पंढरीनाथ देवस्थान

वाणी आळी, भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे

विठ्ठल मंदिर म्हटले की कंबरेवर हात ठेवून असलेली विठ्ठल-रखुमाईची काळीसावळी मूर्ती समोर येते, पण भिवंडी (जि. ठाणे) शहरातील वाणी आळीत असलेल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रखुमाई गोरेपान आहेत. ऐतिहासिक भिवंडीतील जुन्या मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर वैश्य समाजाच्या मालकीचे आहे. सव्वातीनशे वर्षांहूनही जुन्या असलेल्या या मंदिरात १०० हून अधिक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी अग्रस्थानी असलेल्या या गणेश मूर्तीची पालखीतून मिरवणूक निघते. या मूर्तीच्या मागे रांगेत परिसरातील अन्य सार्वजनिक गणेशमूर्तीं असतात.

प्राचीन काळापासून भिवंडी हे पश्चिम किनाऱ्यावरील व्यापारी पेठ व बंदर म्हणून प्रसिद्ध होते. असे सांगितले जाते की भिवंडीतील वैश्य समाज ७०० वर्षांपूर्वी येथे स्थायिक झाला आहे. वैश्य समाजाची मूळ वस्ती गोदावरी तीरी मुंगी पैठण विभागात होती. चौदाव्या शतकाच्या अखेरीस महमूदशहा बहमनी पहिला याच्या काळात ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ म्हणून ओळखला जाणारा दुष्काळ पडला होता. १३९६ साली सुरू झालेला हा दुष्काळ १४०७ पर्यंत होता. फेरिश्ताच्या ‘गुलशनी इब्राहिमी’ या ग्रंथानुसार, या काळात बहमनी सुलतानाने माळवा व गुजराथ येथून धान्य आणण्यासाठी दहा हजार बैल कामी लावले होते; परंतु तब्बल ११ वर्षे पाऊस न पडल्याने लोकांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नव्हता. त्या काळात वैश्य समाज मोठ्या प्रमाणावर घाटावरून कोकणात उतरला. त्यापैकी काही लोक भिवंडीत स्थायिक झाले. त्यांनी व्यापारात चांगला जम बसवला. वसई मोहिमेच्या वेळी या समाजातील व्यापाऱ्यांनी चिमाजी आप्पांना साह्यही केले होते. वाणी आळीत असलेले विठ्ठल मंदिर एका ब्राह्मण सरदाराने उभारल्याचे सांगण्यात येते. कालांतराने वैश्य समाज या मंदिराची व्यवस्था पाहू लागला.

भिवंडीमध्ये १४ ते १८ एप्रिल १८३७ या काळात मोठी दंगल झाली होती. तो मुहर्रमचा महिना होता. त्या काळात रामनवमीची मिरवणूक काढण्यास काही धर्मांधांनी विरोध केला. त्यामुळे दंगल पेटली. प्रशासनाने ठाण्याहून नेटिव्ह इन्फन्ट्रीची रेजिमेन्ट आणल्यानंतर ही दंगल शांत झाली. मात्र या पाच दिवसांत धर्मांधांनी अनेक मंदिरांवर हल्ले केले, अशी नोंद ‘गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या चौदाव्या खंडात आहे; तर ‘श्रीमंत नामदार जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ नाना शंकरशेट’ या विनायक पितळे यांनी १९१६ साली लिहिलेल्या चरित्रग्रंथात या प्रकरणाची माहिती दिली आहे. या पुस्तकाच्या परिशिष्टात दिलेल्या ‘पोवाडा भिवंडीचा’मध्ये असे म्हटले आहे, की ‘दुसऱ्या दिवशी (चैत्र शुद्ध दशमी) अविंध ताबूद घेऊन आले बाजारांत। शिवपूजेचा नगारा वाजतां आले धावुन देवळांत।। श्रीविठ्ठलाची मूर्त फोडली पहा केवढा केला घात।।’ सदर चरित्रग्रंथानुसार, या दंगलीत दंगलखोरांना शिक्षा झाली नाही. ते सुटून आले. तेव्हा वैश्य समाजातील नाना विठ्ठलशेट वाणी यांनी मुंबईला जाऊन नाना शंकरशेट यांची भेट घेतली. नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे हे तत्कालीन थोर समाजसुधारक, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते. नाना विठ्ठलशेट वाणी यांनी त्यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर नाना शंकरशेट यांनी तत्कालीन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांची भेट घेतली. त्यांचेच नाव ग्रँट रोड स्थानक तसेच ग्रँट मेडिकल कॉलेजला दिलेले आहे. त्यांनी या प्रकरणाच्या नि:पक्षपाती चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर नीट चौकशी होऊन दंगलखोरांना शिक्षा झाली. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, या प्रकरणी २१ परधर्मीयांना एक ते दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा झाली. या घटनेनंतर काही दिवसांनी योग्य मुहूर्तावर मंदिरात नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

वाणी आळीत असलेल्या या मंदिराची जुनी वास्तू कौलारू व चौपाखी वाड्यासारखी होती. वाड्याजवळ एक हौद व पुढे नगारखाना होता. १९५५ मध्ये नगारखान्याचा काही भाग कोसळला. त्यानंतर १९५७ मध्ये तेथे प्रवेशद्वार बांधण्यात आले. त्यावेळी मंदिराची उंची वाढवून वर मजला करण्यात आला. १९७० च्या सुमारास मंदिराच्या मागील बाजूस पडवी बांधण्यात आली. १९८८ मध्ये मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. या चार मजली मंदिराच्या समोर रस्ता व रस्त्याच्या पलीकडे दगडी दीपस्तंभ आहे. पहिल्या मजल्यावर वैश्यवाणी समाजाचे धार्मिक कार्यक्रम होतात.

सभामंडप व त्यापुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडप हा बंदिस्त आहे व संपूर्ण सभामंडपाला संगमरवरी फरसबंदी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खांबावर दोन्ही बाजूला गजराज आहेत. गर्भगृहात एका वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींवर चांदीचे मुकुट आणि वर चांदीचे छत्र आहे. विठ्ठलाच्या आसनावर गरुड कोरण्यात आला आहे. विठ्ठलाच्या डाव्या बाजूस गणेश तर रखुमाईच्या उजवीकडे हातात बासरी असलेल्या श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती आहे.

या मंदिराला १९४८ मध्ये पुरीच्या शंकराचार्यांनी, तर १९८० मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी भेट दिली होती. मंदिरात पूर्वीपासून आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्ल पक्षातील दशमीपासून वद्य प्रतिपदेपर्यंत उत्सव होतात. या वेळी परिसराला यात्रेचे स्वरूप येते. एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. पौर्णिमेला विठ्ठलाची पालखी नजीकच्या भिमेश्वर मंदिरात जाते. भिमेश्वर मंदिराजवळ पूर्वी पाण्याचे हौद होते. विठ्ठल चंद्रभागेच्या भेटीला जातात या भावनेतून भिमेश्वर मंदिरात देवांच्या पादुकांना स्नान घालून पूजा करण्यात येते. नंतर ठाणगे आळीतील पाराला वळसा घालून पालखी मारुतीच्या मंदिराजवळ येते. नंतर बाजारपेठमार्गे पालखी विठ्ठल मंदिरात परत येते. वद्य प्रतिपदेच्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यावर उत्सवाची सांगता होते. दोन्ही एकादशीच्या उत्सवानिमित्त येथे कीर्तन होते. येथे दर गुरुवारीही महिलांचे भजन होते. मंदिरात चातुर्मासात दर दिवशी पुराणाचे वाचन होते. त्रिपुरारी एकादशीला पालखी मंदिरात आल्यावर येथे त्रिपुराची पूजा होते. मंदिरासमोरील दीपस्तंभ दिव्यांनी उजळवला जातो. रात्री मंदिरासमोरील रस्त्यावर दारूकामाच्या बाणाची लढाई होते. इतिहासात झालेल्या लढाईची स्मृती म्हणून ही लढाई होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

१९०९ मध्ये वाणी आळीत सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवादरम्यान मेळे, नाटक व पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रम होत. या मंदिराच्या नजीकच झेंडानाका आहे. १६५७ मध्ये शिवरायांनी भिवंडी काबीज केल्यानंतर त्यांनी १६५९ मध्ये भिवंडीत आरमाराची जहाजे बांधून घेतली. १६७० मध्ये माहुलीचा किल्ला सर करण्यापूर्वी त्यांनी भिवंडीत तळ ठोकला होता. पूर्वी शहरातील बंदरनाक्यापर्यंत जव्हारच्या राजांची सत्ता होती. पुढे हा भाग स्वराज्यात आल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या नाक्याला झेंडानाका असे नाव पडले. पूर्वी होलिकोत्सवारम्यान नाक्यावर मध्यभागी करंजाचे झाड लावून त्यावर झेंडा लावण्यात येत असे. कालांतराने झाड तोडण्याची प्रथा बंद होऊन फक्त झेंडा लावण्यात येतो. पुढे वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून झेंड्याचे स्थान रस्त्यालगत करण्यात आले. येथे दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी ध्वजवंदन करण्यात येते.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी बस स्थानकापासून २ किमी, तर ठाणे शहरापासून १७ किमी अंतरावर
  • ठाणे, कल्याण व पालघर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : सुधीर सिंगासने, मो. ९८२३१७१९०४
Back To Home