महाराष्ट्रासह देशात शिवमंदिरांची संख्या अधिक आहे. या प्रत्येक मंदिरांची वेगवेगळी नावे आहेत. शिवाय त्यात शिवलिंगांचे विविध प्रकारही आहेत. या मंदिरांमध्ये क्षेत्रपाल भैरवाची मंदिरे तुलनेने जास्त आहेत. शिवअवतारातील नटराज वा पशुपती यांसारखी मंदिरे महाराष्ट्रात फारशी आढळत नाहीत. काठमांडू व बद्रीनाथ येथील पशुपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच पंक्तीतील पशुपतीनाथाचे एक दुर्मिळ व प्राचीन मंदिर सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठी असलेल्या रेठरे हरणाक्ष या गावात आहे. या मंदिरातील गर्भगृहात शिवपिंडीखाली असलेल्या भुयारी कक्षाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
‘शिवपुराणा’तील ‘रुद्रसंहिते’तील नवव्या अध्यायानुसार, त्रिपुरमधील राक्षसांचा वध करण्यासाठी सर्व देवांनी महादेवाला विनंती केली. त्या युद्धाकरीता विश्वकर्म्याने दिव्य रथाची निर्मिती केली. त्यावर बसून युद्धास जात असताना शंकराने ब्रह्माला सांगितले की ‘तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या राक्षसांतील पशुत्व वाढलेले आहे. तेव्हा त्यांच्या संहारासाठी मलाही पशुंची शक्ती हवी. तेव्हा सर्व देवांनी स्वतःत पशुत्वाची वाढ करून त्यांचे अधिपत्य मला द्यावे.’ हे ऐकून देव काळजीत पडले. तेव्हा शंकर म्हणाले, ‘तुमच्यात पशुत्व आल्याने तुमचे पतन होईल असे मानू नका. तुम्ही पवित्र मनाने पाशुपतव्रत केल्यास तुम्ही पशुत्वापासून मुक्त व्हाल.’ हे ऐकून सर्व देवांनी आपल्यातील पशुत्व वाढवले आणि पशुत्वरूपी पाशापासून मुक्त करणारे महादेव ‘पशुपती’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
रेठरे हरणाक्ष या गावात पशुपतीनाथाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की वनवासात असताना श्रीराम या मंदिरात आले होते. तेव्हा त्यांचा सामना बिसुर राक्षसाशी झाला. श्रीरामांनी बाणाने बिसुर राक्षसाचे शिर उडवले व ते शिरटे गावी जाऊन पडले. राक्षसाच्या संहारानंतर रामाने मंदिराच्या मागे असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून पशुपतीनाथांची पूजा केली व ते पुढे मार्गस्थ झाले. या प्राचीन स्थानी पुढे तेराव्या शतकात राजा भोज (दुसरा) याने मोठे मंदिर उभारले असे सांगण्यात येते. शिलाहार वंशातील हा पराक्रमी राजा होता. बाराव्या–तेराव्या शतकात या परिसरात त्याचे राज्य होते. या मंदिराचे दगडी बांधकाम, समोरील भव्य दीपमाळ व स्थापत्यशैली पाहून या मंदिराचे प्राचिनत्व सहज लक्षात येते.
रेठरे हरणाक्ष गावाच्या सीमेवर असलेले हे मंदिर रस्त्यापासून काहीसे उंच आहे. २० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या सभामंडपासमोर पायरीमार्गाच्या मधोमध गोलाकार पायावर एक उंच प्राचीन दीपमाळ आहे. पाच थरांच्या दीपमाळेत दीप प्रज्वलनासाठी स्वतंत्र हस्त व शीर्षभागी शिखर आहे. दीपमाळेचे थर वर्तुळाकार रिंगणाने विभागलेले आहेत. दीपमाळेवर खालील बाजूस ‘गरुड, हनुमंत पुढे उभे राहती…’ या आरतीमधील ओळींप्रमाणे गरुड, हनुमंत व श्रीकृष्णाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मूळ मंदिरासमोर नव्याने खुल्या स्वरूपाचा दर्शनमंडप बांधलेला आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या या सभामंडपात येण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या बाजूलाच सभामंडपात कक्षासने आहेत. सभामंडपात आठ नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. त्यापैकी मधल्या चार स्तंभांमध्ये चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपात उजवीकडील भिंतीवर असलेल्या देवकोष्टकात गणपतीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. गणपतीच्या हातांत परशू, अंकुश व मोदक आहेत. उजवीकडील देवकोष्टकात महिषासूरमर्दिनीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीने रेड्याच्या पाठीवर पाय ठेवलेला आहे व दोन्ही हातांनी रेड्याचे तोंड आणि शेपटी धरली आहे. तिसऱ्या हाताने देवीने त्रिशुळाचा वार केला आहे व चौथ्या हातात अग्निपात्र आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस उठाव शैलीतील पाठीवर अंबारी व माहूत असलेल्या गजराजाची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या पहिल्या द्वारशाखांवर पर्णलता नक्षी, दुसऱ्या द्वारशाखेवर पुष्पलता नक्षी व स्तंभ शाखेवर मयुर, ध्यानस्थ यती, गणेश अशी विविध शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपती व त्यावरील भागात कीर्तिमुख आहे. ललाटपट्टीवर कमळ फुलांची नक्षी व मंडारकावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कट्यार असलेल्या द्वारपालांची शिल्पे आहेत.
गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंका काळ्या पाषाणातील व त्यावरील लिंग पांढऱ्या रंगाचे आहे. हे या शिवपिंडीचे वैशिष्ट्य मानले जाते. शिवपिंडीच्या बाजूला डोक्यावर पंचफणी नागाने छत्र धरलेला महादेवाचा पितळी मुखवटा आहे. उत्सवाच्या वेळी हा मुखवटा शिवपिंडीवर ठेवला जातो. शिवपिंडीच्या बाजूला पाषाणाने झाकलेले भुयाराचे तोंड आहे. या भुयारात खाली उतरण्यासाठी घडीव दगडात बांधलेल्या पायऱ्या आहेत व खाली कक्ष आहे. या भुयारी कक्षाचा वापर ध्यान साधनेसाठी केला जात असावा, असे सांगितले जाते.
मंदिराच्या बाह्य बाजूला भिंतीवर विविध पौराणिक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा, चारही कोनांवर मेघडंबरी, त्यावर शिखर व कळस आहेत. मध्यभागी पिरॅमिडच्या आकारातील सहा थरांचे मुख्य शिखर आहे. शिखरात चारही बाजूला पहिल्या थरात तीन देवकोष्टके व दुसऱ्या थरातील नक्षीपटात प्राणी व देवदेवतांची शिल्पे आहेत. तिसऱ्या व चौथ्या थरात प्रत्येकी तीन देवकोष्टके, वरील पाचव्या व सहाव्या थरात अनुक्रमे दोन व एक देवकोष्टके आहेत. सर्व देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी चारही बाजूला लघू शिखरे, मध्यभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात कोरीव पाषाणात काही प्राचीन अवशेष आहेत.
मंदिरात महाशिवरात्री व श्रावणी सोमवार हे मुख्य उत्सव साजरे केले जातात. वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात लघूरूद्र व महाअभिषेक केले जातात. उत्सवांच्या वेळी मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीस मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजल्यामुळे परिसरास जत्रेचे स्वरूप येते. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिराशिवाय रेठरे हरणाक्ष हे गाव ‘श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी सोवळे ठेवले घालूनि घडी। मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी।।’ असे सांगणारे श्रेष्ठ शाहीर पठ्ठे बापूराव तथा श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचे जन्मगाव म्हणूनही सुप्रसिद्ध आहे.