांचे गुरू भक्तिसिद्धांत सरस्वती यांची इच्छा होती. त्यानुसार स्वामी प्रभूपाद यांनी ‘भगवद्गीता ॲज इट इज’ हा भाष्यग्रंथ लिहिला. श्रीमद्भागवतम् आणि इतर वैष्णव ग्रंथांचे भाषांतरही त्यांनी केले. १९६५ मध्ये, वयाच्या ६९ व्या वर्षी, अनेक अडचणींवर, प्रवासादरम्यान दोनदा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांवर मात करून स्वामी प्रभूपाद अमेरिकेला गेले. त्यांच्या संकल्पनेतून १९६६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉनची स्थापना झाली. संपूर्ण जगात भगवद्गीता आणि वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे या मुख्य उद्देशाने ही संस्था प्रभूपाद यांनी उभारली. ‘हरे कृष्ण महामंत्र’ त्यांनी लोकांना शिकवला आणि त्यावर आधारित भक्ती आंदोलन सुरू केले. स्वामी प्रभूपाद यांनी ७० हून अधिक ग्रंथ लिहिले असून, त्यात भगवद्गीता, श्रीमद्भागवतम यांवरील भाष्य आणि चैतन्य चरितामृत या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. १४ नोव्हेंबर १९७७ रोजी वृंदावनातील कृष्ण बलराम मंदिरात त्यांनी देह ठेवला. मात्र आजही त्यांच्या कार्याचा वारसा इस्कॉनच्या माध्यमातून चालू आहे.
आज जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ८५० हून अधिक इस्कॉन मंदिरे स्थित आहेत. बृहन्मुंबई परिसरात जुहू येथील सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिराप्रमाणेच, गिरगाव, ठाण्यातील बाळकूम, नवी मुंबईतील खारघर, चारकोप तसेच मिरा-भाईंदरमध्येही राधा गिरीधारी मंदिर आहे. येथे केवळ कृष्णाची पूजा केली जाते, याचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ‘श्रीमद्भगवद्गीते’च्या ‘राज विद्या राज गुह्ययोग’ या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अन्य देव-देवतांची पूजा करणे हे अज्ञानपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हा श्लोक असा आहे – ‘येsप्यन्यदेवा भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः। तेsपि मामेव कोन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्।।२३।।’ याचा अर्थ असा, की ‘हे कुंतीपुत्रा, जे मनुष्य श्रद्धापूर्वक भक्तिभावाने अन्य देवी-देवतांची पूजा करतात, ते निश्चित रूपाने माझीच पूजा करीत असतात; परंतु त्यांची ती पूजा अज्ञानतापूर्ण असते. माझ्या प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या विधीहून ती वेगळी व त्रुटीपूर्ण असते.’ याच अध्यायात पुढे असे म्हटले आहे, की ‘यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः। भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मग्याजिनोsपि माम्।।२५।।’ म्हणजे ‘जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना देवता प्राप्त होतात. जे आपल्या पूर्वजांची पूजा करतात त्यांना पूर्वज प्राप्त होतात. जे जीवित मनुष्यांची पूजा करतात ते त्या मनुष्याच्या कुळास प्राप्त करतात, परंतु जो मनुष्य माझी (म्हणजे श्रीकृष्णाची) पूजा करतो तो मलाच प्राप्त होतो.’ गीतेमधील या शिकवणीनुसार मिरा रोड येथील या मंदिरातही राधा गिरीधारीचीच पूजा केली जाते.
येथील इस्कॉन मंदिर पूर्वी भाईंदर येथे स्थित होते. १९९६ मध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर ते मिरा रोड येथील सध्याच्या जागेत स्थापित करण्यात आले. तेव्हापासून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. २०१५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या वर्षी २६ व २७ सप्टेंबर रोजी येथे समारंभपूर्वक कृष्णमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मोठ्या धामधुमीत व धार्मिक वातावरणात झालेल्या या समारंभास राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते.
आधुनिक बांधकाम तंत्रे व आध्यात्मिक तत्त्वे यांचा सुरेख संगम असलेले हे मंदिर पूर्णतः संगमरवरात बांधलेले आहे. आग्र्याचा ताजमहाल, मथुरेतील कृष्णमंदिर, अयोध्येतील राम मंदिर, वैष्णोदेवी मंदिर तसेच अक्षरधाम व अन्य इस्कॉन मंदिरांसाठी वापरण्यात आलेला राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील मकराणा येथील दर्जेदार संगमरवर यासाठी वापरण्यात आला आहे.
प्रशस्त प्रांगणात वसलेल्या या मंदिरास उंच आवारभिंत आहे. मंदिराची प्रवेशकमान राजस्थानी-गुर्जर शैलीतील छत्र्यांनी मढवलेली आहे. समोरच मंदिराची भव्य आणि सुंदर अशी दुमजली वास्तू आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. दुसऱ्या मजल्यावर मुख्य मंदिर आहे. वर जाण्यासाठी मंदिराच्या मुखमंडपाच्या दोन्ही बाजूंनी प्रशस्त पायऱ्यांचा जिना आहे. जिन्याचे कठडे मयूरशिल्पांनी सजवलेले असून, मुखमंडपाच्या चौकोनी खांबांवर तसेच छतावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. या खांबांच्या मध्ये मकरतोरणे आहेत.
सभामंडपाच्या दर्शनी भिंतीस जाळीदार गवाक्षे आहेत. मध्ये रुंद व उंच असे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपालांच्या काळ्या व सोनेरी रंगातील मोठ्या मूर्ती आहेत. या चतुर्भुज मूर्तीच्या दोन हातांत चक्र, एका हातात गदा व एका हातात पुष्प धारण केलेले आहे. मुखमंडपातून आठ पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सर्वत्र स्वच्छ चकचकीत संगमरवरी फरशा, भिंतींवर विष्णूचे विविध अवतार, तसेच चैतन्य प्रभू यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग यांनी सुशोभित असा हा सभामंडप आहे. छतावर मध्यभागी लावलेले भव्य असे काचेचे झुंबर सभामंडपाच्या शोभेत भरच घालते.
मंदिरास एक मुख्य आणि दोन उप गर्भगृहे आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या वरच्या बाजूस सुंदर मयूर प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या मुख्य गर्भगृहात उंच वेदीवरील सुवर्णरंगी मखरात राधा-गिरीधारी यांच्या मूर्ती आहेत. त्या शेजारी दोन्ही बाजूंस गोपिकांच्या मूर्ती आहेत. येथेच खालच्या बाजूस राधा-गिरीधारीच्या मूर्तींची लहान प्रतिकृतीही आहे व त्याखाली कृष्णार्जुनाची तसेच, गौडिय वैष्णव परंपरेतील संतमहात्म्यांच्या तसबिरी आहेत.
डावीकडील गर्भगृहामध्ये संगमरवरी पाषाणात कोरलेल्या कमलपुष्पांच्या वेदीमध्ये राधा-कृष्ण नृत्यमुद्रेत आहेत. तेथेच स्वामी श्रील प्रभूपाद तसेच त्यांचे गुरू भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या मूर्तीही आहेत. उजवीकडील गर्भगृहात सुभद्रा, बलराम यांच्यासह कृष्ण भगवान आहेत. या मखरातील मूर्ती या जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ मंदिरांतील सुभद्रा-बलराम-कृष्ण मूर्तींच्या प्रतिकृती आहेत. गर्भगृहांतील या पाना-फुलांनी, सुवर्णस्तंभ आणि नक्षीदार कमानींनी सजवलेल्या आकर्षक मखरांमध्ये श्रील प्रभूपाद, तसेच कृष्णाच्या विविध मुद्रेतील छोट्या मूर्तीही ठेवलेल्या आहेत.
या मंदिराच्या परिसरात इस्कॉनच्या कार्यालयाची इमारत आहे. त्यात पूजासाहित्य, ग्रंथ, तसेच प्रसादाच्या विक्रीची दालने आहेत. येथील मोठ्या मंडपामध्ये भाविकांकरीता विश्रांतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रथयात्रा हा इस्कॉन मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव असतो. असे सांगितले जाते की श्रील प्रभूपाद हे लहान होते, तेव्हापासून त्यांना रथयात्रेचे आकर्षण होते. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी कोलकात्यात पुरीच्या जगन्नाथाची प्रतिरथयात्रा काढली होती. त्याकरीता त्यांनी त्यांच्या पित्याला विनवून एक छोटासा रथ आणला होता. यानंतर अनेक दशकांनी ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा तेथेही त्यांनी रथयात्रा उत्सव सुरू केला. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे ९ जुलै १९६७ रोजी पहिली रथयात्रा निघाली होती. लंडनमध्ये १३ जुलै १९७२ मध्ये दिलेल्या एका व्याख्यानात प्रभूपाद यांनी या रथयात्रेचे महत्त्व विषद केले होते. त्यांनी म्हटले होते, की ‘रथे च वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे रथावर स्वार असलेल्या भगवानाच्या दर्शनाने मनु्ष्याचे जन्म-मृत्यूचे चक्र थांबण्याच्या दिशेने पुढे जाते.’ जगन्नाथ पुरी येथील मंदिरात आषाढ शुक्ल द्वितीयेस रथयात्रा काढली जाते. येथील इस्कॉन मंदिरातर्फेही त्यावेळी भव्य रथयात्रा काढली जाते. या वेळी फुलांनी रथ सजवला जातो. शंख, मृदंग, ढोल, झांज यांच्या तालावर, हरे कृष्ण-हरे रामच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही रथयात्रा काढली जाते. दररोज सकाळी ४.३० ते १ व सायंकाळी ४.३० ते ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.