पापनाश मंदिर

चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव

पाप आणि पुण्य या संकल्पना मानवी जीवन नीतिमान राखण्यास मदत करतात. काही वेळा नीतिमान माणसाच्या हातूनही कळत नकळत पाप घडते. अशावेळी पश्चाताप होतो, अस्वस्थता निर्माण होते व प्रायश्चित्त घेण्याची इच्छा निर्माण होते. अशा माणसांसाठी शास्त्रात विविध प्रायश्चिते सांगितली आहेत. यात दान, दक्षिणा, मंदिर बांधणे, विविध व्रते करणे आदींचा सामावेश आहे. परंतू काही मंदिरे व तीर्थे अशी आहेत की जेथे नुसते स्नान केल्याने पापांचा नाश होतो. धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी गावात असेच एक मंदिर आहे. येथील पापनाश कुंडात अंघोळ केल्याने पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे.
हे मंदिर सुमारे तेराव्या शतकातील यादकालीन असल्याचे सांगितले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हे आजोळ असल्याने गावाला ऐतिहासिक संदर्भ आहेत. मंदिराबाबत अख्यायिका अशी की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना या ठिकाणी येऊन त्यांनी शिवपिंडीची पुजा केली होती. शिवपूजनासाठी पाणी हवे म्हणून श्रीरामाने जमिनीत बाण मारून पापनाश कुंडाची निर्मिती केली व या कुंडात स्नान करणाऱ्यांची जन्मोजन्मीची पापे नाहीशी होऊन त्यांना मुक्ती मिळेल, असा आशीर्वाद दिला. सर्व प्रथम लक्ष्मणाने या कुंडात स्नान करून आपल्या पापांचा नाश केला, असे सांगितले जाते.
गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील या मंदिरासमोर वाहनतळ आहे. मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व स्तंभांवर शंखनाद करणारे बैरागी रंगवले आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. ललाटपट्टीवर दोन्ही बाजूला चक्राकार नक्षी आहेत. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस तटबंदीला लागून वर छत असलेले चौथरे आहेत. उजव्या बाजूच्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. या चौथऱ्यांचा वापर भाविकांसाठी विसावा केंद्र म्हणून केला जातो. प्रांगणात तिन्ही बाजूस तटबंदीलगत ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर धर्मशाळा म्हणून केला जातो.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे व त्यावर तुलसी वृंदावन आहेत. प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या नंदीच्या पाठीवरील फणाधारी नागशिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेल्या देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. डावीकडे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. अंतराळात जमिनीवर मध्यभागी कासव शिल्प आहे. पुढे गर्भगृह आहे. अंतराळ व गर्भगृहाचे प्रवेशद्वार प्राचीन असल्यामुळे द्वारशाखा व ललाटपट्टीवरील नक्षी अस्पष्ट झालेली आहे.
गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची स्थापना श्रीरामाच्या हस्ते झाली असल्याचे सांगितले जाते. शिवपिंडीवर पंचफणी पितळी नागाने छत्र धरलेले आहे व त्यावर जलधारा धरलेली पाच पितळी अभिषेक पात्रे छताला टांगलेली आहेत. पाच अभिषेक पात्रांची ही योजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहात भिंतीवर दीपकोष्टके आहेत. मंडोवरावर गजराज, नागराज व चक्रनक्षी आहेत. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे षट्कोनी उरुशृंगी प्रकारचे शिखर आहे. शिखरात तिन्ही थरात प्रत्येकी सहा देवकोष्टके आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी सहा कोनांवर सहा उपशिखरे व त्यांवरील आमलकांवर कळस आहेत. मुख्य शिखरावर मध्यभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या मागील बाजूला पुष्करणी आहे. तेथे जाण्यासाठी तटबंदीतून लहान दार आहे. पुष्करणी प्रांगणापेक्षा सुमारे दहा फूट खाली असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर असलेल्या सुमारे पंधरा पायऱ्या उतरून जावे लागते. पुष्करणीत मध्यभागी वागेश्वर महादेवाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की येथील शिवपिंडीस श्रीराम व लक्ष्मण यांनी अभिषेक करण्यासाठी बाण मारून पाण्याचे कुंड तयार केले होते. पुष्करणीच्या भिंतीस लागून वीरगळ व सतीशिल्पे तसेच मारूती, विष्णू, महादेव आदी देवतांची प्राचीन आणि जीर्ण शिल्पे आहेत. पुष्करणीच्या भिंतीत असलेल्या गोमुखातून पाण्याची अविरत संततधार पडत असते.
पुष्करणीच्या काठावर महादेव बुवा, तुलसीदास महाराज, आत्माराम बुवा, नित्यानंद महाराज आदी महंत व महापुरुषांची समाधी मंदिरे आहेत. येथेच परगावातून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास आहे. मंदिरात चैत्र शुध्द द्वादशी ते चतुर्दशी हा तीन दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेस पापनाश महादेवाची ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत पालखी मिरवणूक काढण्यात येते. यावेळी देव ग्रामप्रदक्षिणा करतात. याशिवाय महाशिवरात्री, अधिक मास व श्रावण मास यावेळी उत्सव साजरे केले जातात. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. येथे अन्नदानाचा नवस बोलण्याची प्रथा असल्याने प्रत्येक द्वादशीला भाविकांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

उपयुक्त माहिती

  • धाराशिव येथून ३३ किमी अंतरावर
  • कळंब व धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
  • संपर्क : अशोक मैंदाड, मो. ८३०८३४०५०४,
  • दिगंबर मैंदाड, ९४२३४४८०१०
Back To Home