पाटेश्वर मंदिर / वऱ्हाडघर लेणी,

देगाव, ता. सातारा. जि. सातारा

सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या देगाव गावाजवळील डोंगरावर पाटेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर लेणी समूह आहे. गर्द निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या परिसरात पाटेश्वर मंदिरासोबतच वऱ्हाडघर लेणी आहेत. या लेण्यांमध्ये धारालिंग, एकमुखीलिंग, नंदीच्या पाठीवरील शिवलिंग, दुर्मिळ सहस्रलिंगी शिवपिंडी आहेत. याशिवाय येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली अग्निवृष मूर्ती होय. मानव आणि नंदी यांची ही एकत्रित मूर्ती आहे. या मूर्तीकडे समोरून पाहिल्यास दाढी असणारा माणूस दिसतो, तर बाजूने पाहिल्यास नंदी दिसतो.

सातारा शहरापासून जवळ असलेल्या देगावपासून किमी अंतरावर पाटेश्वर महादेवाचे हे स्थान आहे. येथून किमी अंतरापर्यंत डांबरी रस्ता असून त्यानंतर डोंगरवाटेने पायी प्रवास करावा लागतो. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर पाटेश्वरच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या एका मोठ्या तलावापर्यंत पोचता येते. या तलावाला विश्वेश्वर तलाव असे म्हटले जाते. त्यामध्ये विविध रंगांची कमळे आहेत. तलावाला लागून पश्चिमेला एक लेणी असून त्यात अत्यंत वेगळे असे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या पीठावर लिंगाच्या जागेवर बसलेला मान जमिनीवर टेकवलेला नंदी आहे. स्थानिक त्यालामरगळ म्हैसाम्हणतात. नंदीधारी शिवलिंगावरून या स्थानाला पाठेश्वर असे नाव पडले होते. पुढे ते पाटेश्वर असे रूढ झाले.

विश्वेश्वर तलावाच्या पुढे उजव्या बाजूला सुमारे १०० पायऱ्या चढून पाटेश्वर मंदिराच्या आवारात जाता येते. या पायरी मार्गावर दोन्ही बाजूला असणाऱ्या संरक्षक भिंतीमध्ये देवळ्या असून त्यामध्ये विविध मूर्ती आहेत. पाटेश्वर मंदिरासमोर नंदी मंडप असून त्यात वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेली नंदीची मूर्ती आहे. मंदिराशेजारी दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत. मंदिराच्या सभामंडपात वैनायकी (स्त्रीरुपातील गणपतीचे) सरस्वतीचे आणि शेषशायी विष्णू अशी शिल्पे आहेत. गर्भगृहातील शिवपिंडी अखंड पाषाणातील मोठी आहे. मुख्य मंदिराशिवाय या मंदिराच्या आवारात महिषासुरमर्दिनी, भैरव आणि चतुर्मुख भैरव ही मंदिरे आहेत.

पाटेश्वर मंदिर पाहून पुन्हा विश्वेश्वर तलावाजवळ आल्यावर तेथून पूर्वेकडे जाणारी एक वाट दिसते. त्या वाटेने पुढे गेल्यास एक लेणी समूह लागतो. त्यास कोटीलिंग मंदिर परिसर वा वऱ्हाडघर लेणी असे म्हणतात. नावाप्रमाणे एक कोटी लिंग नसले तरी हजारो शिवलिंगे येथे पाहायला मिळतात. येथे दुर्मिळ अशी सहस्रलिंगी शिवपिंडी असून या भव्य शिवपिंडीवर लहानलहान असंख्य शिवपिंडी कोरलेल्या आहेत. याशिवाय तेथील तीनही भिंतींवर असंख्य शिवलिंगांच्या माळा कोरलेल्या आहेत. बोटाच्या आकारापासून ते दोन्ही हातांमध्ये सामावणारी अशा असंख्य शिवपिंडी येथे आहेत. त्यामध्ये सयोनी शिवपिंडी (सर्वसाधारणतः नेहमी पाहतो त्या) अयोनी शिवपिंडी (केवळ दंडगोलाकार उंचवटा) येथे आहेत. यातील काही शिवपिंडी या स्थापित, तर काही दगडांत कोरलेल्या आहेत. या लेण्यांच्या द्वारपट्टीवरही शिवपिंडी कोरण्यात आलेली आहे.

येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली अत्यंत दुर्मिळ समजली जाणारी अग्निवृष मूर्ती. ही मूर्ती समोरून पाहिल्यास मानवी मुख दिसते, तर बाजूने नंदीची मूर्ती दिसते. या दोघांचे वेगळेपण दर्शविण्यासाठी दाढीमध्ये दोन खाचा कोरल्या आहेत. नंदीचे शरीर आणि मानवाचे धड असणारी ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. याशिवाय येथील लेण्यांमध्ये एक मीटर उंचीची आणि साडेतीन मीटर घेर असणारी एक भव्य शिवपिंडी आहे. विष्णूचे दशावतार दर्शविणाऱ्या मूर्तीही येथे आहेत. नवग्रहांच्या पद्‌मासनामध्ये बसलेल्या मूर्ती येथील दोन शिल्पपटांवर कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते, या सर्व मूर्ती शिवपिंडी या १०व्या किंवा ११व्या शतकातील आहेत.

या परिसरात पार्वती, सरस्वती, महिषासुरमर्दिनी, सदाशिव, गणेश, हनुमान, नागदेव, सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. याच परिसरात चामुंडा देवीचेही मंदिर आहे. अशी मान्यता आहे की या ठिकाणी शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्यामुळे हे मंदिर म्हणजे या विवाहासाठी उतरलेल्या वऱ्हाडाचेवहऱ्हाडघरअसून येथे ते सर्व वऱ्हाडी लिंग स्वरूपात आहेत.

पाटेश्वर मंदिरात महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. असे सांगितले जाते की या मंदिराच्या दुरुस्तीसाठी अहिल्याबाई होळकर सरदार अनगळ यांनी आर्थिक मदत केली होती. हजारो भाविकांसह निसर्गप्रेमी, गिरीप्रेमी, इतिहास संशोधक मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांसाठी श्री क्षेत्र पाटेश्वर महत्त्वाचे आणि विशेष स्थान आहे.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून १४ किमी अंतरावर
  • साताऱ्यापासून देगावपर्यंत एसटीची सुविधा
  • देगावपासून किमी अंतर खासगी वाहनाने जाता येते
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home