रामटेक शहरापासून जवळ असलेले तीर्थक्षेत्र आंबाळा व त्याला लागून असलेल्या नारायण टेकडीवरील भव्य असे नारायण स्वामी दरबार ही प्राचीन काळापासून संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे श्री सद्गुरू नारायण स्वामी महाराज यांनी ५०० वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली. येथील वैशिष्ट्य असे की सद्गुरू नारायण स्वामी यांनी ज्या वेळी जिवंत समाधी घेतली, त्यावेळी त्यांनी स्वहस्ते लावलेली ज्योत ५०० वर्षांनंतर आजही येथे अखंड तेवत आहे. त्यामुळे या दरबाराला ज्योतिस्वरूप सद्गुरू दरबार असेही म्हणतात.
रामटेक डोंगर रांगांच्या पायथ्याशी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या तलावाला आंबाळा तलाव म्हटले जाते. या तलावाचे परिक्षेत्र १,३३,५०० चौरस मीटर आहे. तलावाच्या काठावर अनेक ऋषी–मुनींचे आश्रम, पुरातन मंदिरे व स्मारके आहेत. यामध्ये प्राचीन दुमजली शिवमंदिर, सूर्यमंदिर, चंद्रमोळी मंदिर, मराठे सरदार मुधोजी भोसले यांच्या पत्नी चिमाबाई भोसले यांची समाधी यांसह ३३ मंदिरे व स्मारके आहेत. यातील अनेक मंदिरे ही गोंड व भोसले कालीन असून काही त्यानंतरची आहेत. या तलावाजवळ प्राचीन काळापासून दशक्रिया विधी होतात. नाशिकप्रमाणे येथील पंडितांकडेही अनेक घराण्यांच्या वंशावळी आहेत. आंबाळा तलाव व येथील परिसर यादव काळापासून एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र व श्रद्धास्थान मानले जाते. या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे. राज्य सरकारकडून आंबाळा तलाव परिसराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देण्यात आला आहे.
आंबाळा तलावाला लागून असलेल्या नारायण टेकडीवर सद्गुरू नारायण स्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे. असे सांगितले जाते की सुमारे ५०० वर्षांपूर्वी नारायण स्वामी महाराजांनी येथे तपसाधना केली होती. प्रत्यक्ष महालक्ष्मीने प्रकट होऊन नारायण स्वामींना दर्शन देऊन गुप्त रूपाने या टेकडीवर माझे वास्तव्य राहील, असा वर दिला होता. सद्गुरू नारायण बाबांनीही समाधी घेण्यापूर्वी आपले प्राण शेषामध्ये टाकले होते. त्यामुळे आजही नारायण स्वामी शेषरुपात व महालक्ष्मीचा गुप्त रुपात या टेकडीवर वावर असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
विविध ग्रंथांमधील उल्लेखानुसार, संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी या ठिकाणी १२ वर्षे साधना केली होती. याशिवाय योगिराज स्वामी सीतारामदास महाराज, माताजी गौरीशंकर महाराज, संत दामोदरदास महाराज आदींनी नारायण टेकडीवर राहून अनेक वर्षें तपश्चर्या केली होती. या संतांनी साधनेसाठी रामटेक गडावरील श्रीरामांचे मंदिर आणि नागार्जुन स्वामी यांचे मंदिर यामधील निसर्गसमृद्ध पर्वतावरील जागेची (सध्याची नारायण टेकडी) निवड केली होती.
नारायण टेकडीला चहूबाजूंनी विकसित करण्याचे श्रेय श्री दत्तगुरू बालयोगी छोटूबाबा यांना जाते. त्यांनी या नारायण टेकडीचा कायापालट करून येथे भव्य असे मंदिर उभारले. छोटूबाबा यांचा जन्म रामटेकमधील आंबाळा परिसरात झाला. १९८६ मध्ये ते या ठिकाणी आले. त्यांनी एका जागेवर बसून साडेतीन वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा सद्गुरू नारायण स्वामींनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. नारायण स्वामींनी दिलेल्या आदेशानुसार छोटूबाबांनी येथे १८ ते २६ डिसेंबर या काळात नारायण बाबांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या काळात ‘ओम नमो नारायणाय’ या महामंत्राचा अखंड जप येथे सुरू असतो. याशिवाय विधिवत पूजा, अभिषेक, भजन, कीर्तन तसेच प्रवचने सुरू असतात. या ९ दिवसांमध्ये आलेल्या भाविकांना रोज महाप्रसाद दिला जातो. हा उत्सव येथील मोठा उत्सव असतो व त्यासाठी विदर्भासह महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक येथे उपस्थित असतात.
आंबाळा तलावाला लागून नारायण टेकडीवर जाण्यासाठी पायरी मार्ग व रस्ता मार्ग आहे. तलावाच्या बाजूने असणाऱ्या पायरी मार्गावर वैशिष्ट्यपूर्ण कमान असून त्यावर भव्य असे गरुडशिल्प आहे. नारायण टेकडीवर असलेले मुख्य मंदिर हे प्रशस्त असून त्याचे बांधकाम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. यामध्ये राजस्थानी लालसर दगड व संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय येथील मंदिराचे शिखर हे संपूर्ण निळ्या काचेचे व पारदर्शक आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या समाधीवर दिवसभर या काचेतून निळसर प्रकाश पडत असतो. संपूर्ण मंदिर परिसरात फरसबंदी करण्यात आली असून तेथे सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. मंदिरासमोर अनेक मोठमोठ्या कुंड्यांमध्ये शोभेची व फुलझाडे लावण्यात आल्यामुळे हा संपूर्ण परिसर खुलून दिसतो.
बालयोगी छोटूबाबा हे ६ डिसेंबर २००८ रोजी ब्रह्मलीन झाले. नारायण स्वामी दरबार मंदिराच्या बाजूला छोटूबाबा यांचे समाधी मंदिर आहे. १९ फेब्रुवारीला बालयोगी छोटूबाबा यांचा प्रकटदिन महोत्सव, त्यानंतर गुरुपौर्णिमा महोत्सव व १८ ते २६ डिसेंबर या काळात नारायण बाबांचा पुण्यतिथी महोत्सव; असे उत्सव येथे साजरे केले जातात.
सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत नारायण स्वामी दरबारात भाविकांना समाधीचे दर्शन घेता येते. गुरुवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत स्वामींच्या समाधीवर अभिषेक करण्यात येतो. तसेच दररोज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आलेल्या भाविकांना येथे महाप्रसादाची सुविधा आहे.