पिंपळेश्वर महादेव मंदिर

डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे

अनेक साधूमहंतांचा पदस्पर्श झालेले डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली पाडा (सागाव) येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानी वसलेला शिवशंभू नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाच्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराची महती येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गृहीत धरून राज्य सरकारनेही तीर्थक्षेत्राचादर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे.

कल्याणशिळ मार्गाजवळ सागाव येथे हिरव्यागार वृक्षराजीमध्ये सुमारे सात एकर जागेत हे देवस्थान आहे. स्वामी शिवानंद नावाच्या महापुरुषाने सुमारे १२५ वर्षांपूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. येथे काही काळ तपश्चर्या करणाऱ्या स्वामी शिवानंद यांनी येथून सुमारे पाच किमी अंतरावरील खिडकाळेश्वर मंदिरात समाधी घेतली. पिंपळाच्या झाडाखाली पत्र्याची शेड असलेल्या छोट्या कौलारू मंदिरात पूर्वी पिंपळेश्वराची पिंडी होती. सुमारे २५ वर्षांपूर्वी हे मंदिर विकसित करण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतला. त्यानंतर परिसरात उभारलेल्या नव्या मंदिरात ३१ जानेवारी २००१ रोजी रथसप्तमीच्या दिवशी तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी श्रीसदानंद महाराज यांच्या हस्ते शिवलिंगाची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. २०१२ मध्ये राज्य सरकारने या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला.

एमआयडीसी फेज मध्ये सागाव परिसरात असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी अनेक बाके ठेवण्यात आली आहेत. मंदिर परिसरात शिवपार्वती कुटी, दोन यज्ञ शाळा, तसेच गोशाळा आहेत. येथील यज्ञ शाळांमध्ये पूजाविधी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होतात. होमहवनासाठी माफक शुल्क आकारून साहित्य उपलब्ध करून दिले जाते. मंदिर परिसरात जुनी विहीर आहे. पूर्वी सागाव परिसरातील लोकांना या विहिरीतून पाणीपुरवठा होत असे. मंदिरासमोर उभारलेल्या व्यासपीठावर वर्षभर अनेक कार्यक्रम होतात. १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या व्यासपीठाचे उद्‌घाटन झाले होते. त्याशेजारीच असलेल्या एका मंडपात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, स्वामी शिवानंद, ... सावळाराम महाराज, तसेच श्रीराम सीतेच्या प्रतिमा आहेत. परिसरातील एका सभागृहात विवाहही होतात. मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात वड, पिंपळ, आंबा, फणस, जांभूळ नारळ असे अनेक पुरातन वृक्ष आहेत.

आकर्षक पद्धतीने उभारलेल्या मंदिराच्या तीन बाजूंनी उद्यान विकसित करण्यात आले आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. काही पायऱ्या चढल्यावर लागणाऱ्या दर्शनमंडपातील नंदीच्या पुढे कासवाची मूर्ती आहे. सभामंडपाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर डावीकडे गणपतीची संगमरवरी मूर्ती, तर उजवीकडे श्रीदत्ताची मूर्ती आहे. सभामंडपापासून काहीसे खोलवर असल्याने पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागतेगर्भगृहातील दगडी शिवपिंडी पितळेच्या पत्र्याने मढविलेली आहे. त्यावर फणाधारी नागाने छत्र धऱले आहे. शिवपिंडीच्या मागील भिंतीत असणाऱ्या देवडीत पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून ते कमळाच्या कलाकृतीमध्ये उभे असल्यासारखे भासते.

या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. त्यावेळी हजारो भाविकांची गर्दी असते. श्रावणी सोमवारी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. अनेक विवाहित महिला येथील शिवपिंडीवर पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि शेवटच्या सोमवारी जवाची शिवमूठ वाहतात. श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) तर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. २१ वर्षांपासून ट्रस्टतर्फे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी एसएससी व्याख्यानमालेचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • डोंबिवली रेल्वे स्थानकापासून . किमी अंतरावर
  • पनवेल, कल्याण येथून डोंबिवलीसाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मोहन पाटील, अध्यक्ष, मो. ८६५२३४८५५५, रतन म्हात्रे, उपाध्यक्ष, मो. ९८२०८४१११९
Back To Home