हिंदू धर्मात शैव पंथाचा उदय अनादी काळापासून झालेला मानला जातो. भारतातील अनेक सम्राट आणि राजघराणी शैव पूजक असल्याने त्यांनी महादेवाची अनेक भव्य मंदिरे बांधली. नंदी हा महादेवाचा मुख्य गण आणि वाहन मानला गेला असल्याने महादेवासमोर नंदी किंवा नंदीचे स्वतंत्र मंडप, मंदिर बांधलेले पहायला मिळते. परंतु काही मंदिरांत नंदी हीच प्रमुख देवता असते. यात मध्य प्रदेशातील खजुराहो येथील नंदी मंदिर, आंध्र प्रदेशातील यंगती उमा महेश्वर नंदी मंदिर आणि कर्नाटकातील मैसूर येथील नंदी मंदिर प्रसिद्ध आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध नंदी मंदिर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात रायवाडी गावात आहे.
हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या गर्भगृहाचे हेमाडपंती शैलीचे बांधकाम पाहता त्याच्या प्राचीनत्वाची प्रचिती येते. पुराणात नंदीच्या जन्माच्या विविध कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एका कथेनुसार, आजन्म ब्रम्हचारी शिलाद मुनींना वंशवृद्धीसाठी पुत्रप्राप्तीची इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्यांनी इंद्राकडे पुत्राची मागणी केली. इंद्राच्या सल्ल्याने शिलाद मुनींनी महादेवाची आराधना केली.
महादेवाने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. पुढे शिलाद मुनींना एका शेतात नवजात बालक सापडले आणि हाच महादेवाचा आशीर्वाद समजून त्यांनी बालकाचे नाव नंदी ठेवले. नंदी महादेवाचा परमभक्त व सेवक झाला. तेव्हापासून महादेवाच्या समोर नंदीची मूर्ती कायमस्वरूपी दिसू लागली.
मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर मंदिराची स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व त्यावरील सज्जावर बाशिंग दिसते. या बाशिंगात मध्यभागी असलेल्या देवकोष्ठकात शिवपार्वतीची मूर्ती आहे. मंदिराचे प्रांगण रस्त्यापेक्षा काहीसे उंचावर आहे. मंदिराच्या प्रशस्त व फरसबंदी प्रांगणाचा काही भाग पेव्हर ब्लॉक बसवून आच्छादित केला आहे. प्रांगणात मंदिरासमोर तीन गोलाकार दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांचा पाया षटकोनी आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उंच चौथरे आहेत. चौथऱ्यांच्या मागील बाजूस सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारापासून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंतचा प्रवेशमार्ग सुमारे दोन फूट खोलगट आहे. प्रवेशमार्गात मधोमध स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे.
त्यामुळे गर्भगृहात जाण्यासाठी व गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार झाले आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर एक अस्पष्ट शिल्प आहे. गर्भगृहात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या विशाल मूर्तीच्या अंगावर झूल, गळ्यात माळा व इतर आभूषणे अत्यंत कलात्मक पद्धतीने कोरलेली आहेत. नंदीच्या शिंगांना चांदीच्या शिंगोळ्या बसवल्या आहेत आणि कान व डोळे देखील चांदीचे आहेत. नंदीच्या कपाळावर त्रिपुंड व आडव्या पट्टया नक्षीने कोरलेल्या आहेत. पाठीवरील वशिंड शिवपिंडीच्या आकाराचे आहे.
मूर्तीच्या चारही बाजूस चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेल्या या स्तंभांनी नंदी मूर्तीवर एक मखर तयार झाला आहे. मूर्तीवर सतत अभिषेक धारा धरणारे पितळी अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहातील देवकोष्ठकात शिवपिंडी व सप्तमातृकापट आहे. गर्भगृहाच्या भिंतीत दीपकोष्ठके आहेत. गर्भगृहाचे वितान षटकोनी असून ते शिखरापर्यंत पोकळ आहे. शिखरावरील खिडक्यांमुळे गर्भगृहात हवा व उजेड येण्याची सोय आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे पिरॅमिड आकाराचे गोपूर पद्धतीचे शिखर आहे. शिखरात चारही बाजूला खिडक्या आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिरासमोर सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी सभागृह आहे.
मंदिरात चैत्र वद्य द्वादशी हा मुख्य वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक नंदिकेश्वराच्या दर्शनाला येतात. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे फड व बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. मंदिरात श्रावण मास व महाशिवरात्री हे वार्षिक उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी अनेक भाविक नंदिकेश्वराच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. याप्रसंगी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलून भाविक नवे नवस करतात. यावेळी लघुरुद्र, महाभिषेक, भजन, किर्तन, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध वस्तूंची दुकाने थाटली गेल्याने परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. प्रसाद, पूजासाहित्य, शेती अवजारे व घरगुती वापराच्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून येथे लाखोंची आर्थिक उलाढाल होते.