मुद्गलेश्वर मंदिर

सिंदफळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

तुळजापूर तालुक्यात अनेक शिवमंदिरे आहेत. असे सांगितले जाते की त्यापैकी काही मंदिरांत वनवास काळात श्रीरामाने महादेवाची आराधना केली होती, तर काही मंदिरांची स्थापना केली होती. तुळजापूर शहरापासून जवळ असलेल्या सिंदफळ गावातील प्राचीन मुद्गलेश्वर महादेव मंदिरात देखील श्रीरामाने पूजा केली होती, अशी मान्यता आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे जाणकारांचे मत आहे. येथील कोरीव काम व स्थापत्य रचना पाहता या मंदिराचे प्राचीनत्व अधोरेखीत होते.
या मंदिराबाबत अख्यायिका अशी की वनवास काळात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे जाताना श्रीरामाने या मंदिरात महादेवाची पुजा केली होती. या अख्यायिकेनुसार हे मंदिर रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. तर काही अभ्यासकांच्या मते मुद्गल पुराणाचे रचियेते मुद्गल ऋषींनी हे देवालय स्थापन केले असल्याने त्याला मुद्गलेश्वर म्हणून संबोधले जाते.
मंदिराकडे जाणाऱ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन स्तंभ, त्यावर सज्जा व सज्जावर मध्यभागी शिवपिंडीची प्रतिकृती आहे. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात स्थानिक देवतांचे पाषाण, नागशिल्पे, शिवलिंग, नंदीशिल्पे व सप्तमातृका पाषाण आहेत. याशिवाय येथे स्थानिक देवतांची लहान मंदिरे व समाध्या आहेत. प्रांगणात सभोवतीने भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मुद्गलेश्वर मंदिरासमोर दगडी बांधणीची गोलाकार दीपमाळ आहे.
सुमारे तीन फूट उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर पाच अर्धचंद्राकार पायऱ्या आहेत. सभामंडपात समोरील बाजूस सहा नक्षीदार स्तंभ आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभे असलेले स्तंभ वर चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी चौकोनी कणी व त्यांवर महिरपी कमानी आहेत. कमानींवर तुळई व तुळईंवर छत आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतींवर उठावशैलीतील केळीच्या झाडाची शिल्पे व दोन्ही हातांत नाग धरलेले द्वारपालशिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराशिवाय सभामंडपात डावीकडे व उजवीकडे आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ व वितानावर चक्रनक्षी आहेत.
अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालशिल्पे व बाजूला देवकोष्टके आहेत. दर्शनी भिंतीत दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन नक्षीदार स्तंभ व प्रवेशद्वारात दोन स्तंभ आहेत. सर्व गोलाकार स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभात खालील बाजूस अष्टकोनी रिंगण नक्षी व वर उभ्या धारेची नक्षी आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर हस्त आहेत. अंतराळात मध्यभागी जमिनीवर कासवशिल्प व त्यापुढे चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर चंद्रनक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल – द्वारपालिका शिल्पे आणि वर वेलबुट्टीशाखा, कुंभशाखा, स्तंभशाखा व पुष्पशाखा आहेत. ललाटबिंबावर इष्टशिल्प व तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी व मागील भिंतीलगत वज्रपिठावर पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहात महादेवाचा पितळी मुखवटा व त्यामागे छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे.
मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांवर नंदीशिल्पे व मध्यभागी तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या तिन्ही थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यांत देवमूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी उरुशृंगी प्रकारची आठ शिखरे, मध्यभागी स्तूपी, त्यावर कळस व ध्वज पताका आहेत.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देवास लघूरुद्र अभिषेक करून पूजा केली जाते. नंतर देवाची आरास मांडून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी असते. यावेळी महिनाभर देवाची विविध रूपात आरास मांडून पूजा केली जाते. दोन्ही उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • तुळजापूरपासून ३ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून तुळजापूरसाठी एसटीची सुविधा
  • तुळजापूर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : विशाल भांजी, मो. ९८२२३४४९३४,
  • शशिकांत इंगळे, मो. ९८५०८५७८७९
Back To Home