नागेश्वर मंदिर
कोल्हटकर कॉलनी, अमरावती, ता. जि. अमरावती
अमरावती शहराचा विस्तार होत गेल्यानंतर जुन्या शहराभोवती अनेक नव्या वसाहती विकसित झाल्या. या वस्त्यांमध्ये स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून लहान-मोठी देवस्थाने उभी राहिली. कोल्हटकर कॉलनीतील नागेश्वर मंदिर हे अशाच लोकसहभागातून विकसित झालेले एक शिवमंदिर आहे. परिसरातील भाविकांसाठी नित्य दर्शन, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे हे प्रमुख केंद्र आहे. या मंदिरात भगवान शिवाची नागेश्वर रूपात उपासना केली जाते. गर्भगृहातील शिवपिंड, तिच्या मागे उभारलेले पंचफणी नागशिल्प आणि येथील समुद्राचा आभास निर्माण करणारी सजावट यांमुळे नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित पौराणिक कथेला येथे दृश्यरूप दिले गेले आहे. महाशिवरात्री आणि श्रावणातील सोमवार हे मंदिरातील विशेष गर्दीचे दिवस असतात.
नागेश्वर हे भगवान शिवाच्या उपास्यरूपांपैकी एक आहे. शिवपुराणातील कोटिरुद्रसंहितेत नागेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा दारुकावनाशी जोडलेली आहे. या कथेनुसार पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर दारुकावन नावाचे विस्तीर्ण वन होते. दारुका नावाची राक्षसी पार्वतीची उपासक होती. पार्वतीकडून तिला विशेष वर मिळाला होता. तिचा पती दारुक आणि त्याच्यासोबत असलेले राक्षस या वनात राहून ऋषी, यज्ञविधी करणारे लोक आणि आसपासच्या जनतेला त्रास देऊ लागले. पीडित लोकांनी और्व ऋषींकडे धाव घेतली. और्व ऋषींनी राक्षसांना शाप दिला. त्यांनी सांगितले की राक्षसांनी पृथ्वीवरील प्राणिमात्रांना त्रास दिल्यास त्यांचा नाश होईल. संकट ओढवल्यावर दारुकेने पार्वतीकडून मिळालेल्या वराचा आधार घेतला. त्यानंतर राक्षसांनी आपले वन व वस्ती समुद्राच्या मध्यभागी नेल्याचा संदर्भ शिवपुराणातील कथेत मिळतो.
समुद्रात आश्रय घेतल्यानंतर या राक्षसांनी नौकांमधून प्रवास करणाऱ्या लोकांना पकडून कैद करण्यास सुरुवात केली. अशा कैद्यांमध्ये सुप्रिय नावाचा एक वैश्य शिवभक्त होता. भगवान शिवाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण न करण्याचा त्याचा नियम होता. कैदेत असतानाही त्याने शिवोपासना सोडली नाही.
पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच त्याने इतर कैद्यांनाही शिवपूजेची पद्धत आणि ‘नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जप शिकवला. कारागृहात शिवनामाचा जप सुरू झाल्याचे समजल्यानंतर संतप्त राक्षसांनी सुप्रियाचा वध करण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या त्या क्षणी त्याने भगवान शिवाचा धावा केला. भगवान शिव तेथे प्रकट झाले, त्यांनी सुप्रियाचे रक्षण केले आणि त्याला पाशुपतास्त्र दिले. पुढे राक्षसांचा नाश झाला. त्यानंतर भगवान शिव तेथे भक्तांच्या रक्षणासाठी ज्योतिर्लिंगरूपाने राहिले आणि हे रूप ‘नागेश्वर’ नावाने ओळखले जाऊ लागले. देवी पार्वतीला याच कथेत ‘नागेश्वरी’ म्हटले आहे.
नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नेमक्या भौगोलिक स्थानाबाबत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा सांगितल्या जातात. गुजरातमधील द्वारकेजवळ असलेले नागेश्वर मंदिर द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर म्हणून ओळखले जाते. त्याच वेळी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हेही प्राचीन काळापासून ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून पूजले जाते. त्यामुळे या दोन्ही स्थानांशी वेगवेगळ्या परंपरा जोडल्या गेल्या आहेत. अमरावतीतील कोल्हटकर कॉलनी येथील नागेश्वर मंदिरामध्येही नागेश्वर या शिवस्वरूपाची भक्तिभावाने उपासना केली जाते. गर्भगृहातील दृश्यरचनेत दारुकावनाच्या पौराणिक कथेशी संबंधित प्रतीकांचा जाणीवपूर्वक वापर केला आहे.
कोल्हटकर कॉलनीतील हे मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिर परिसराला संरक्षक भिंत आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मोकळे प्रांगण लागते. मंदिराची मुख्य रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. आधुनिक बांधकाम तंत्राने उभारलेल्या या वास्तूत मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. दर्शनी प्रवेशद्वाराला पारंपरिक मंदिररचनेचा देखावा दिला आहे. अंदाजे पंधरा ते वीस फूट उंचीच्या या प्रवेशभागात महिरपी कमान आहे. वर सज्जासदृश रचना आणि दोन्ही बाजूंना अलंकरण केले आहे. त्यामुळे नव्या काळातील बांधकाम असले तरी प्रवेशद्वाराला मंदिराच्या पारंपरिक स्वरूपाशी जुळणारा आकार मिळाला आहे. आतला सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गोलाकार स्तंभांच्या रांगा आहेत. हे स्तंभ महिरपी कमानींनी परस्परांना जोडले आहेत. त्यांच्या वरच्या भागात तुळया आणि लहान स्तंभिका आहेत. त्यावर सभामंडपाचे छत आधारले आहे. छताला विद्युत रोषणाईची काचेची झुंबरे लावली आहेत. भाविकांना बसण्यासाठी सभामंडपात आसनांची व्यवस्था आहे. भिंतींवर विविध देवी-देवतांची चित्रे लावली आहेत.
मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पूजा, भजन आणि सामूहिक उपासनेसाठी या मंडपाचा उपयोग केला जातो.
सभामंडपाच्या पुढे बंदिस्त गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये देवकोष्टके तयार करून त्यात उपदेवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. मध्यभागी जमिनीच्या पातळीवर शिवपिंडीची प्रतिष्ठापना केली आहे. तिच्या पाठीमागील भिंतीलगत असलेल्या वज्रपीठावर पंचफणी नागाचे शिल्प आहे. नागफण्यांच्या शीर्षभागी चांदीचा मुकुट चढवला जातो. या नागफण्यांच्या छत्राखाली मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. शिवपिंडी, नाग आणि श्रीकृष्ण ही तीन धार्मिक प्रतीके एकाच गर्भगृहात दिसतात. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर समुद्राचे चित्रण केले आहे. पंचफणी नागाच्या शिल्पासोबत ही समुद्राची पार्श्वभूमी पाहिल्यावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दारुकावन कथेत वर्णिलेल्या समुद्रातील राक्षसांच्या वस्तीचे स्मरण होते. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा करता यावी यासाठी स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर उभारलेल्या शिखराच्या माथ्यावर आमलक आणि कळस आहे. मंदिर परिसरात मंगल कार्यालय तसेच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र कार्यभवनाची व्यवस्थाही आहे.
भगवान शिवाच्या उपासनेत महाशिवरात्री आणि श्रावण महिन्याला विशेष स्थान आहे. हे दोन्ही पर्व नागेश्वर मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवसांचे धार्मिक अनुष्ठान आयोजित केले जाते. या काळात शिवपिंडीवर अभिषेक, रुद्रपठण, बिल्वपत्र अर्पण, आरती आणि रात्रीचे जागरण असे कार्यक्रम होतात. स्थानिक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मंदिरात प्रसंगानुसार अतिरुद्र अभिषेक आणि महारुद्र स्वाहाकार यांसारखे विशेष शिवोपासना विधी केले जातात. अतिरुद्र अभिषेकात श्रीरुद्राच्या आवर्तनांसह विस्तृत अभिषेकविधी केला जातो. महारुद्र स्वाहाकारात रुद्राधारित मंत्रांसह यज्ञविधी होतो. अशा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक आणि बिल्वपत्र अर्पण करण्यासाठी सकाळपासून भाविक येतात. प्रदोषाच्या दिवशीही विशेष शिवपूजा केली जाते. याशिवाय कार्तिकी पौर्णिमा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीसारखे उत्सव मंदिरात साजरे होतात. गर्भगृहातील नागछत्राखाली मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती असल्यामुळे जन्माष्टमीच्या उत्सवालाही येथे स्थान मिळाले आहे. परिसरातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहिलेले हे देवस्थान आज शहरातील शिवभक्तांसाठी नियमित उपासनेचे केंद्र बनले आहे. दररोज सकाळी ६ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- अमरावती रेल्वे व एसटी बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- शहरातील अनेक भागांतून एसटी व ऑटोरिक्षांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७३०५४१७०४
