पांडवकालीन शिवमंदिर

बारवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. येथील तालमी, देव-देवतांच्या जत्रा, भजन, कीर्तन, संगीत यांची जोपासना अनादी काळापासून आजतागायत सुरू आहे. जत्रांच्या निमित्ताने भरणारे कुस्त्यांचे, तमाशाचे फड आणि ते पाहताना टाळ्या शिट्यांच्या गजरात आकाशात झेपावणारे फेटे चैतन्य निर्माण करतात. त्याच प्रमाणे येथील भूमीत हजारो वर्षांपासून उभी असलेली प्राचीन देवालये मनाला ऊर्जा देत आहेत. असेच एक प्राचीन शिवमंदिर तालुक्यातील बारवे गावात आहे. या मंदिराच्या बांधणीचा निश्चित कालावधी ज्ञात नसल्यामुळे ते पांडवकालीन शिवमंदिर म्हणून ओळखले आहे. येथील देव हा जागृत व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराचे पुरातनत्व अधोरेखित करण्यासाठी येथेही पांडवांच्या मंदिर उभारणीची आख्यायिका सांगण्यात येते. ती अशी की अज्ञातवासात असताना पांडव गावाशेजारील जंगलात वास्तव्यास होते. संध्याकाळ होताच पांडवांनी हे शिवमंदिर बांधावयास प्रारंभ केला. कोरीव नक्षीदार दगडातील हे मंदिर पूर्णत्वास येता येता पहाट होत आली. पहाटे कोंबड्याने बांग दिल्यावर पुढच्या प्रवासाला निघायचे असल्याने त्यांनी मंदिराचे काम थांबवले. त्यामुळे हे मंदिर अपूर्णावस्थेत असल्याचे सांगितले जाते. १६व्या शतकातील स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या पायथ्याशी कुंडे आहेत. १९६५ मध्ये या कुंडांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यात बांधकामाची प्राचीन अवजारे व एक पितळी चाळ सापडला होता, असे येथील ग्रामस्थ सांगतात.

गारगोटीपासून १० किमी अंतरावर असलेल्या बारवे गावाच्या उत्तरेडील बाजूस मंदिराकडे जाताना घडीव दगडी बांधकाम असलेले पाण्याचे बारा कुंड नजरेस पडतात. सध्या हे कुंड अर्धवट मातीत गाडले गेले असल्याने हा तलाव असल्यासारखे दिसते. या कुंडांच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वारातून आटोपशीर प्रांगणात प्रवेश होतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे मंदिराभोवती असलेली आवारभिंत ही मोठमोठ्या आयताकार दगडी शिळांची आहे व त्यात काही ओवऱ्या आहेत. मंदिराभोवतीच्या प्रांगणात घालण्यात आलेल्या भरावामुळे या ओवऱ्या निम्म्याहून अधिक गाडलेल्या अवस्थेत आहेत. एखाद्या गुहेप्रमाणे भासणाऱ्या या ओवऱ्यांत प्रत्येकी एक अशा १२ शिवपिंडी आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही १२ ज्योतिर्लिंगाची स्थाने आहेत. यातील काही ओवऱ्यांत वीरगळांचे, तसेच सतीशिळांचे भग्नावशेष आहेत. एका ओवरीत एका देवतेचे शिल्प आहे. झिजून गेल्यामुळे ते ओळखण्यापलीकडे आहे. मात्र ही देवता चतुर्भुज आहे व तिच्या एका हातात शस्त्र असल्याचे दिसते. तिच्या पायानजीक सेवक वा सेविकाही दिसतात. वीरगळांचे व सतीशिळांचे काही तुकडे आवारभिंतीच्या बांधकामासाठीही वापरले असल्याचे दिसते. या ओवऱ्यांजवळून उंच असलेल्या आवारभिंतीवर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.

नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंडपात नंदीची अखंड काळ्या पाषाणातील भलीमोठी मूर्ती आहे. ही मूर्ती तुलनेने आधुनिक कालखंडातील असल्याचे दिसते. येथे प्राचीन मंदिराच्या कलशाचे काही अवशेष मांडलेले आहेत. नंदीमंडपासमोर असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाचे प्रवेशद्वार दगडी व त्याच्या द्वारशाखांवर व मंडारकावर नक्षीकाम आहे. सभामंडपाचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे व विटांनी केलेले आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. आत पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या बसवलेल्या आहेत. सभामंडपावर दोन्ही बाजूंस पत्र्याचे उतरते छप्पर आहे. विशेष म्हणजे या सभामंडपास बाहेरच्या बाजूने मोठ्या कोरीव दगडी खांबांचा आधार देण्यात आलेला आहे. हे दगडी खांब प्राचीन असावेत असे दिसते. सभामंडपाच्या पुढील बाजूस उजवीकडे व डावीकडे दरवाजे आहेत.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभागृहाच्या प्रवेशद्वारासारखेच आहे. त्याच्या द्वारशाखांवरही पाना-फुलांची नक्षी कोरलेली आहे. उंच मंडारकावर कीर्तिमुखे आहेत व अर्धचंद्रशिला आहे. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी भूतलावर स्वयंभू शिवलिंग आहे. गर्भगृहाचे बांधकाम काळ्या पाषाणशिळांनी केलेले आहे. त्यावर अलीकडच्या काळात सिमेंटचा वापर करून बसक्या पिरॅमिडच्या आकाराचे शिखर बांधलेले आहे. शिखरावर वरच्या बाजूस किंचित आत वळलेला चौकोनाकार आहे आणि त्यावर आमलक व कलश आहे. एकंदर या मंदिराच्या उभारणीत प्राचीन व आधुनिक शैलीचे मिश्रण केल्याचे स्पष्ट दिसते.

महाशिवरात्री हा या मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव असून तो मोठ्या उत्साहात आठ दिवस साजरा केला जातो. माघ कृष्ण पंचमीपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो. त्याची सांगता महाशिवरात्रीस होते. यावेळी आठवडाभर महाअभिषेक, लघुरुद्र, भजन-कीर्तन, जागरण, नामस्मरण, यज्ञ तसेच विविध ग्रंथांची पारायणे सुरू असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसराला यावेळी यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

उपयुक्त माहिती

  • भुदरगडपासून २४ किमी, तर कोल्हापूरपासून ६३ किमी अंतरावर
  • भुदरगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून काही अंतरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home