परशुराम मंदिर

पैंगिण, ता. काणकोण. जि. दक्षिण गोवा

भृगुकच्छपासून (भरुच) केरळपर्यंतच्या भूमीचे निर्माते मानले गेलेल्या व विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचे गोमंतकातील एकमेव प्राचीन मंदिर पैंगी ऋषीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पैंगिणमध्ये आहे. देशातील तीन प्रमुख परशुराम स्थानांमध्ये या देवालयाची गणना केली जाते. या मंदिरात पूर्वी पाषाणी चक्र या रूपात परशुरामाची पूजा केली जात असे. भक्तांना दर्शनासाठी येथे परशुरामाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. याशिवाय येथे पुरुषोत्तमाचीही मूर्ती विराजमान आहे.

पौराणिक इतिहासानुसार, परशुरामाचा भृगुवंश (भार्गव) हा गुजरातमधील आनर्त येथे वास्तव्यास होता. भृगू हे हैहय या राजवंशाचे पुरोहित होते. ययातीचा मुलगा यदू याचा पुत्र सहस्रजीत हा हैहय या वंशाचा संस्थापक. नर्मदेकाठी माळव्यातील महिष्मती नगरी (आधुनिक महेश्वर) येथे हैहयांची राजधानी होती. हैहय राजा कृतवीर्य याने भार्गवांना विपुल संपत्ती व धन दिले. मात्र कृतवीर्यांच्या मुलांना भार्गवांनी त्यातील काहीच न दिल्याने त्यांनी भार्गवांचा छळ केला. भार्गवांचे वंशज असलेले जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे पिता होत. हैहय राजा कार्तवीर्य एकदा परशुरामाच्या अनुपस्थित जमदग्नीच्या आश्रमात ससैन्य आला व त्याने जमदग्नींकडील दैवी कामधेनू बळजबरीने नेली. त्यातून हैहय व भार्गव यांच्यातील संघर्ष पेटला.

त्या संघर्षात परशुरामाने कार्तवीर्याचा मुलगा अर्जुन यास ठार मारले. तेव्हा अर्जुनाच्या मुलांनी जमदग्नींची हत्या केली. त्यामुळे संतापलेल्या परशुरामाने वैशाली, विदेह, काशी, कान्यकुब्ज व अयोध्या या राज्यांचा संघ स्थापन करून हैहयांविरुद्ध आघाडी उघडली व त्यांचा निःपात केला. असे सांगण्यात येते की परशुरामाने २१ राजसत्तांशी लढाया केल्या किंवा २१ वेळा क्षत्रियांशी युद्धे करून त्यांची राज्ये जिंकली. यानंतर त्याने या हत्येच्या पापाच्या निष्कृतीकरीता आपल्या ताब्यातील भूमी कश्यप ऋषींना दान केली. कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून परशुराम दक्षिणेकडे आला. महेंद्रगिरी पर्वतावर त्यांनी वास्तव्य केले व कोकणच्या भूमीची निर्मिती केली म्हणजेच ती वसाहतयोग्य बनवली.

याबाबत पौराणिक आख्यायिका अशी की महेंद्रगिरीवर राहात असताना परशुरामाने आपणांस थोडासा भूप्रदेश देण्याची विनंती समुद्राला केली. मात्र समुद्राने ती अव्हेरल्याने क्रोधित होऊन त्याने बाण मारून उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत समुद्र मागे हटवला. त्यातून सहा योजने रुंद आणि ४०० योजने लांब असा भूप्रदेश निर्माण झाला. यास सप्तकोकण असे म्हणतात. सह्याद्रीखंडात (उत्तरार्ध ६.४७-४८) त्यांची नावे दिलेली आहेत. ती अशी – ‘केरलाश्च तुलंगाश्च तथा सौराष्ट्रवासिनः। कोंकणाः करहाटाश्च करनाटाश्च बर्बराः।। इत्येते सप्त देशा वै कोंकणाः परिकीर्तिताः।’ म्हणजे केरळ, तुलंग, सौराष्ट्र, कोंकण, करहाट, कर्नाट आणि बर्बर अशी सात कोंकणे आहेत.

त्यानंतर कोंकण भूमीतील गोमंतकात परशुरामाने दिग्विजयार्थ यज्ञ केला. त्याच्या सिद्धीसाठी अनेक विद्वान ब्राह्मणांची आवश्यकता असल्याने परशुरामाने उत्तरेकडील त्रिहोत्रपूर येथून भारद्वाज, कौशिक, वत्स, कौंडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नी, विश्वामित्र, गौतम आणि अत्री अशा तपस्वी विद्वान सारस्वत ब्राह्मणांना गोमंतकात आणले. मराठी विश्वकोशानुसार, मिथिला देशाची एकूण १२ नावे होती. त्यातील एक नाव तैरभुक्ती असे होते. त्याचा अपभ्रंश तिहोत्र असा झाला. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भागास तिरहूत क्षेत्र असे म्हणतात. येथून आलेल्या या ब्राह्मणऋषींची ६६ कुळे होती. या कुळांनी त्यांच्यासमवेत त्यांची मंगेशी, महालक्ष्मी, मांगिरिश महादेव, शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर, महालसा ही कुलदैवतेही येथे आणली. याचे वर्णन सह्याद्री खंडाच्या उत्तररहस्यामध्ये आलेले आहे. श्री. म. माटे यांनी १९३७ साली लिहिलेल्या ‘परशुराम चरित्र व पंचमानव हिंदुसमाज’ या पुस्तकात आद्य परशुरामाचा काळ सुमारे सात हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे म्हटले आहे. तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९१४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे’च्या द्वितीय संमेलन वृत्तांतात प्रसिद्ध केलेल्या निबंधात ‘चित्पावनांचे १४ मूळ पुरूष ३०८८ वर्षांमागे (म्हणजे इ.स. पूर्व ११७४च्या सुमारास) कोंकणात वसाहत करिते झाले’, असे मत मांडले आहे.

देशातील परशुरामाच्या तीन प्रमुख स्थानांमध्ये कोकणातील परशुराम घाटातील मंदिर, तसेच केरळच्या तिरुवनंतपुरमजवळ असलेले तिरुवल्लव परशुराम स्वामी या नावाने ओळखले जाणारे मंदिर या बरोबरच पैंगिणमधील या मंदिराचा समावेश केला जातो. या मंदिराची उभारणी नेमकी केव्हा झाली याचा इतिहास अज्ञात आहे. काही अभ्यासक या मंदिराचा काळ इसवी सनाचे तेरावे वा चौदावे शतक असल्याचे सांगतात. असे सांगितले जाते की मूलतः येथे पुरुषोत्तमाचे मंदिर होते. या मंदिरातील पाषाणी चक्र परशुरामाचे प्रतीक मानले गेले. त्यामुळे मंदिराशी परशुरामाचे नावही जोडले गेले. गोवा गॅझेटियरमध्येही, या मंदिरात परशुरामाच्या मूर्तीऐवजी काळ्या चक्राकार पाषाणाची पूजा केली जाते, अशी नोंद आहे. इ.स. १८७२ मध्ये गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या वतीने या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी तुलसीवृंदावनाचा भाग असलेले पाषाणी चक्र जमिनीत गाडले गेले. म्हणून दर्शनासाठी येथे परशुरामाची मूर्ती स्थापित करण्यात आली.

पैंगिणच्या निसर्गसंपन्न अशा परिसरात मोठ्या प्रांगणामध्ये हे मंदिर वसले आहे. मंदिर प्रांगणास दोन एक सारख्या प्रवेशकमानी आहेत. दोन्ही कमानींच्या शीर्षस्थानी असलेल्या देवळ्यांत गणेशमूर्ती विराजमान आहेत. मंदिराची रचना पारंपरिक गोमंतकीय शैलीची आहे. सभामंडपात पारंपरिक पद्धतीचे सहा लाकडी कोरीव खांब आहेत. त्यावर पुराण कथा कोरलेल्या आहेत. मंदिरात दोन स्वतंत्र गर्भगृहे आहेत. पूर्वेकडील गर्भगृहात पुरुषोत्तम व पश्चिमेकडील गर्भगृहात परशुराम मूर्ती आहे. पुरुषोत्तमाची मूर्ती काळ्या शिळेत घडवलेली आहे. तिच्या हातात दंड आहे. परशुरामाची मूर्ती धातुची आहे. या समपद मूर्तीच्या डाव्या हातात धनुष्य, तर उजव्या हातात परशु आहे. मूर्तीच्या मागे कोरीव नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. तिच्या कमानीवर ललाटबिंबस्थानी नागप्रतिमा कोरलेली आहे. त्यावर कीर्तिमुख व त्याच्या वरील बाजुला चंदेरी छत्र आहे. मंदिराचे शिखर निमुळते त्रिकोणाकार असून वर कळस आहे. मंदिर परिसरात सभागृह आहे.

परशुराम जयंती हा या मंदिरातील मुख्य उत्सव होय. वैशाख शुद्ध तृतीयेस तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात. उत्सवाची सुरुवात सकाळी अभिषेकाने होते. दुपारी महाप्रसाद आणि कीर्तन, तर संध्याकाळी रथयात्रा आणि मोठी आरती होते. गणेश चतुर्थी आणि नवरात्रीचा उत्सवही या मंदिरात मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीस येथे गणपती-परशुरामाची संयुक्त पूजा करण्यात येते. श्रावणात संपूर्ण महिनाभर रंगपूजा केली जाते. फाल्गुन कृष्ण द्वितीयेस शिगम्याची जत्रा भरते. दिवजोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सवही मंदिरात होतो. या मंदिरात एका विशिष्ट लाकडी खांबावर फुले लावून प्रसाद पाकळी म्हणजेच कौल घेण्याची प्रथा आहे.

उपयुक्त माहिती

  • काणकोण येथून १३ किमी आणि मडगावपासून ४७ किमी अंतरावर
  • काणकोण येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२३५६९९६४, ७०२०७५३६५६

परशुराम मंदिर

पैंगिण, ता. काणकोण. जि. दक्षिण गोवा

Back To Home