मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थान

रेवसा, ता. अमरावती, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावात वसलेले श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थान हे विदर्भातील एक जुने वैष्णव व वारकरी श्रद्धास्थान मानले जाते. संत सद्‌गुरू ब्रह्मचारी महाराजांनी समाजप्रबोधन, नामस्मरण आणि सदाचाराच्या प्रसारासाठी रेवसा गावाला आपली कर्मभूमी बनवले. रेवसा गावात महाराजांनी स्थापन केलेला मूळ मुरलीधर मठ आणि गावाबाहेर उभारलेले महाराजांचे समाधी मंदिर ही दोन्ही स्थाने लाखो भाविकांचे आध्यात्मिक श्रद्धास्थान आहेत. या वारशामुळे रेवसा गावाला महाराष्ट्र शासनाकडून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी पौष वद्य नवमीला साजरा होणारा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव हा या परिसरातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. त्यावेळी विदर्भासह राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

रेवसा गावाचा इतिहास अमरावती परिसरातील जुन्या महसुली व सांस्कृतिक जडणघडणीशी जोडलेला आहे. ब्रिटिशकालीन अमरावती जिल्हा गॅझेटिअरमधील नोंदींनुसार, हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक काळापासून पूर्णा नदीची उपनदी असणाऱ्या पेढी नदीच्या खोऱ्यात वसलेला सुपीक भूभाग आहे. अमरावती शहराच्या वायव्येस सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानजीक वलगाव हे प्राचीन परगण्याचे मुख्य व्यापारी ठाणे होते. स्थानिक मौखिक परंपरेनुसार, प्राचीन काळी घनदाट वृक्षाच्छादन आणि जलसमृद्धी असलेल्या या परिसराला तपस्वी साधूंच्या वास्तव्यामुळे तपोभूमीचे स्वरूप आले होते. पेढी नदीच्या संथ प्रवाहाच्या साक्षीने विकसित झालेल्या या परिसराला संत ब्रह्मचारी महाराजांच्या वास्तव्याने तीर्थक्षेत्राचे स्वरूप लाभले.

संत सद्‌गुरू ब्रह्मचारी महाराजांच्या पूर्वजीवनाविषयी, जन्मस्थानाविषयी अथवा त्यांच्या मूळ घराण्याविषयी कोणतेही लिखित ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाहीत. ‘साधूचे कुळ आणि नदीचे मूळ विचारू नये’ या उक्तीप्रमाणे महाराजांनी स्वतःची लौकिक ओळख पूर्णपणे विरक्त ठेवली. त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण करून आजन्म अखंड ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. त्यामुळे स्थानिक लोक त्यांना ‘ब्रह्मचारी महाराज’ याच नावाने ओळखू लागले. समाजात तत्कालीन काळात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि सामाजिक विषमतेचा विरोध करून त्यांनी लोकांना ईश्वरभक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक समरसतेचा मार्ग दाखवला. श्रीकृष्ण हे महाराजांचे आराध्य दैवत होते. याच भक्तीभावातून त्यांनी रेवसा येथील मठात बासरी वाजवणाऱ्या मुरलीधर श्रीकृष्णाची स्थापना केली. त्यावरूनच या स्थानाला व देवस्थान न्यासाला ‘श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थान’ असे नाव पडले.

संस्थानामध्ये इसवी सन १८६८ पासून महाराजांचा समाधी पुण्यतिथी सोहळा अखंडपणे साजरा केला जातो. आळंदी येथील संत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘श्री आळंदीचे स्वामी’ या ग्रंथातील नोंदीनुसार, स्वामी विदर्भ भ्रमंतीवर असताना रेवसा येथील ब्रह्मचारी महाराजांच्या जुन्या मठात सलग दोन महिने वास्तव्यास होते. याच ग्रंथात मठानजीकच्या एका पुरातन महादेव मंदिराचाही स्पष्ट उल्लेख येतो. या नोंदीवरून इतिहास अभ्यासकांच्या मते रेवसा येथील मूळ मुरलीधर मठाची स्थापना साधारण तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी झालेली असावी.

गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला मूळ संस्थान मठ सुमारे बारा ते पंधरा फूट उंच दगडी तटबंदीने सुरक्षित केलेला आहे. तटबंदीच्या मुख्य प्रवेशद्वारास पायऱ्यांची रचना आहे व पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी दगडी चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगांस स्तंभशाखा आणि शीर्षभागी नक्षीदार महिरपी तोरण कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराला जुन्या काळातील भक्कम लाकडी झडपा बसवलेल्या आहेत. आत दोन्ही बाजूंना पहारेकरी कक्ष आहेत. तटबंदीच्या आतील भिंतींना जोडून ओवऱ्यांची रचना आहे, तर मध्यभागी फरसबंदी प्रांगण दिसते. या प्रांगणातूनच उत्सवादरम्यान पालखी सोहळा मार्गस्थ होतो. मंदिराच्या दर्शनी भागात दोन यज्ञमंडप आहेत. प्रांगणाच्या मध्यभागी उंच अधिष्ठानावर मुख्य मुरलीधर मंदिर उभे आहे. त्याची रचना अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे. सभामंडपाचे दगडी छत स्तंभांवर तोललेले आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजूंना असलेल्या देवकोष्टकांत गणेश व मारुती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात समोरील वज्रपीठावर संत ब्रह्मचारी महाराजांची संगमरवरी ध्यानस्थ मूर्ती व त्यांच्या पद्मपादुका प्रतिष्ठित आहेत, तर मागील भिंतीलगतच्या वज्रपीठावर सालंकृत राधा-मुरलीधराच्या पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पारंपरिक रचनेचे उंच शिखर आहे. मुरलीधर मठापासून काही अंतरावर, लोकवस्तीबाहेर शांत नैसर्गिक वातावरणात संत ब्रह्मचारी महाराजांचे समाधी मंदिर आहे.

संस्थानचा प्रमुख वार्षिक उत्सव म्हणजे पौष वद्य नवमीला संपन्न होणारा संत ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी महोत्सव. हा महोत्सव सलग सात दिवस मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. या सप्ताहात अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय श्री गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, कीर्तन आणि वैदिक होम-हवन आदी धार्मिक विधींचे आयोजन होते. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींच्या पादुकांची पालखी सजवून संपूर्ण रेवसा गावातून ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. या सोहळ्यात विविध भजनी दिंड्या, चौक सजावट आणि कलाकारांच्या पौराणिक देखाव्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात. उत्सवाच्या सांगता दिनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (हव्याप्रम) खेळाडूंची शारीरिक व्यायाम प्रात्यक्षिके सादर होतात, त्यानंतर महाराजांची रथयात्रा निघते. या पुण्यतिथी सोहळ्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे गोपालकाला व महाप्रसादाचे वाटप. यावेळी परिसरातील हजारो भाविक एकाच विस्तीर्ण पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतात. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे व एसटी बस स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • बडनेरा जंक्शन रेल्वे स्थानकापासून सुमारे १९ किमी अंतरावर
  • अमरावती येथून रेवसा गावासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात मंदिर संस्थानचे भक्तनिवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : योगेश डुकरे, व्यवस्थापक, मो. : ७७०९८८८२८८
Back To Home