निराकार मंदिर

माशें-लोलये, ता. काणकोण, जि. दक्षिण गोवा

ईश्वरवादामध्ये ईश्वर हा निर्गुण, निराकार आणि निर्विकल्प मानण्यात आला आहे. आध्यात्मिक गूढवादात ईश्वर हा इंद्रियगोचर पसाऱ्यापलीकडील असल्याचे म्हटले आहे. तो निराकार असल्याने त्यावर कोणतेही गुणधर्म लादता येत नाही. प्राचीन काळापासून ईश्वराच्या सगुण साकार रूपाबरोबरच निराकाराचीही उपासना केली जात आहे. माशें या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे निराकाराचे मंदिर आहे आणि त्यात निराकार म्हणून पूजली जाणारी देवता एका कोरीव स्तंभाच्या रुपात विराजमान आहे. लोकमान्यतेनुसार हे मंदिर विष्णुअवताराशी संबंधित आहे.

पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृती कोशा’नुसार, निराकारी म्हणजे आकाररहीत अथवा प्रतीकावाचून कल्पिलेली देवता. तिची कोकणात अनेक स्थाने आहेत. लोकधारणेत निराकार या शब्दास आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे निरू अर्थात पाण्यापासून निर्माण झालेला किंवा पाण्यातून वर आलेला. माशें येथील मंदिरातील निराकार हा पाण्याशी संबंधित असल्याचे येथे मानले जाते. असे सांगितले जाते की आज ज्या ठिकाणी निराकारचे देवस्थान आहे, तेथे नदीकाठी भूभाग होता. ओहोटीच्या वेळी एक गाय या भूभागावर येत असे व तेथील विशिष्ट ठिकाणी पान्हा सोडत असे. काही नाविकांनी कुतुहलाने ती गाय तेथे पान्हा का सोडते याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना वाळूत गाडलेला एक स्तंभ सापडला. त्या स्तंभास निराकार असे संबोधले गेले व त्यासाठी मंदिर बांधण्यात आले.

मंदिराविषयीच्या अन्य एका आख्यायिकेनुसार, हे मंदिर विष्णुच्या नरसिंह अवताराशी संबंधित आहे. भागवत पुराणातील कथेनुसार, हिरण्यकश्यपूच्या (मूळ संस्कृत नाम – हिरण्यकशिपू) नाशाकरीता भक्त प्रल्हादाच्या याचनेवरून भगवान विष्णुने नरसिंहाचा अवतार धारण केला व तो त्या दैत्यराजाच्या दरबारातील स्तंभातून प्रकट झाला. निराकाराचा स्तंभ त्यामुळेच नरसिंहाचे प्रतीक मानले जाते. मंदिरातील शिलालेखातही हे मंदिर विष्णूअवताराशी संबधित असल्याचे नमूद आहे. गावातील जाणकार ज्येष्ठांच्या मते, येथे मुळात विष्णूमूर्ती होती. पोर्तुगीज काळात मंदिरांवर हल्ले करून मूर्तींचा नाश केला जात असे. त्यावेळी या मंदिरातील मूळ मूर्ती लपवून तत्कालिन लोकांनी एका स्तंभांची पूजा सुरू केली. १९९४च्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर या प्राचीन मंदिराच्या गर्भगृहाचा जीर्णोद्धार करण्यात आला.

या मंदिराची रचना पारंपरिक गोमंतकीय स्थापत्यशैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिर उभारणीत लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच गोमंतकीय पद्धतीची दीपमाळ आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी मधोमध हनुमानाची घुमटी आहे. अर्धखुल्या प्रकारच्या सभामंडपात गोलाकार स्तंभांची रांग आहे. त्यावर लाकडी कठडे असलेला सज्जा आहे. सभामंडपास उतरते कौलारू छत आहे. येथून तीन पायऱ्या चढून अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या दर्शनीभिंतीवर, कमानदार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गरुड आणि हनुमानाची धातूत कोरलेली उठावशिल्पे आहेत. मंदिराचा महामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. रुंद घेर असलेले गोलाकार स्तंभ, त्यावर भक्कम लाकडी तुळया आणि लाकडी छत, त्यावर टांगलेल्या काचेच्या हंड्या, बाजूच्या भिंतींलगत बैठकीचा ओटा, असे या महामंडपाचे स्वरूप आहे. मंदिराच्या अंतराळास लाकडी चौकटी असून त्यात उभे गज लावलेले आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहात चांदीच्या महिरपीत निराकार पाषाणाचा स्तंभ स्थापित आहे. या महिरपीच्या स्तंभांवर डावीकडे हनुमानाची, तर उजवीकडे गरूडाची मूर्ती आहे. शीर्षस्थानी मध्यभागी कीर्तिमुख आहे. तर महिरपीच्या समोर भूतलावर निराकाराची सगुण साकार प्रतिमा विराजमान आहे. असे सांगण्यात येते की येथे पूर्वी उंच व भरदार घेर असलेल्या एका लाकडी स्तंभाची येथे पूजा केली जात असे. उत्सवाच्या वेळी या स्तंभास मुखवटा लावला जाई. कालांतराने तो स्तंभ बदलला जाई. मोठया घेराच्या व कोणताही संसर्ग न झालेल्या फणसवृक्षाच्या खोडापासून हा स्तंभ साकारला जाई. परंतु बदलत्या काळात सर्वार्थाने योग्य वृक्ष मिळणे कठीण झाल्यामुळे गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश विद्याधिराजतीर्थ श्रीपादवडेर स्वामी यांच्या सल्ल्यानुसार येथे हा पाषाणी स्तंभ बसविण्यात आला. १९९४ मध्ये गर्भगृहाच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या पाषाणी स्तंभाची येथे स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचवेळी मंदिराच्या ताम्रपत्रांकित शिखरावर सुवर्णलेपित कलशाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर पंचायतनाचा भाग आहे. या पंचायतनात गणेश (चतुर्भुज रूप), सूर्य (मार्तंड भैरव), कार्तिकेय, बेटाळ (रक्षक आत्मा) आणि रवळनाथ यांचा समावेश आहे.

मुख्य मंदिरात सकाळी ६ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ८ या काळात भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिरातील मुख्य उत्सव येथील जत्रोत्सव आहे. तो चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पालखी मिरवणूक, आरती, भजन-कीर्तन आणि अन्नदान होते. त्यात हजारो भक्त सहभागी होतात. अन्य उत्सवांत महाशिवरात्र, हनुमान जयंती, गणेश चतुर्थी आणि नवरात्र यांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रत्येक पौर्णिमेला येथे रथोत्सव, पालखी उत्सव असतो. मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ आहे. मंदिराशेजारील इमारतीत एक सभागृहही आहे. त्याच प्रमाणे येथे भक्तांसाठी निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे.

उपयुक्त माहिती

  • काणकोण येथून ७ किमी आणि मडगावपासून ४४ किमी अंतरावर
  • काणकोण येथून राज्य परिवहन बस व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीच्या सुविधा आहेत
  • संपर्क : राजेंद्र वारीक, मो. ९६०४७४७२१९,
  • मिना वारीक, मो. ८८०६७२६८९०

निराकार मंदिर

माशें-लोलये, ता. काणकोण, जि. दक्षिण गोवा

Back To Home