नर्मदेश्वर महादेव मंदिर

मानखुर्द, मंडाला (पू.), मुंबई

मानखुर्द हे उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरचे महामुंबईतील अखेरचे उपनगर. येथून पुढे वाशीच्या खाडीवरील पुलाने हे शहर नवी मुंबईशी जोडण्यात आले आहे. प्राचीन काळी एक छोटेसे दुर्लक्षित गाव असलेल्या आणि आज लक्षावधी कामगारांना, मध्यमवर्गाला कवेत घेणाऱ्या मानखुर्दमध्ये नर्मदेश्वर महादेवास समर्पित असलेले मंदिर वसलेले आहे. हे मंदिर किमान ११२ वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर या परिसरातील असंख्य शिवभक्तांच्या आस्थेचे केंद्र आहे. दर श्रावणी सोमवारी केली जाणारी बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे.

साष्टी (सालशेत) बेटसमूहातील ट्रॉम्बे या बेटावरील मानखुर्द, मंडाला ही विरळ लोकवस्तीची गावे होती. मासेमारी आणि मिठागरे हा येथील मूळ रहिवाशांचा मुख्य व्यवसाय होता. ट्रॉम्बे बंदरावरून मोठ्या प्रमाणावर मिठाची वाहतूक होत असे. त्यातही हे लोक काम करीत असत. या गावाचे एका उपनगरात रूपांतर होण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरले ते शीवचा पूल आणि मुंबईतील रेल्वेचा विस्तार. जानेवारी १८०५ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आल्यानंतर हा भाग मुंबई बेटाशी जोडला गेला. हिंदुस्थानातील १८५७ चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी मुंबई ते ठाणे यांदरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाली. त्यानंतर १९०६ मध्ये कुर्ला ते चेंबूर हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला.

ही रेल्वे म्हणजे मूलतः कचरागाडी होती. कचरा वाहतुकीसाठी हा मार्ग उभारण्यात आला होता. चेंबूर, मानखुर्द, मंडाला आदी परिसरात या कचऱ्याचा भराव घालून येथे मोठ्या प्रमाणावर जमीन तयार करण्यात आली. ४ फेब्रुवारी १९२४ रोजी हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला आणि १ जुलै १९२७ रोजी तो पुढे मंडाला (नंतरचे मानखुर्द) येथे पोहोचला आणि मानखुर्द रेल्वे स्थानक सुरू झाले. अशा पायाभूत सुविधांमुळे घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द येथील विकासास गती मिळाली.

येथील नर्मदेश्वर महादेवाचे मंदिर हे मानखुर्द स्थानक अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनचे आहे. असे सांगितले जाते की या परिसरात जमनादास विसनजी ठक्कर नावाचे भाटिया समाजातील व्यापारी राहत असत. त्यांची महादेवावर परम श्रद्धा होती. त्यांनी एकदा पवित्र नर्मदा नदीतून बाणलिंग आणले. मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या पात्रात काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या शिवलिंगाचा आकार धारण केलेले लंबवर्तुळाकार पाषाण आढळतात. धार्मिक श्रद्धेनुसार, हे पाषाण म्हणजे शिवशंकराचे निराकार रूप असते. या पाषाणांना बाणलिंग असे म्हणतात व ते अत्यंत पवित्र मानले जातात. जमनादास ठक्कर यांनी सन १९१४ मध्ये मानखुर्दमध्ये एका मोठ्या जागेत शिवालयाची उभारणी करून त्यात या बाणलिंगाची प्रतिष्ठापना केली. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धार आणि नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मानखुर्द, मंडालाच्या शांत परिसरात विस्तीर्ण प्रांगणात हे मंदिर वसले आहे. हिरव्यागार झाडांनी सुशोभित असलेल्या या प्रांगणाला मोठे प्रवेशद्वार आहे. येथे सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. येथे मंदिरातील धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचा छोटा मंडप आहे. पुढे मंदिराचे मुख्य अंगण आहे. त्यात पत्र्याची मोठी शेड असून या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी बाकडे आणि खुर्च्यांची सोय केलेली आहे. या शेडखालीच आधुनिक बांधकाम शैलीतील नर्मदेश्वराचे मंदिर स्थित आहे. मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. येथील सभामंडप आणि अर्धमंडप अर्ध खुल्या स्वरूपाचे आहेत. सभामंडपासमोर मोठे तुळशीवृंदावन आहे. सभामंडपाला दंडगोलाकार कमानीचे प्रवेशद्वार आहे. येथून दोन पायऱ्या चढून अर्धमंडपात प्रवेश होतो. या अर्धमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे तोंड असलेली संगमरवरी देवळी आहे. त्यात गणेशाची कमलपुष्पावर बसलेली संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.

या मंदिराला एकमेकांना खेटून मुख्य आणि उप अशी दोन गर्भगृहे आहेत. मुख्य गर्भागृह नर्मदेश्वर महादेवाला समर्पित आहे. त्याच्या प्रवेशद्वारासमोर संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. त्यासमोर कूर्मशिल्प आहे. गर्भागृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत गणपती, भैरव आणि शीतलामाता यांच्या शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीवर नर्मदेश्वराची पिंड प्रतिष्ठापित आहे. पिंडीच्या शाळुंकेचा आकार छोटा असून त्यात बाणलिंग आहे. पुष्पमालांनी शृंगारलेल्या या लिंगाला पितळी नागमूर्तीने विळखा घालून त्यावर फण्याचे छत्र धरलेले आहे. त्यावर पितळेचे अभिषेकपात्र आहे. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीवरील देवळीत पार्वतीची संगमरवरी मूर्ती आहे. येथे भिंतीवर डमरू आणि त्रिशूळ लावलेले आहेत. या गर्भगृहाला खेटून असलेल्या उपगर्भगृहात घुमटाकार शिखर असलेल्या देवळीत हनुमानाची पाषाणमूर्ती प्रतिष्ठापित आहे. या शेंदूरचर्चित मूर्तीला गुजराती पद्धतीप्रमाणे सोनेरी वर्खाचा लेप दिलेला आहे. मूर्तीच्या मस्तकी सुवर्णरंगी मुकुट आहे, तर समोर मोठी गदा आहे. हनुमानाच्या या गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे.

या मंदिरात पहाटे सहा वाजल्यापासूनच भक्तमंडळींची दर्शनासाठी वर्दळ सुरू होते. मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात येथे शंभर लघुरुद्र अभिषेक केले जातात. तसेच दर श्रावणी सोमवारी येथे बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना केली जाते. या दिवशी येथे अन्नपूजा तसेच कमलपूजा केली जाते. त्याचप्रमाणे भाविकांना भजी आणि चुरमुऱ्याचा लाडू प्रसाद म्हणून दिला जातो. मंदिरात रोज सायंकाळी ७ वाजता केल्या जाणाऱ्या आरतीमध्ये भाविक ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी होऊ शकतात. त्याकरिता मंदिरात असलेला क्यूआर कोड प्रथम स्कॅन करणे आवश्यक आहे. या मंदिरात दशक्रिया विधीचीही व्यवस्था केली जाते. हे मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत खुले असते. श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहते.

उपयुक्त माहिती

  • मानखुर्द रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • चेंबूर एसटी बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२ २५५१२३९२

नर्मदेश्वर महादेव मंदिर

मानखुर्द, मंडला (पूर्व), मुंबई

Back To Home