
कोल्हापूर हे मूळ प्रकृती आदिमाया महालक्ष्मी–अंबाबाईचे स्थान. साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्ण पीठ आहे. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या आणि काशीहून ‘यवाधिक’ म्हणजे किंचित अधिक असलेल्या या ‘दक्षिण काशी’मध्ये देवीची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातीलच एक मंदिर म्हणजे येथील शिवाजी पेठेतील प्रत्यंगिरा देवी मंदिर. या देवीला फिरंगाई देवी असेही म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की ही देवी रोगहारिणी आणि मानसिक क्लेश दूर करणारी आहे. त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनास येणारे अनेक भाविक प्रत्यंगिरा देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात.
‘नारदीय ब्रह्मांड पुराणा’मध्ये या देवीच्या उत्पत्तीची कथा दिली आहे. ती अशी की एक पतित माणूस पश्चात्तापाने दग्ध झाला आणि सुमार्गाकडे वळून चांगले आयुष्य घालवावे या हेतूने मार्गदर्शनासाठी अंगिरस ऋषींकडे गेला. त्यावेळी ऋषी एका मंदिरात समाधी लावून बसलेले होते. बराच वेळ झाला तरी ऋषींची समाधी उतरत नव्हती. अखेर आपल्या आगमनाची वर्दी त्यांना द्यावी या हेतूने त्याने मंदिरातील घंटा जोरात वाजवली. त्याबरोबर ऋषींच्या समाधीचा भंग झाला. त्यांनी डोळे उघडताच समोर तो मनुष्य दिसला. त्यानेच समाधीभंग केल्याचे जाणून अंगिरस ऋषींनी त्याला ‘तू काळा पाषाण होशील’ असा शाप दिला. त्या पतित मनुष्याने खूप गयावया केली. अखेर दया येऊन ऋषींनी त्याला उःशाप दिला की कल्पान्ती तुझ्या स्वरूपात बदल होईल. तुझ्या देहरचनेत फरक पडेल आणि स्त्रीरूपाने तुझी देवता म्हणून पूजा केली जाईल. तीच ही प्रत्यांगिरी देवी.
अंगिरस ऋषींच्या कृतीने ती उत्पन्न झाली म्हणून तिला प्रति अंगिरा म्हणजे प्रत्यंगिरा असे नाव प्राप्त झाले. ती प्रियांगी, फिरंगाई अशा नावांनीही ओळखली जाते. या देवीचे मूळ स्थान बलुचिस्तानात असल्याचे सांगण्यात येते.
देवीच्या येथील स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की प्राचीन काळी करवीर क्षेत्री कोल्हासुराने मोठे थैमान घातले होते. त्यामुळे सर्व देव हैराण झाले होते. तेव्हा सर्व देवांनी महालक्ष्मी अंबाबाईला साकडे घातले. देवी कोल्हासुर व त्याच्या असुरगणांच्या पाडावासाठी धावून आली. त्यावेळी देवीच्या साह्याला ज्या अनेक देवता आल्या होत्या, त्यात देवी प्रत्यंगिरा हीसुद्धा होती. अमेरिकी संशोधक डब्लू. जे. विल्किन्स यांनी सन १९०० मध्ये लिहिलेल्या ‘हिंदू मायथॉलॉजी – वेदिक अँड पुराणिक’ या संशोधनग्रंथात प्रत्यंगिरा देवीची अशी माहिती आहे की प्रत्यंगिरा हे दुर्गा देवीचेच रूप आहे. परंतु या रूपाची मूर्ती तयार केली जात नाही. या देवीची पूजा शत्रूच्या विनाशाच्या हेतूनेही केली जाते. त्यावेळी देवीचा पुजारी रात्रीच्या वेळी रक्तवर्णी वस्त्र परिधान करतो. देवीस लाल फुले, मद्य आणि मांसाचा नैवेद्य दाखवतो. त्यावेळी प्राण्याच्या मांसाचे तुकडे मद्यात बुडवून जाळले जातात. भाविकांची अशी श्रद्धा असते की इकडे आगीत मांसाचे तुकडे जसेजसे फुलून येतात, त्याच वेळी तिकडे शत्रूच्या शरीरातील मेदही फुलून येऊ लागतो व त्यात त्याचा मृत्यू होता. प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांनी १९६८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘देवीकोशा’च्या दुसऱ्या खंडातही ही माहिती उद्धृत केली आहे. यावरून असे दिसते की प्रत्यंगिरा देवी ही मूळची लोकदेवता आहे व ती यातुविधीशी निगडित होती. प्रत्यंगिरा देवीच्या नावातील प्रत्यंग याचा अर्थ शरीराचा गौण भाग असा होतो. अंग–प्रत्यंग असा शब्द वापरात असतो. त्यातील प्रत्यंगचा हाच अर्थ आहे. ही देवी शरीराच्या काही अवयवांशी, त्यांच्या आजाराशी संबंधित असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. कारण आजही या देवीच्या मंदिरात कानकोबा व खोकलोबा या परिवार देवता आहेत व त्या कानाशी आणि घशाशी संबंधित आहेत. त्याच प्रमाणे देवीच्या येथील मंदिराच्या शेजारी पूर्वी तळे होते. तेथील पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा होती. कालौघात ते तळे नामशेष झाले आहे.
प्रत्यंगिरा अर्थात फिरंगाई देवीचे येथील मूळ मंदिर प्राचीन आहे.
काही वर्षांपूर्वी या प्राचीन मंदिरासमोर मोठा सभामंडप बांधण्यात आला. शिवाजी पेठेतील वर्दळीच्या रस्त्यापासून सहा पायऱ्या चढून या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप प्रशस्त आहे. त्यात प्रवेश केल्यानंतर उजवीकडे मुख्य मंदिर आहे. मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. त्यातील कोरीव स्तंभांवरून त्याच्या प्राचीनत्वाचा अंदाज येतो.
मुखमंडपाच्या समोर पितळेचे कासव आहे. त्याच ठिकाणी काही अंतरावर प्रवेशमार्गात जमिनीवर दोन उठावशिल्पे आहेत. देवीची पूजा करण्यास चाललेल्या स्त्रीभक्तांची ती शिल्पे आहेत. मुखमंडपात दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी ओटे आहेत. मध्यभागी प्रवेशद्वार आहे. त्यास दगडी द्वारचौकट आहे. प्रवेशद्वाराच्या मंडारकावर नक्षीकाम केलेल्या अर्धचंद्रशिला आहेत. पूर्वी या उंबरठ्यावर चांदीची वा सुवर्णाची नाणी ठोकून बसवलेली होती. आता तेथे केवळ त्यांचे छोटे खड्डे दिसतात. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे.
त्याच्या वरच्या बाजूला तीन देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. त्यांवर दिलेला रंग आणि कालौघात झालेली झीज यांमुळे या मूर्ती अस्पष्ट आहेत. येथेच चौकटीच्या वरील दोन्ही बाजूंस अश्वमुखे पाहावयास मिळतात.
या मंदिराचा मूळ सभामंडप हा बंदिस्त आहे. त्यामुळे त्यास गूढमंडप असे म्हणतात. त्यात दोन्ही बाजूंस दोन–दोन पाषाणस्तंभ आहेत. या गूढमंडपात देवीची पालखी ठेवलेली आहे. येथे दगडी कासवही आहे. सभामंडपाचे छतही दगडी आहे. समोरच्या बाजूला एका देवळीत कानोबाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. तेथेच एका ओट्यावर खोकलोबाची मूर्ती आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की खोकलोबास पीठ–मीठ–दहीभाताचा नैवेद्य ठेवल्याने खोकला जातो, तर कानोबाची पूजा करून त्याचे तीर्थ व अंगारा लावल्याने कानाचे आजार नष्ट होतात. मूर्तीशास्त्र अभ्यासकांच्या मते, येथील खोकलोबाची मूर्ती ही मूळची महिषारसूरमर्दिनीची आहे. तर कानोबाची मूर्ती मूळची सरस्वतीची आहे. त्यांना येथे रोगनाशक लोकदेवांचे रूप देण्यात आलेले आहे.
अंतराळाचे प्रवेशद्वार दगडी व त्रिशाखीय आहे. त्याचे द्वारस्तंभ कोरीवकाम केलेले आहेत. वरच्या बाजूस शिखरासारखा आकार व ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर देवीची तांदळा स्वरूपातील वस्त्रालंकारांनी सुशोभित मूर्ती विराजमान आहे. त्यावर डोळे, ओठ व नाक कोरलेले आहे. वरच्या बाजूस चांदीचे छोटे छत्र आहे. या मूर्तीच्या मागे बाजूने पायऱ्यांचा आकार असलेली पाठशिला आहे. त्यावर मध्यभागी काळा रंग दिलेला व नक्षीकाम केलेला अर्धचंद्राकार आहे. वरच्या बाजूस कलशाकार कोरलेला आहे व त्याच्या दोन्ही बाजूंस व्याघ्रशिल्पे आहेत.
या मंदिरात देवीच्या उपासनेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रीघ लागते. त्वचारोगाचा त्रास कमी होत नसल्यास देवीला नऊ मंगळवार पीठ–मिठाचा जोगवा अर्पण करण्याची प्रथा आहे. येथे शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला करवीरनिवासिनी महालक्ष्मी–अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रूपात पूजा बांधली जाते.