जगभरात नर-नारायणास समर्पित असलेल्या मोजक्या मंदिरांतील एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक मंदिर मुंबईतील काळबादेवी परिसरात स्थित आहे. नर-नारायण हे विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक जोड अवतार मानले जातात. पौराणिक कथेनुसार, याच अवताराने पुढे अर्जुन (नर) आणि भगवान कृष्ण (नारायण) यांचे रूप धारण केले. काळबादेवीतील या मंदिरात अर्जुन आणि भगवान कृष्ण यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. शंभर वर्षांहून जुन्या असलेल्या या मंदिरात गोशाळा आणि छोटासा कबुतरखानाही आहे. येथे गोकुळाष्टमी तसेच होलिकोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
भगवान विष्णूचे मत्स्य, वराह, कूर्म, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, कल्की या दशावतारांबरोबरच सनतकुमार, नारद, कपिलमुनी, दत्तात्रेय, सुयज्ञ (यज्ञ पुरुष), जैन तीर्थंकर ऋषभदेव, पृथ्वीवर शेतीचा प्रारंभ करणारा आदर्श राजा पृथु, धन्वंतरी, मोहिनी, वेदव्यास, बलराम, हयग्रीव, हंस, तसेच नर-नारायण असे एकूण २४ अवतार मानले जातात. ‘कालिका पुराणा’नुसार नरसिंह अवताराच्या मानवी भागापासून नर आणि सिंहमुखापासून नारायण यांचा जन्म झाला. तेच दोघे पुढे ‘चाक्षुष मन्वंतरा’त धर्म व मूर्ती यांचे पुत्र झाले, असे ‘भागवत पुराणा’त सांगितले आहे.
‘भागवता’त नारायण हे अव्यक्त निर्गुण तत्त्व व नर हे व्यक्त सगुण रूप मानलेले आहे. या पुराणात नर आणि नारायण हे ऋषी असल्याचे म्हटले आहे.
त्यांच्याविषयीची पौराणिक आख्यायिका अशी की नर आणि नारायण यांचा जन्म झाल्यानंतर ते दोघे हिमालयातील बदरिकाश्रमात गेले आणि तप करू लागले. त्यांनी एक हजार वर्षे उग्र तप केले. या तपाने इंद्रदेव घाबरला आणि त्याने त्यांच्या तपात विघ्न आणण्यासाठी रंभादी अप्सरा त्यांच्याकडे पाठवल्या. त्यांना पाहून त्यांच्यापेक्षाही रूपाने सरस अशा अप्सरा निर्माण करण्याचे तपःसामर्थ्य आपल्या अंगी आहे, असे इंद्राला दाखवावे असे नारायणाने ठरवले. त्याने लगेच आपल्या मांडीवर थाप मारली. त्या मांडीतून एक अत्यंत रूपवती स्त्री निर्माण झाली. तीच उर्वशी नामक अप्सरा होय. त्यानंतर इंद्राने पाठवलेल्या अप्सरांच्या सेवेसाठी नारायणाने तितक्याच म्हणजे सोळा हजार पन्नास अप्सरा निर्माण केल्या आणि उर्वशीला घेऊन स्वर्गात परत जाण्याविषयी त्याने त्या अप्सरांना सांगितले. तेव्हा त्या अप्सरांनी उलट नारायणमुनींनाच आपला स्वीकार करावा, अशी प्रार्थना केली. त्यावर “मी पुढच्या अवतारात तुमच्याशी विवाह करीन” असे नारायणाने त्यांना आश्वासन दिले. मग त्या सर्व अप्सरा स्वर्गलोकी परत गेल्या. हेच नर-नारायण पुढे कृष्णार्जुनांच्या रूपाने अवतरले.
या अवताराविषयीच्या अन्य एका पौराणिक आख्यायिकेनुसार, एक दिवस हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद हा ससैन्य तीर्थयात्रा करीत असता नर-नारायणांच्या आश्रमाजवळ गेला. तेथे विविध प्रकारचे धनुष्यबाण, भाते, इत्यादी युद्धोपयोगी साहित्य पाहून त्याला त्या आश्रमातील मुनी हे शांत वृत्तीचे नसून ते दांभिक असावेत असे वाटले. त्यावरून त्यांचा वाद होऊन त्याचे रूपांतर युद्धात झाले. हे घनघोर युद्ध एक हजार वर्षे चालले. त्यात कोणीही हार जाईना. तेव्हा विष्णूने प्रकट होऊन ते युद्ध थांबवले. पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ या ग्रंथाच्या चौथ्या खंडातील माहितीनुसार, प्राचीन काळी या नर-नारायणांची उपासना सुरू झाली व कृष्णार्जुन हेही त्या रूपात पूजले जाऊ लागले. तेराव्या शतकात देवगिरीचे यादव राजे रामचंद्रराव यांचे करणाधिप हेमाद्री (हेमाडपंत किंवा हेमाडी पंडित) होते. त्यांनी लिहिलेल्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या ग्रंथात नर-नारायणांच्या मूर्ती कशा कराव्यात हे सांगितले आहे. दूर्वाप्रमाणे श्यामल वर्णाची, द्विभुज आणि बलाढ्य अशी नराची आकृती बनवावी. नारायण हा नीलकमलाप्रमाणे कांती असलेला आणि चतुर्भुज करावा. त्यांच्यामध्ये फलयुक्त असे बोरीचे झाड उभारावे,
असे त्यात म्हटले आहे. (दूर्वाश्यामो नरः कार्यो द्विभुजश्च महाबलः। नारायणश्चतुर्बाहुर्नीलोत्पलदलच्छविः।। तयोर्मध्ये तु बदरी कार्या फलविभूषणा ।) यावरून विष्णूच्या जोड अवताराची मूर्तीपूजा महाराष्ट्रात किमान आठशे वर्षांपासून होत होती, असे स्पष्ट होते.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला काळबादेवी परिसरात नर-नारायणाचे हे मंदिर उभारण्यात आले. तो कालखंड लॉर्ड कर्झनचा होता. त्या वेळी देशभरात महादुष्काळ पडला होता आणि मुंबईत १८९६-९७ पासून प्लेगची महामारी सुरू झाली होती. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते आणि कापड गिरण्यांवर गंडांतर आले होते.
तसेच बंगालच्या फाळणीच्या निर्णयामुळे राजकीय असंतोष पसरला होता. अशा अस्वस्थ कालखंडात येथील एक व्यापारी शेठ मनमोहनदास यांनी त्यांचे वडील शेठ कहानदास नारणदास यांच्या अंतिम इच्छेनुसार या मंदिराची स्थापना केली. त्या काळात मंदिर उभारणीसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आला होता, असे सांगण्यात येते.
‘झवेर बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंच इमारतींनी वेढलेल्या जागेत मोठ्या प्रांगणामध्ये हे मंदिर वसलेले आहे. प्रांगणास दगडी स्तंभ आणि लाकडी दरवाजा असलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार आहे. समोरच प्राचीन हवेली शैलीची छाप असलेले मंदिर उभे आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी संरचना असलेले हे मंदिर उंच दगडी जगतीवर बांधलेले आहे. सभामंडपासमोर दोन कोपऱ्यांत संगमरवरी पाषाणातील दोन तुळशीवृंदावने आहेत.
पाच रुंद दगडी पायऱ्या चढून या सभामंडपात प्रवेश होतो. दंडगोलाकार पाषाणाचे स्तंभ, त्यात मेहराबी तसेच चौरसाकार कमानी, छतावर बाशिंगी कठडा, तसेच घुमटाकार शिखर अशा या सभामंडपात बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे रचना असलेली संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडपाचे छत समतल आहे. त्यावर पानाफुलांच्या सुबक नक्षीबरोबरच विष्णूचे दशावतार, तसेच श्रीकृष्णाची रासलीला यांची उठावचित्रे आहेत.
येथील छोट्याशा ओवरीसारख्या अंतराळास तीन प्रवेशद्वारे आहेत. त्याच्या मधल्या प्रवेशद्वाराच्या स्तंभांवर हनुमान आणि गणेशाची छोटी मूर्ती आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार बारीक कलाकुसर केलेल्या रौप्यपत्र्याने मढवलेले आहे. संगमरवरी फरशांनी सजवलेल्या या गर्भगृहात उंच अधिष्ठानावर नर आणि नारायण म्हणजेच अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. संगमरवरी पाषाणात घडवलेल्या व रौप्यासनावर विराजमान असलेल्या या मूर्ती वस्त्र आणि तोडे, बाजूबंद, मनगटी कडे, मणिहार अशा अलंकारांनी सुशोभित आहेत.
येथे भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज आहेत. त्यांनी शंख, चक्र, पुष्प आणि गदा धारण केली आहे, तर अर्जुनाच्या हातात धनुष्य आणि बाण आहे. दोन्ही मूर्तींच्या मस्तकी सुंदर मुकुट व त्यामागे श्रीकृष्णास प्रिय असलेले मोरपीस लावलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर मोठा घुमटाकार भाग आहे आणि त्यावर उंच कलश आहे.
मंदिराच्या आवारात कदंबाचा एक वृक्ष आहे. त्याचप्रमाणे येथे गोशाळाही आहे. मंदिरासमोरच्या जागेत कबुतरांना खाणे टाकण्यात येते.
नर-नारायणाच्या या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी ४ आणि संध्याकाळी ५:१५ ते रात्री ८ या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात.
येथे सकाळी ६:३० ते ७:१५ मंगला आरती, ८:३० ते १० शृंगार, ११ ते ११:३० राजभोग, सायंकाळी ५:३० ते ६:१५ भोगआरती आणि सायंकाळी ७ ते ७:३० शयनआरती अशी नित्यपूजा होते.
मंदिरात गोकुळाष्टमी, होळी, दुर्गापूजा, दिवाळी हे सण व उत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरे केले जातात. उत्सव काळात येथे आध्यात्मिक विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने, भक्तिपर कार्यक्रम, नृत्य सादरीकरण असे उपक्रम आयोजित केले जातात.
‘शेठ कहानदास नारणदास चॅरिटीज ट्रस्ट’च्या माध्यमातून मंदिराचा कारभार पाहिला जातो. या ट्रस्टद्वारे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात.