धाराशिव जिल्ह्यातील लोहारा या तालुक्याच्या शहरात महादेवाचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. नीलकंठेश्वर मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष श्रीरामांनी केल्याची मान्यता आहे. या मंदिरातून आजही रात्री शिल्पकाम सुरू असल्याचे आवाज येतात व पहाटे जमिनीवर दगडांचे बारीक तुकडे आढळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते. जिल्ह्यातील महत्त्वाच्या यात्रोत्सवांमध्ये या उत्सवाचा समावेश असतो.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर यादवकालीन असल्याचे सांगितले जाते.
शिव पुराणानुसार देव व राक्षसांनी मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून समुद्र मंथन केले तेव्हा समुद्रातून अनेक रत्नांसोबत हलाहल विष निघाले. या विषाच्या प्रभावाने जीवसृष्टी नाहीशी होण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा सर्व देवांनी या संकटापासून वाचवण्यासाठी महादेवाला विनवणी केली. महादेवाने हलाहल विष प्राशन करून समस्त पृथ्वीला संकटातून वाचवले. विषाच्या प्रभावाने महादेवाचा कंठ निळा पडला व तेव्हापासून देवाला नीलकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. या नीलकंठेश्वराची मंदिरे देशभर आढळतात.
श्रीराम वनवासात असताना त्यांनी अनेक ठिकाणी महादेवाची पूजा केली अथवा शिवपिंडी स्थापन केल्या. लोहारा येथील हे मंदिर त्यापैकीच एक असल्याची आख्यायिका प्रचलीत आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी संरचना असलेल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात काही प्राचीन पाषाण मूर्ती, वीरगळ व शिवपिंडी आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांचे चौथरे व प्रवेशद्वारावर त्रिकोणी कमान आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वार चार फूट उंचीचे अर्थात लहान आहे. प्रवेशद्वारातून आत जाताना भाविकांनी नम्र असावे, या उद्देशाने अशी लहान प्रवेशद्वारे असल्याचे सांगितले जाते.
सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे आहेत. शीर्षभागी वर्तुळाकार कणी, त्यावर हस्त व तुळई आहेत. अष्टकोनी वितानावर बारीक कलाकुसरीच्या व मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात जमिनीवर प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर काळ्या पाषाणातील दोन नंदी मूर्ती आहेत. त्यातील एक नंदी प्राचीन व दुसरा नवसाचा आहे. याबाबत असे सांगितले जाते की एकदा गावच्या मानकऱ्याचा उमदा बैल हरवला. तेव्हा त्यांनी नीलकंठेश्वराला नवस केला की माझा बैल सापडला तर तुझ्या दारात नंदी बसवेन. मानकऱ्याचा बैल सापडल्यावर नवस फेडण्यासाठी त्यांनी दुसरा नंदी देवाच्या दारात अर्पण केला.
नंदीच्या चौथऱ्यापुढे चार स्तंभांच्या मधोमध काही इंच उंच चौकोनी रंगशिळा आहे. पूर्वी या रंगशिळेवर नृत्य गायनाचे कार्यक्रम सादर केले जात असत. यापुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळाच्या जमिनीवर कासव शिल्प आहे. अंतराळात भिंतीत चार नक्षीदार स्तंभ व वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. बाजूला नाग, पार्वती व गणपती यांची अर्धवट कोरलेली शिल्पे आहेत. अंतराळात हवा खेळती राहण्यासाठी गवाक्ष आहेत. यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस खाली उठावशैलीतील द्वारपाल नाग शिल्प आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व स्तंभशाखांवर कमळ फुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व उत्तरांगेवर तोरण नक्षी आहे. गर्भगृहात प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिपापिंडीतील लिंगपाषाणात एक लहान छिद्र आहे. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी या छिद्रातून गंगा अवतीर्ण होते, असे सांगितले जाते. गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत.
मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आदी सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक सोमवारी, पौर्णिमा, अमावस्येला भाविकांची येथे गर्दी असते.