नरसिंह संस्थान

उमरद (देशमुख), ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा

नृसिंह, लक्ष्मी आणि भक्त प्रल्हाद ज्या ठिकाणी एकत्र प्रतिष्ठापित असतात, तिथे भक्ती, शक्ती आणि करुणेचा त्रिवेणी संगम झाल्याचे मानले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात या तीन मूर्तींची एकाच ठिकाणी प्रतिष्ठापना असलेली केवळ तीन मंदिरे आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील कोळे येथील ज्वाला नृसिंह, कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे आणि बुलडाणा जिल्ह्यातील उमरद (देशमुख) या स्थानांचा समावेश आहे. उमरद येथील सुमारे ८०० वर्षे प्राचीन असलेले नृसिंह मंदिर हे जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की येथे नृसिंहाचे सौम्य व प्रसन्न रूप पाहायला मिळते.

भारतीय संस्कृतीत आणि विष्णुपुराणात भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी ‘नृसिंह अवतार’ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावशाली मानला जातो. सामान्यतः नृसिंहाचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते त्यांचे उग्र रूप. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी खांबातून प्रकटलेले, नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारे आणि क्रोधाने लालबुंद डोळे असलेले भगवान नृसिंह हे अंगावर शहारे आणणारे रूप आहे. मात्र, जेव्हा या उग्र रूपासोबत आदिशक्ती महालक्ष्मी आणि परमभक्त प्रल्हाद यांचे दर्शन एकाच ठिकाणी घडते, तेव्हा त्या मूर्तीशास्त्रातून आणि धार्मिक भावनेतून भक्ती, शक्ती आणि करुणेचा संगम होतो, अशी मान्यता आहे.

धार्मिक ग्रंथांनुसार, हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतरही नृसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता. संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या गर्जनेने थरथरत होते. अशा वेळी देवांनी माता लक्ष्मीला प्रार्थना केली. माता लक्ष्मी जेव्हा नृसिंहासमोर प्रकट झाली, तेव्हा तिच्या करुणामयी स्पर्शाने नृसिंहाचा क्रोध मावळला. याच शांत स्वरूपाला ‘लक्ष्मी-नृसिंह’ असे म्हटले जाते. यात भर पडते ती भक्त प्रल्हादाची. ज्याच्या अढळ श्रद्धेसाठी भगवंताने अवतार घेतला, तो प्रल्हाद जेव्हा चरणांशी किंवा मांडीवर विराजमान असतो, तेव्हा ते रूप ‘प्रल्हाद-वरद’ म्हणून ओळखले जाते. नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद एकाच ठिकाणी असणे म्हणजे भक्ताचे रक्षण (प्रल्हाद), दुष्टांचा संहार (नृसिंह) आणि विश्वाचे पालनपोषण व शांती (लक्ष्मी) या तिन्ही तत्त्वांचे एकत्र पूजन होय. धार्मिकदृष्ट्या या स्वरूपाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्या घरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद एकत्र पुजले जातात, तिथे भीतीचा नाश होऊन अभय प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

उमरद गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर उंच जोत्यावर बांधलेले आहे. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या मंडपाच्या समोरील भागात तुलसीवृंदावन व त्या शेजारी असलेल्या चौथऱ्यावर शिवपिंडी आणि नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख व काही शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात चार दगडी स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर रंगशिळा आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर देवकोष्टके आहेत. अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर गंगा, यमुना व द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवरही सुंदर कलाकुसर आहे. गर्भगृहात दगडी वज्रपीठावर नृसिंहांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मांडीवर हिरण्यकश्यपू असल्याचे दिसते, तर शेजारी प्रल्हाद व लक्ष्मीची मूर्ती आहे. या मूर्तींसमोर नृसिंहांची एक छोटी पितळी मूर्ती आहे. गर्भगृहावर तीन टप्प्यांतील शिखर आहे. रंगकाम केलेल्या या शिखरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराबाहेर मत्स्यावताराचेही शिल्प पाहायला मिळते.

मंदिराला लागून ओवरीसदृश बांधकाम आहे. मंदिराच्या आवारात समोरच्या बाजूला एक जुनी बारव आहे. या बारवेमध्ये उतरण्यासाठी चारही बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. पूर्वी या बारवेतील पाण्याने गर्भगृहातील मूर्तींना स्नान घातले जात असे. या बारवेच्या काठावर तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या देवकोष्टकामध्ये शेषशायी विष्णूचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. विष्णूंच्या पायाजवळ लक्ष्मीचे शिल्प कोरले आहे. शेषशायी विष्णूंच्या शिल्पावर समुद्रमंथनाचा प्रसंग कोरण्यात आला आहे. अन्य एका देवकोष्टकामध्ये सरस्वती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे, जिच्या हातात वीणा व पोथी आहे. तिसऱ्या देवकोष्टकात गणेशाची मूर्ती आहे.

या मंदिरात रोज पहाटे साडेचार वाजता काकडआरती होते आणि सायंकाळी हरिपाठ होतो. यावेळी नृसिंहांच्या मूर्तीला शिरा-पुरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. नृसिंह जयंती हा येथील मुख्य उत्सव आहे आणि त्यानिमित्त येथे सात दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखेरच्या दिवशी लोकवर्गणीतून महाभंडारा आयोजित करण्यात येतो.

उपयुक्त माहिती:

  • सिंदखेड राजा येथून १९ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ९१ किमी अंतरावर
  • सिंदखेड राजा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

नरसिम्हा संस्थान

उमराड (देशमुख), त. सिंदखेड राजा, जिला. बुलढाणा

Back To Home