महादेवाच्या १००८ नावांपैकी ‘पाताळेश्वर’ हे एक नाव आहे. स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांपैकी पाताळ लोकाचा देव तो पाताळेश्वर, असा समज असला तरी गुहेत, जमिनीच्या पोटात किंवा खोलगट भागात असलेल्या शिवपिंडी व तेथील देवालये साधारणपणे ‘पाताळेश्वर’ नावाने ओळखली जातात. देशात अशी पाताळेश्वर नावाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर नांदेड जिल्ह्यातील निळा गावाच्या परिसरात आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो व हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की हे देवस्थान हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम असलेले येथील गर्भगृह चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या सभामंडपाचे काम अलीकडील काळातील आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी या गावातील एक शिवभक्त शेतकरी सध्या असलेल्या मंदिराच्या जागी शिवनामाचा जप करीत बसत असे. काही कोटी नामजप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महादेवाने दर्शन द्यावे, अशी इच्छा त्याने प्रकट केली.
भक्ताच्या विनंतीचा मान राखून महादेव जमिनीतून प्रकट झाले. देवाने ‘वर माग’ असे सांगितले. तेव्हा आपण कायमस्वरूपी येथेच वास करावा, असे भक्ताने देवास सांगितले. त्याच्या इच्छेनुसार महादेव पिंडी स्वरूपात येथे स्थापित झाले. जमिनीतून वर आल्यामुळे महादेवास ‘पाताळेश्वर’ नावाने ओळखले जाऊ लागले.
गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पक्की सडक आहे. मंदिरास तटबंदी व तटबंदीत स्वागत कमान आहे. दोन्ही बाजूला दोन चौकोनी स्तंभ व त्यावर महिरपी कमान, असे तिचे स्वरूप आहे. पुढे मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. प्रांगणात काही प्राचीन महावृक्ष आहेत. प्रांगणात मंदिरासमोर नंदीमंडप आहे. प्रांगणापेक्षा सुमारे तीन फूट उंचावर असलेल्या नंदीमंडपास पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस व नंदीमंडपास चारही बाजूंनी स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत. नंदीमंडपात चारही बाजूला चार चौकोनी स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. नंदीमंडपात मध्यभागी वज्रपीठावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या नंदीसमोर शिवपिंडी आहे. या मंडपाच्या वितानावर कमळदल नक्षीचे चक्र आहे.
नंदीमंडपापासून सुमारे वीस फूट अंतरावर पाताळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी सुमारे सहा फूट रुंद व तीन फूट उंच चौथरा आहे. चौथऱ्याच्या सभोवताली लोखंडी स्तंभ व त्यांवर सिमेंट पत्र्यांचे छत आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी चार पायऱ्या आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी खिडक्या व गवाक्षे आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. यांचा वापर भांडारगृह म्हणून केला जातो.
पुढे प्राचीन हेमाडपंती शैलीचे बांधकाम असलेल्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपा नक्षीदार आहेत. गर्भगृहात मध्यभागी जमिनीतून वर आलेली स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर महादेवाचा पितळी मुखवटा आहे. पिंडीभोवती वेटोळे घातलेला पितळी नाग आहे. पिंडीवर जलधार धरलेले अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. मंदिराच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके आहेत. त्यांत महादेव व अन्य देवी-देवतांच्या विविध रूपातील मूर्ती आहेत. प्रत्येक देवकोष्ठकाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार वामनस्तंभ व त्यावर महिरपी कमानी आहेत. शिखरात शीर्षभागी कमळफुलाची प्रतिकृती, त्यावर आमलक व कळस आहे.
मंदिरात महाशिवरात्री, चैत्र वद्य द्वादशी व श्रावण मास हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवकाळात नांदेड व आसपासच्या जिल्ह्यांतून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर चालणारा भंडारा हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिरात सोमवार, सर्व महिन्यांच्या वद्य द्वादशी, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी भाविकांची संख्या मोठी असते.