नृसिंह सरस्वती पादुका मंदिर

नरसोबाची वाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले अमरापूर गाव हे प्राचीन काळापासून सिद्धस्थान असल्याची मान्यता आहे. या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. अमरेश्वराच्या सेवेत असलेल्या ६४ योगिनी या ठिकाणी वास करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की येथील स्थान महात्म्यामुळे अनेक सिद्ध पुरुषांनी या परिसरात तप साधना केली होती. श्री दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार अशी मान्यता असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी यांनीही या ठिकाणी १२ वर्षे तपसाधना केली व येथून निघताना त्यांनी श्रीदत्त पादुकांची स्थापना केली. श्री नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्यामुळे गावास नृसिंह वाडी / नरसोबाची वाडी हे नाव पडले. रोज हजारो भाविक या पादुका मंदिरात दर्शनासाठी येतात

‘मध्ययुगीन महाराष्ट्र – सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन’ या प्रा. म. श्री. माटे यांच्या ग्रंथानुसार, ‘मध्ययुगीन महाराष्ट्रात जे पंथ उदयाला आले, त्यांपैकी दत्त संप्रदाय हा एक आहे. महानुभाव पंथाप्रमाणेच दत्त संप्रदाय हाही मुख्यत्त्वे महाराष्ट्रातच प्रचलित आहे. या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक हा मान श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांना जातो. या दोघांनीही पारंपरिक पद्धतीने वेदाध्ययन केलेले होते, तीर्थाटने केलेली होती आणि दोघांनाही योगमार्गात मोठा अधिकार प्राप्त झालेला होता, असे गुरूचरित्र या ग्रंथावरून दिसते.’ नृसिंह सरस्वती यांना त्यांचे भक्त दत्तात्रेयाचा अवतार मानतात. महाराष्ट्रात हसन गंगू बहमनी याने सल्तनत स्थापन केली असतानाच्या काळात, इ.स. १३७८ मध्ये वाशीम जिल्ह्यातील लाडाचे करंजा येथे नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला.

इ.स. १५४८ (शके १४७०)च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्र’ या ग्रंथात नृसिंह सरस्वती यांचे जीवनचरित्र सांगितले आहे. त्यातील ११व्या अध्यायात असे म्हटले आहे की ‘जन्म होतांचि तो बालक।ॐकार शब्द म्हणतसे अलौलिक।’ म्हणजे जन्म झाल्यावर लगेचच त्यांच्या मुखातून ॐकार जप सुरू झाला. कधीही ते सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना याचे आश्चर्य वाटू लागले होते. त्यावेळच्या ज्योतिषांनी हा मुलगा ‘पूज्य होईल त्रिभुवनांत। याचे दर्शनमात्रें पतित। पुनीत होतील परियेसीं।।’ असे जातक वर्तविले होते. गुरुचरित्रानुसार त्यांचे जन्मनाम शाळीग्राम असे होते. मात्र त्यांना नरहरी असेच म्हटले जाई. ते सात वर्षांचे होई पर्यंत ॐकाराखेरीज त्यांना कोणताच शब्द बोलता येत नसे.

वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे १३८८ साली त्यांना वाराणसी येथील वृद्ध यती श्रीकृष्ण सरस्वती यांनी संन्यासदीक्षा दिली. त्यानंतर तीर्थाटन करीत ते १४२१ साली पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या अमरापूर गावी आले. तेव्हा म्हणजे १४२१ व १४२२ या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या काळात नृसिंह सरस्वती यांनी येथे १२ वर्षे तपसाधना केली. १४३४ साली येथून गाणगापूर क्षेत्री निघताना ६४ योगिनींच्या विनंतीवरून त्यांनी संगमाच्या तीरावर औदुंबर वृक्षाखाली वालुकामय मनोहर पादुका व अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली. या पादुका चंद्रकांत पाषाणात (मूनस्टोन) घडविल्या असाव्यात, म्हणूनच सतत होणाऱ्या जलाभिषेकाने त्या झिजत नाहीत, असे सांगितले जाते. या पादुकांच्या ठायी केलेली दत्तसेवा फलद्रूप होईल, असा वर स्वामींनी दिला असल्याने या पादुकांचे दर्शन घेतल्यास मनोरथ पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी, नरसोबाची वाडी हे ठिकाण दत्त महाराजांची राजधानी आहे, असे म्हटले आहे. ‘मत् चिता चिंती साची ही वाडी नरसोबाची’ असे टेंबे स्वामींनी एका काव्यात म्हटले आहे.

या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की विजापूरच्या आदिलशहाच्या मुलीस अंधत्व आले होते. तेव्हा नरसोबाच्या वाडीला येऊन त्याने प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमुळे त्या मुलीस दृष्टी प्राप्त झाली. तेव्हा बादशहाने हे मंदिर बांधले व नदीतीरावरील औरवाड (अमरापूर) व गौरवाड ही दोन गावे देवस्थानास दिवाबत्तीसाठी इनाम दिली. मुस्लिम बादशहाने मंदिर बांधले असल्यामुळे त्यास कळस नाही, असेही सांगितले जाते. नृसिंह सरस्वती यांनी एकदा आदिलशहाच्या मुलीप्रमाणेच बिदरचा बहमनी बादशहा अल्लाउद्दीन अहमद (दुसरा) याच्या मांडीवर आलेले गळूही बरे केले होते, अशी हकीकत गुरुचरित्रात देण्यात आली आहे.

आदिलशहाने बांधलेले हे मंदिर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे. गावातील मोठ्या बाजारपेठेतून मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूंनी प्रसाद, पुजासहित्य व खाद्य पदार्थांची दुकाने आहेत. येथून पुढे पायऱ्या उतरून खाली गेल्यावर नदीचा विस्तीर्ण घाट लागतो. नदीच्या घाटावर खुल्या वर्तुळाकार दर्शनमंडपात बाह्य बाजूस १२ व आतील बाजूस ६ गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांचा खालील भाग काहीसा रुंद आहे व त्यांवर लतावेलींच्या नक्षी आहेत. स्तंभांवर वरच्या बाजूला शीर्षकमळ नक्षी, त्यावर तुळई व छत आहे. छताचा मधला वर्तुळाकार भाग खुला आहे. या खुल्या छताखाली, औदुंबर वृक्षाखाली दगडी बांधकाम असलेले आयताकृती पादुका मंदिर आहे. गर्भगृहाचे द्वार लहान आहे व त्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांनी स्थापित केलेल्या पादुका आहेत. गर्भगृहाचा दर्शनी भाग रजतपटल आच्छादित आहे. ललाटबिंबावर महिरपात गणपती आणि दोन्ही बाजूस मयूर, स्वस्तिक व ओम् चिन्हे आहेत. वरील बाजूस श्री नृसिंह सरस्वती यांची प्रतीमा व त्याभोवती पानाफुलांची नक्षी असलेली पट्टीका आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूस गदाधारी द्वारपाल आहेत. बाजूला स्वयंभू श्री गणेश मूर्ती आहे. येथे योगी रामचंद्र यांचे समाधी मंदिरही आहे. तसेच टेंबे स्वामी, नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाळ स्वामी व मौनी स्वामी आदींची समाधी मंदिरे आहेत.

मंदिरापासून काही अंतरावर अन्नछत्र आहे. येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते. या भव्य वास्तूत एकाच वेळी शेकडो भाविकांची बसण्याची व्यवस्था आहे. नरसोबाची वाडी हे दत्त संप्रदायाचे प्रमूख स्थान आहे. येथे दत्तजयंती, गुरु द्वादशी, नृसिंह सरस्वती जयंती आदी उत्सव साजरे केले जातात. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढून मंदिरातील दक्षिण द्वारातून बाहेर पडू लागते तेव्हा दक्षिण द्वार सोहळा साजरा केला जातो. या ठिकाणी जावळ, मुंज, दशक्रिया, जनन शांती, नवग्रह शांती आदी विविध विधी केल्या जातात.

मंदिरापासून जवळच पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाचे दृश्य दिसते. येथून सुमारे दोन किलोमिटर अंतरावर कुरुंदवाड घाटावर मराठा साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले होते. येथे संताजी घोरपडे यांचे वडील म्हालोजी घोरपडे यांनी बांधलेले महादेव पंचायतन मंदिर आहे.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून ४७ किमी, तर सांगलीपासून २२ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नरसोबाची वाडी येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८००७७८४५४८
Back To Home