
देशातील प्रख्यात १२ ज्योतिर्लिंगांमध्ये मध्य प्रदेशातील ओंकार–मान्धाता येथील ओंकारेश्वर हे धार्मिकदृष्ट्या एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. त्याच्या नावाने ओळखले जाणारे भोकरी नजीक तामसवाडी येथील ओंकारेश्वर मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे परम श्रद्धास्थान आहे. येथील शंकराचे स्थान हे अतिप्राचीन असल्याचे सांगण्यात येते. पौराणिक आख्यायिकेनुसार या मंदिराचा इतिहास रामायण काळापर्यंत पोचतो. असे सांगण्यात येते की वनवासकाळात स्वतः प्रभू श्रीरामाने येथील शिवलिंगाची पूजा केली होती. यामुळे हे स्थान अत्यंत चैतन्यपूर्ण व जागृत मानले जाते.
या मंदिराविषयी आख्यायिका अशी की सध्या हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, रामायण काळामध्ये अगस्ती ऋषींचा आश्रम होता. वनवासकाळात पंचवटी येथे जात असताना प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण या आश्रमात अगस्ती ऋषींच्या दर्शनासाठी आले होते. आपल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी येथे अगस्ती ऋषींच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगावर त्यांनी
महारूद्राभिषेक केला. ओंकनाथ या नावाने हे शिवलिंग ओळखले जात असे. त्यालाच ओंकारनाथ या नावानेही संबोधले जाते. या मंदिराची आणखी एक आख्यायिका अशी की विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत आलेले अगस्ती ऋषी येथील भोकर नदीच्या काठावरून जात असताना त्यांना एक अद्भूत दृश्य दिसले. नदीकाठच्या एका जागी एक पांढरीशुभ्र गाय उभी होती व तिच्या आचळांतून दुग्धधारा गळत होत्या.
अगस्ती ऋषींनी तेथे जाऊन पाहिले. त्यावेळी तेथून एक शिवलिंग प्रकट झाले. त्यांनी त्याच ठिकाणी शिवलिंगाची विधिवत् प्रतिष्ठापना केली व त्यास ओंकनाथ असे नाव दिले. या जागी आता ओंकारेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. या मंदिरात येऊन नाथयोग्यांनीही ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. या परिसरात गोपीचंद राजाच्या नावाने ओळखली जाणारी एक टेकडी आहे. ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथातील कथेनुसार तो गौडबंगाल देशातील हेलपट्टण गावचा राजा होता. नंतर तो नाथपंथी बैरागी झाला. स्थानिक माहात्म्य कथेनुसार येथील टेकडीवर त्याला भेटण्यासाठी
मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आदी अवतारी नाथयोगी येत असत, तेव्हा ते या मंदिरातही दर्शनासाठी येत असत.
भोकर नदीच्या काठी निसर्गरम्य अशा परिसरात हे मंदिर वसले आहे. मंदिरास चोहोबाजूंनी आवारभिंत आहे. आवारास मोठे प्रवेशद्वार आहे. त्यावर मध्यभागी मेघडंबरीमध्ये गोपालकृष्णाची बासुरी वाजवतानाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या छोट्या मेघडंबरींमध्ये ऋषीमूर्ती बसवलेल्या आहेत. येथून आत येताच डावीकडे ओंकारेश्वराचे मंदिर आहे. मोठा नंदीमंडप, त्यासमोर उपसभामंडप, मुख्य सभामंडप आणि एका शेजारी एक अशी तीन गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. घुमटाकार कळस असलेल्या नंदीमंडपात नंदीची मोठी पाषाणमूर्ती आहे. त्यासमोरील उपसभामंडपात शिवपिंडी आहे. मुख्य सभामंडपातही एका संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहांच्या बाह्यभिंतीमध्ये उजव्या सोंडेचा गणेश आणि भैरवनाथाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील दशावतारांची उठावशिल्पे बसवलेली आहेत. त्यात नंदीवर
विराजमान असलेल्या शंकर–पार्वतीचेही शिल्प आहे. डावीकडील गर्भगृहात शेषशायी विष्णू व लक्ष्मीची, तर उजवीकडे विठ्ठल–रुक्मिणीची मूर्ती विराजमान आहे. मधल्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार दगडी बांधकामाचे आहे. द्वारचौकटीवर पाना–फुलांची नक्षी कोरलेली आहे व खालच्या बाजूस द्वारपालांच्या मूर्ती आहेत. द्वारचौकटीच्या मंडारकावर अर्धचंद्रशीला व दोन्ही बाजूंना किर्तीमुखे कोरलेली आहेत. त्यासमोर दगडात कोरलेली नक्षी आहे. त्यात शंखाची शुभचिन्हेही कोरलेली आहेत. आत भूतलावर खोलगट भागात ओंकारेश्वर महादेवाची पिंडी प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीतील देवळीत पार्वतीची सुबक मूर्ती आहे. येथे एका कोपऱ्यात महादेवाचा पंचधातूचा मोठा मुखवटा ठेवलेला आहे.
मंदिराच्या आवारात उंच दीपस्तंभ आहे. नजीकच महाकाळ भैरवनाथाचे स्थान आहे. या शिवाय मंदिर परिसरात हनुमानाचे आणि कार्तिकस्वामींचे, तसेच श्रीरामाचे मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. या मंदिरात काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिरात पाषाणात कोरलेली षट्मुखी कार्तिकस्वामींची मूर्ती आहे. या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे.
येथील श्रीराम मंदिर हे एका छोट्या टेकडीवर वसले आहे. काही पायऱ्या चढून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. मोठा सभामंडप, त्यात प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह आणि गर्भगृहावर मराठा काळातील स्थापत्यशैलीतील उंच शिखर आहे. या शिखरावर चारही बाजूंनी असलेल्या देवकोष्ठकांत विविध देव–देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात छोट्याशा देवळीत हनुमाची मूर्ती आहे. गर्भगृहात उंच संगमरवरी वज्रपिठावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच भरत आणि शत्रुघ्न यांच्याही मूर्ती आहेत. अशा प्रकारे अवघा रामपरिवार एकत्र असलेले मंदिर दुर्मिळ आहे.
या मंदिरात महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, ऋषिपंचमी, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आषाढी एकादशीनिमित्त तामसवाडी, मोरगाव, वाघोड, बोरगाव, केऱ्हाळे, भोकरी, रावेर, अहिरवाडी, पाडळे, निरूळ या आजूबाजूच्या गावातील वारकऱ्यांच्या पायी दिंड्या येथे येतात. साधारणपणे पाच ते सहा हजार वारकरी या वेळी या मंदिरात दर्शनाला येतात.