मुक्तेश्वर आश्रम

खामगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

खामगाव येथील मुक्तेश्वर आश्रम हा दत्तसंप्रदायातील एक अत्यंत पवित्र आणि जागृत शक्तिपीठ मानले जाते. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी (श्री संचारेश्वर) लोककल्याणाच्या उदात्त हेतूने या आश्रमाची स्थापना केली. संपूर्ण भारतात गाणगापूर आणि कारंजा लाड यांच्यानंतर केवळ याच ठिकाणी दत्तात्रयांच्या ‘निर्गुण पादुका’ विराजमान आहेत, हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. या आश्रमात श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांनी स्वहस्ते घडवलेली दत्तात्रयांची प्रासादिक षड्भुज मूर्ती आणि शिवशंकरांचे ‘मुक्तेश्वर’ रूप भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. गुरुपरंपरेचा दैवी वारसा लाभलेल्या या आश्रमात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात निर्गुण पादुका महोत्सव भक्तिभावाने साजरा होतो.

वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) – नारायण दत्तानंद सरस्वती – माधवाश्रम स्वामी अशी गुरुपरंपरा लाभलेल्या संत पाचलेगावकर यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१२ रोजी नरकचतुर्दशीच्या दिवशी परभणीतील पाचलेगाव येथील राजारामपंत पांडे (कुलकर्णी) आणि कृष्णाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव नरसिंह असे होते. श्री माधवाश्रम स्वामी एकदा पाचलेगाव येथे आले असता त्यांनी बालनरसिंहाला ‘संचारेश्वर’ हे नाव दिले. पाचलेगावकर महाराजांनी माघ शुद्ध ११, शके १८६४ (सन १९४२) मध्ये खामगाव येथील या आश्रमात मुक्तेश्वराची म्हणजेच शिवशंकरांच्या शाळुंकेची प्रतिष्ठापना केली. त्यामुळेच या आश्रमाला मुक्तेश्वर आश्रम असे नाव पडले. पाचलेगावकर महाराजांच्या भेटीसाठी विविध क्षेत्रांतील व्यक्ती येथे येत असत. त्यांच्यामध्ये गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गगनगिरी महाराज, आचार्य अत्रे, गो. नि. दांडेकर यांचा समावेश होता. गगनगिरी महाराज हे पाचलेगावकर महाराजांना ज्येष्ठ बंधू मानत असत. १६ ऑगस्ट १९८६ रोजी, श्रावण शुद्ध एकादशीच्या दिवशी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान पाचलेगावकर महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव खामगाव येथे आणण्यात आले. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर येथे त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले.

खामगाव येथील नॅशनल कॉलेजनजीक हा आश्रम आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या प्रवेशद्वारातून आश्रमाच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारानजीक असलेल्या औदुंबर वृक्षाजवळील छोट्या मंदिरात गणेशमूर्ती तसेच शिवलिंग आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि तळघरातील गर्भगृह अशी या आश्रमाची रचना आहे. सभामंडपात पाचलेगावकर महाराजांची प्रतिमा आहे व उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहातील सुंदर मखरात सर्वात वरच्या भागात दत्तात्रयांची प्रासादिक मूर्ती आहे. त्याखालील भागात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती (डॉ. कुर्तकोटी) यांनी दिलेली हरित शाळुंका आहे. त्याखालील भागात शिव-पार्वतीची ताम्रमूर्ती आहे तर त्याखालील भागात नारायण दत्तानंद सरस्वती यांच्या पादुका आहेत. समोर मुक्तेश्वराचे शिवलिंग आहे. या पिंडीच्या उजव्या बाजूस शिवशंकरांची तर डाव्या बाजूस सिंहावर स्वार असलेल्या पार्वतीमातेची मूर्ती आहे. येथील दत्तात्रयांची मूर्ती षड्भुज असून ती टेंबे स्वामींनी बनवून घेतली होती. आपल्या पश्चात ही मूर्ती पाचलेगावकर महाराजांना देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले होते, असे सांगण्यात येते.

या आश्रमाच्या तळघरात असलेल्या गर्भगृहात दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन होते. तळघरात संगमरवरी दगडाचे बांधकाम आहे. येथील गर्भगृहात नृसिंह सरस्वतींची स्फटिकाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे आणि त्यासमोर निर्गुण पादुका आहेत. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला (सन १९६८ मध्ये) पाचलेगावकर महाराजांनी या पादुकांची प्रतिष्ठापना केली. नृसिंह सरस्वतींच्या मूर्तीच्या मागील भिंतीवर दत्तात्रयांची मूर्ती कोरलेली आहे. येथील निर्गुण पादुकांबाबत सांगण्यात येणाऱ्या आख्यायिकेनुसार, पाचलेगावकर महाराज एके दिवशी गाणगापूरला गेले असता काही व्यक्तींनी त्यांना तेथील निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यास अटकाव केला. त्यानंतर महाराज काहीही न बोलता बाहेर आले आणि परिसरातील औदुंबर वृक्षाखाली बसून त्यांनी साधना करण्यास सुरुवात केली. इकडे आरतीच्या वेळी निरंजनाची वात काही केल्या पेटत नव्हती. अखेर एका वृद्ध व्यक्तीला काही वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली आणि महाराजांची योग्यता त्यांना पटली. पुढे श्रीपाद वल्लभांनी पाचलेगावकर महाराजांना दर्शन देऊन पादुकांसाठी अनुष्ठान करण्याचा आदेश दिला. त्यानुसार अनुष्ठान केल्यानंतर त्यांना या पादुकांची प्राप्ती झाली.

आश्रमाच्या आवारात एके ठिकाणी पाचलेगावकर महाराजांचे समाधीमंदिर आहे. येथे त्यांच्या संगमरवरी मूर्तीचे तसेच पादुकांचे दर्शन होते. आश्रमाच्या परिसरात पाचलेगावकर महाराजांचे निवासस्थान आहे. येथे त्यांच्या वापरातील वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये त्यांच्या पादुका, कमंडलू, गादी इत्यादींचा समावेश आहे. दूरवरून येणाऱ्या अनुयायांच्या निवासाची सोय करण्यासाठी परिसरात भक्तनिवास उभारण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याची शिवरात्र, सोमवार व गुरुवारी या आश्रमात पाचलेगावकर महाराजांचे अनेक अनुयायी दर्शनासाठी येतात. दर सोमवारी रात्री ८ वाजता आरती व उपासना झाल्यानंतर परिसरात पालखी सोहळा होतो. येथे एक माळ जप केल्यास १०८ माळींचा जप केल्याचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. हे मंदिर आधि-व्याधी, भूतबाधा, भानामती, करणी इत्यादी मानसिक रोग निवारण्याचे केंद्र आहे, तसेच आत्मोन्नती साधणाऱ्या साधकांचे जागृत स्थान आहे अशी अनुयायांची भावना आहे. या आश्रमात मार्गशीर्ष वद्य द्वादशीला निर्गुण पादुकांची प्रतिष्ठापना झाली झाल्यामुळे येथे या महिन्यात तीन दिवसांचा मोठा उत्सव होतो. तत्पूर्वी सात दिवस आधी भाविक अनुष्ठान करतात. उत्सवादरम्यान प्रवचनासारखे धार्मिक कार्यक्रम होतात. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी या उत्सवाच्या मुख्य दिवशी पाचलेगावकर महाराजांच्या मूर्तीवर सामूहिक रुद्राभिषेक करण्यात येतो. त्यांची मूर्ती तळघरातील निर्गुण पादुकांच्या स्थानी आणण्यात येते. नंतर माध्यान्ह आरती व महाप्रसाद होतो. सायंकाळी पाचलेगावकर महाराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होते. सामूहिक उपासना व आरतीने या उत्सवाची सांगता होते. येथे नरक चतुर्दशीला पाचलेगावकर महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच श्रावण शुद्ध एकादशीला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम होतात.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५१ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून खामगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने आश्रमापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : माधव जोशी, अध्यक्ष, मो. ७५१७२५६६६६,
  • अरविंद ताम्हण, विश्वस्त, मो. ९४२३०५७४२३

मुक्तेश्वर आश्रम

खामगांव, ताल. खामगांव, जिला. बुलढाणा

Back To Home