पार्लेश्वर मंदिर/गणपती मंदिर

हनुमान रोड, विलेपार्ले (पू.), मुंबई

मुंबईच्या उपनगरांमधील एक सुशिक्षित आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न केंद्र ही विलेपार्लेची ओळख आहे. ‘पार्ले’ या लोकप्रिय बिस्किट ब्रँडची जन्मभूमी अशीही या उपनगराची एक ओळख आहे. येथील पार्लेश्वर म्हणजे पार्ल्याचे ग्रामदैवत. या उपनगराच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे स्थान असलेले पार्लेश्वराचे आणि गणेशाचे मंदिर येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विलेपार्ले या गावाच्या स्थापनेइतकाच जुना इतिहास असलेल्या या मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.

आजचे विलेपार्ले हे एकेकाळी पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या अमलाखाली असलेले एक छोटेसे शांत गाव होते. इरले (किंवा इडले) आणि पारले (पाडले) हे येथील दोन मुख्य पाडे होते. पाचकळशी आणि पाठारे प्रभू हे येथील मूळचे रहिवासी होते. पोर्तुगीजांच्या काळात येथे सक्तीने धर्मांतरे झाली आणि अनेकांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. जहाज व्यवसायातील मोठे नाव असलेल्या वाडिया घराण्याने सन १८४३ मध्ये ब्रिटिशांकडून जुहू आणि पारले ही दोन गावे भाडेपट्टीवर घेतली होती. येथील लोकवस्ती व शेती वाढवून महसूलवृद्धी करणे हा त्यामागील हेतू होता. अनेकांनी त्यांच्याकडून येथील जमिनी विकत घेतल्या होत्या. विलेपार्लेच्या विकासात गुजराती तेजपाल घराण्याचा मोठा वाटा होता.

सध्याचे ‘जी. टी. हॉस्पिटल’ गोकुळदास तेजपाल यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांचे पुत्र गोवर्धनदास तेजपाल यांनी विलेपार्ले येथे एक मोठी हवेली बांधण्याचे ठरवले होते. त्या काळी येथे बाहेरून बांधकाम साहित्य आणणे अडचणीचे होते. ‘बी.बी. अँड सी.आय.’ रेल्वेने १२ एप्रिल १८६७ रोजी विरार ते कुलाबा अशी रेल्वे सेवा सुरू केली होती. त्या वेळी येथे रेल्वे स्थानक बांधलेले नव्हते. त्यामुळे तेजपाल यांनी रेल्वे स्थानकासाठी आपल्या मालकीची काही जागा दिली. येथे सन १९०६-१९०७ मध्ये रेल्वे स्थानक बांधण्यात आले. त्या स्थानकाला इरले आणि पारले या पाड्यांची नावे एकत्र करून ‘विलेपार्ले’ असे नाव देण्यात आले. काही इतिहासकारांच्या मते, ‘विले’ हा शब्द पोर्तुगीज भाषेतील ‘विला’ म्हणजेच गाव किंवा वसाहत या शब्दावरून आला असावा. त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी तेजपाल यांची हवेली पूर्ण झाली. ही भव्य हवेली ‘मोर बंगला’ म्हणून ओळखली जात असे. सन १९५७ मध्ये ती पाडण्यात आली. त्या ठिकाणी सध्या ‘दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह’ उभे आहे.

सन १८९६ मधील प्लेग म्हणजेच गाठीच्या प्लेगची साथ आणि रेल्वे स्थानक यामुळे विलेपार्ल्यातील वस्ती वाढत गेली. येथील पार्लेश्वर मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. ब्रिटिश वसाहतकाळात येथे सर्वत्र जंगल आणि भातशेती होती. त्या काळात एक विहीर खणताना हे शिवलिंग सापडले. स्थानिक लोकांनी भक्तीभावाने या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. सुरुवातीच्या काळात येथील मंदिर अत्यंत साधे आणि कौलारू होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

हनुमान रोडवरील प्रशस्त प्रांगणामध्ये ही मंदिराची वास्तू आहे. मंदिराच्या आवाराला साधे प्रवेशद्वार आहे. आवारात सर्वत्र पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. आगळ्यावेगळ्या प्रकारची रचना असलेल्या या वास्तूमध्ये मधोमध मुखमंडप आहे. या मुखमंडपाच्या दर्शनी भिंतीवर द्वारपालांच्या दोन भव्य मूर्ती आहेत. मुखमंडपाच्या डावीकडे पार्लेश्वर महादेवाचे तर उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांमध्ये बाहेरून प्रवेश करता येतो, त्याचप्रमाणे मुखमंडपातून आत गेल्यानंतर तेथूनही प्रवेश करता येतो. पार्लेश्वर मंदिराच्या समोरील प्रांगणात दोन दीपस्तंभ आहेत. मंदिराचा सभामंडप उंच आणि प्रशस्त आहे. वरच्या मजल्यावर सज्जा असलेल्या या सभामंडपाच्या बांधकामात संगमरवरी पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वर उत्तरांगभागात गणेशाची प्रतिमा आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. आत मध्यभागी जमिनीच्या पातळीवर पार्लेश्वर महादेवाचे शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. हे शिवलिंग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शिवलिंगावर नागदेवतेने छत्र धरलेले आहे. येथील गणपतीच्या मंदिराचा सभामंडपही उंच व प्रशस्त आहे. येथे गर्भगृहाच्या दर्शनी स्तंभांवर देवसेविकांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. वरच्या भागात मोठे कीर्तिमुख आहे. संगमरवरी बांधकामाच्या या गर्भगृहात उंच वेदीवर गणेशाची मोठी मूर्ती विराजमान आहे.

या मंदिरात पहाटे ५ ते दुपारी १२ आणि दुपारी ३:३० ते रात्री १० या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरातील धार्मिक विधींना पहाटे ५:३० वाजताच्या काकड आरतीने प्रारंभ होतो. येथे दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी ७ वाजता धूपआरती आणि रात्री ९ वाजता शेजारती केली जाते. पार्लेश्वर मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्री हा मंदिराचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी हजारो भक्त पार्लेश्वराच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावतात. या दिवशी मंदिरात महाप्रसाद, भजन आणि अखंड रुद्रपठण चालते. संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात भक्तांची गर्दी असते. दर सोमवारी महादेवास अत्तर शृंगार, भाजी शृंगार किंवा फल शृंगार असा विशेष शृंगार केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरात हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा केला जातो. याशिवाय येथे हनुमान जयंती आणि गणेशोत्सव हे उत्सवही मोठ्या जल्लोषाने साजरे केले जातात. गणेश ही बुद्धीची देवता मानली जाते, त्यामुळे या मंदिराच्या आवारात जिज्ञासू भाविकांसाठी ग्रंथालयाची सुविधाही उपलब्ध आहे.

उपयुक्त माहिती

  • विलेपार्ले रेल्वे स्थानकापासून ५०० मी. अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १५ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२६१४६१८०

पारलेश्वर मंदिर/गणपति मंदिर

हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई

Back To Home