निंबादेवी संस्थान

निंबोळा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

नांदुरा तालुक्यातील निंबोळा येथील निंबादेवी संस्थान हे सरस्वती, विश्वगंगा आणि कमळजा या नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे ‘प्रति प्रयाग’ म्हणून प्रख्यात आहे. स्कंदपुराणात उल्लेख असलेले हे प्राचीन क्षेत्र प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. येथे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीन आदिशक्ती बाणरूपाने अधिष्ठित आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेतरक्षाही याच संगमावर विसर्जित करण्यात आली होती. या पवित्र संगमावर अस्थिविसर्जन केल्यास मृतात्म्यास मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने हे स्थान विदर्भातील एक प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे.

निंबादेवी ही देवी दुर्गेचा एक अवतार आहे आणि तिची निर्मिती दुष्टसंहारासाठी झाली आहे, अशी मान्यता आहे. कडुलिंबाच्या (निंब) वृक्षाखाली वास्तव्य असल्याने किंवा आरोग्याशी संबंधित गुणांमुळे तिला निंबादेवी हे नामाभिधान प्राप्त झाले. या मंदिराचा वारसा अत्यंत प्राचीन आहे. पौराणिक कथांनुसार, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासादरम्यान या भागात वास्तव्य करून आदिशक्तीची उपासना केली होती. ऐतिहासिक कालखंडात हा परिसर १३ व्या आणि १४ व्या शतकात निजाम आणि मुघलांच्या शासनाखाली होता, तर १३९९ मध्ये मलकापूरने बहमनी सुलतानशाहीपासून स्वातंत्र्य मिळवले होते. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोहिमांच्या दरम्यान आणि सिंदखेड राजा येथे आपल्या आजोळी जाताना निंबादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असत.

मंदिराच्या स्थापत्याचा विचार केल्यास, शिखरावर कोरलेल्या ६४ योगिनींच्या दुर्मिळ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य ठरते. देशात ६४ योगिनींची मंदिरे अत्यंत दुर्मिळ समजली जातात. तांत्रिक परंपरेनुसार या योगिनी आदिशक्तीच्या विविध कलांचे प्रतीक आहेत. त्यांनी रक्तबीज आणि अंधकासुर या राक्षसांच्या रक्ताचा थेंब न थेंब पिऊन त्यांचा पुनर्जन्म रोखला होता, असे मानले जाते. मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन शक्तींचे बाणरूपाने दर्शन घडते. पूर्वी हे मंदिर हेमांडपंती शैलीत होते; मात्र कालौघात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य परिसरात नागनाथांची समाधी, उंच टेकडीवरील हनुमानाचे जागृत स्थान आणि बालकदासजी महाराजांचा आश्रम आहे. गोमुखाच्या पूर्व दिशेला एक रहस्यमय भुयारी मार्ग आहे. तेथे संत कमळनाथांचा वास असल्याची श्रद्धा आहे. परकीय आक्रमणावेळी मूर्तींच्या रक्षणासाठी हे भुयार वापरले जात असे, असे सांगितले जाते.

मंदिर परिसरात पूजासाहित्य तसेच प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मंदिराशेजारी एक यज्ञशाळा आहे. उत्सवांप्रसंगी येथे होम-हवन केले जाते. प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मोठ्या सभामंडपात मध्यभागी एक भलीमोठी पितळी समई अखंड तेवत असते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुबक कलाकुसर व कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. त्यावरील भागातही सुंदर नक्षीकाम असून येथे देवीची मूर्तीही कोरलेली आहे. गर्भगृहात आकर्षक कोरीव कलाकुसर असलेल्या संगमरवरी मखरामध्ये देवींचे बाण आहेत. देवींना दररोज विविध अलंकार व वस्त्रांनी सजविले जाते. बाणांवर चांदीचे मुखवटे आहेत. देवींच्या दोन्ही बाजूंना सिंहांची शिल्पे आहेत. मखरात दोन्ही बाजूंना त्रिशूळ आहेत.

मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. शिखरावर वरच्या बाजूने निमुळते होत जाणारे पाच स्तर आहेत. त्यांमध्ये देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांमध्ये ६४ योगिनींच्या मूर्ती विराजमान आहेत. वरच्या बाजूला द्विस्तरीय आमलक असून त्यावर पंचधातूचे कळस आहेत. त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी मंदिराजवळून पायऱ्या आहेत. या पायरी मार्गावर भैरवनाथ तसेच आसरा मातांचे स्थान लागते. येथील झाडांच्या फांद्यांवर नवसाचे ‘भार’ लावलेले आढळतात. अनेक निपुत्रिक दाम्पत्य देवींसमोर अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलतात. अपत्य झाल्यावर ते आपल्या बालकांना येथील झाडांखाली टांगलेल्या पाळण्यांमध्ये काही काळ ठेवतात. भाविक येथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घेतात आणि येथील तीर्थ घरीही घेऊन जातात.

या देवी कोणालाही रिक्त हस्ते माघारी पाठवत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक जण येथे दर्शनासाठी येतात. मंगळवार हा देवींचा वार समजला जातो, त्यामुळे या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दर पौर्णिमेला देवींवर अभिषेक केला जातो. भाविक देवींची खणा-नारळाने ओटी भरून नऊ पुरणपोळ्या, उडीद डाळीचे वडे, दही-भात, पापड असा नैवेद्य अर्पण करतात. या वेळी नऊ दिव्यांनी देवीला ओवाळले जाते. आलेल्या भाविकांना पंचमेव्याचा प्रसाद दिला जातो. अनेक भाविक मंदिर परिसरात भंडारेही देतात. दर सोमवारी, शिवरात्री, सोमवती अमावस्या तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविक नदीपात्रातील स्वयंभू शिवलिंगांवर दुग्धाभिषेक करतात. चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. त्यात मातीच्या मडक्यांची (गाडगी) विक्री करण्याची परंपरा आजही जपली जाते. चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सवात शेजारीच असलेल्या कोकलवाडी गावासह आसपासच्या गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मुलांच्या पहिल्या जावळ विधीसाठी (चुडाकर्म संस्कार) हे स्थान संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • नांदुरा येथून १८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ४७ किमी अंतरावर
  • नांदुरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७०२०९५५६८५

निम्बादेवी संस्थान

निम्बाला, ताल. नांदुरा, जिला. बुलढाणा

Back To Home