मौनी महाराज मठ-मंदिर

पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

भुदरगड तालुक्यातील शेवटचे मोठे गाव असलेले पाटगाव हे मधाचे गाव म्हणून सुप्रसिद्ध आहे. वनराईने वेढलेल्या या गावामध्ये वर्षभरात ८ ते १० टन शुद्ध मधाचे उत्पादन होते. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे येथे शिवछत्रपतींचे गुरू मौनी महाराज यांच्या मठाचे व समाधी मंदिराचे स्थान आहे. सुमारे ३०० वर्षे जुना असलेला हा मठ मराठी स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. मठाची इमारत चकचकित रंगरंगोटीची नसली, तरी धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक व इतिहासप्रेमी येत असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे परधर्मसहिष्णु आणि उदारमतवादी विचारांवर चालणारे होते. परधर्मसहिष्णुता हे शिवरायांच्या धर्मराज्याचे नैतिक अधिष्ठान होते. त्यामुळेच समर्थ रामदास स्वामी, मोरया गोसावी, चिंतामणी देव, सिद्धेश्वरभट ब्रह्मे, गोपाळभट, पुळ्याचे श्रीधरभट्ट बापट यांच्याप्रमाणेच कोकणातील केळशीचे बाबा याकुत यांच्यासारख्या संत-सत्पुरुषांचा ते परामर्ष घेत असत. याच नामावलीतील एक नाव मौनी महाराज यांचे आहे. शिवाजी महाराज राज्यातील सर्वच संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानत असत. त्यानुसार ते मौनी महाराजांनाही गुरुस्थानी मानत असत. त्यांचे पूर्वायुष्य अज्ञात आहे व ते नाथपंथातील अवधूत या उपपंथाचे किंवा गोसाव्यांच्या गिरी पंथाचे असावेत, असा अभ्यासकांचा कयास आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर हे त्यांचे मूळ गाव. तेथून ते रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथे वास्तव्य करून राहिले.

‘मराठी विश्वकोशा’तील नोंदीनुसार, मौनी महाराज हे कथा-कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करीत असत. तुकाराम महाराजांप्रमाणेच ते वेदवाणी व्यक्त करीत असल्याने तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांचा छळ केला. या छळास कंटाळून त्यांनी मौन पत्करले म्हणून त्यांना मौनी बुवा असे नाव पडले. शिव-इतिहासाच्या साधनांपैकी ‘श्रीशिवदिग्विजय’ आणि ‘९१ कलमी बखर’ यामध्ये मौनी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधीचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. ‘श्रीशिवदिग्विजया’त ‘…महाराजांचे संस्थानांत सत्पुरुष योगी साक्षात् ईश्वराच्या विभूतिच, साक्षात्कारी प्रसिद्ध वागत होते, त्यांचीं नावें बीतपशील’ (म्हणजे महाराजांच्या राज्यातील प्रसिद्ध सत्पुरुषांचा नावे व तपशील असा, की), असे सांगून पुढे ‘मौनीबावा पाटगांवीं येऊन राहिले’ अशी नोंद करण्यात आली आहे. दक्षिण दिग्विजयास जाण्यापूर्वी इ.स. १६७६ मध्ये शिवरायांनी मौनीबाबांची भेट घेतल्याची हकीकत ‘९१ कलमी बखरी’च्या कलम ७६ मध्ये दिली आहे. ही कथा पुढीलप्रमाणे – ‘उपरांतिक पांचवडास (शिवाजी महाराज) आले. तेथें जमाव करून मोरोपंत व अंताजीपंत व कुल सरदार जमा केले. मोठे लोकांसि सर्व राज्याचा बंदोबस्त सांगून बरोबर केसोपंत व निळोपंत मुजमदार घेतले. विजापूरचें राज्यकारण राखून पारगांवी मोहनी बावा होते त्यांचे दर्शनास गेले. मोरोपंताचे हातीं चांप्याचे फुलांचा तुरा व हार दिला. पंचपात्री पंतांचे हातीं होंती. वरकड हुजऱ्यांचे हातीं नारळ व कित्येक फुलांचे जिन्नस दिले. मनांत महाराज कल्पना करून उभे राहिले कीं चंदीचे राज्यावर आपण जातों प्रसाद द्यावा. त्याजवर सात तास पावेतों उभे होते. उपरांतिक पूजा केली. आपले हातीं साखरेचा प्याला घेऊन तोंडांत साखर घातली…’ यावेळी मौनी महाराजांनी मोरोपंतांच्या हातातील फुलांचा तुरा घेऊन महाराजांच्या मस्तकी ठेवला, असे पुढे म्हटले आहे. यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर भरविलेल्या एका संतपरिषदेस मौनी महाराज उपस्थित होते, असेही सांगण्यात येते. मौनी महाराजांच्या मठातील पुराणिक, हरदास आदींसाठी दरसाल १८ होनांची, तसेच हजार माणसांना पुरेल एवढा शिधा दरवर्षी देण्याची तरतूद शिवाजी महाराजांनी सनदेद्वारे केली होती.

मौनी महाराज यांच्यासारख्या अनेक संतांचेही स्वराज्य उभारणीच्या कामी शिवरायांना साह्य झाले होते. ‘इतिहास संग्रह’ या दत्तात्रय बळवंत पारसनीस संपादित मासिकाच्या ऑगस्ट १९०८ च्या अंकात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा शिवरायांच्या मालवणमधील प्रतिमेबद्दलचा ऐतिहासिक स्फुटलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात राजवाडे यांनी म्हटले आहे की ‘कोकणात शिवाजीचा (शिवाजी महाराजांचा) अंमल बसविण्यास मौनीस्वामी पाटगांवकर व बाब याकुब रत्नागिरीकर असे दोन पुरुष कारण झाले. या दोघांचेंहि अत्यंत प्रेम शिवाजी राजावर असे. ह्यांच्या सांगण्यावरून कोंकणांतील लोक शिवाजी राजाच्या अमलाला राजी व रूजू झाले. मौनीस्वामींचें वजन गोव्यापासून राजापूरपर्यंत असे…’ शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनीही मौनीबाबांच्या मठाचा योग्य परामर्श घेतला.

पाटगाव मठातील वाजंत्री व पालखी यासाठी १२५ होन मौनी महाराजांचे शिष्य तुरूतगिरी यांना द्यावेत अशी आज्ञा छत्रपती संभाजी राजांनी कुडाळ प्रांताचा देशाधिकारी गणोराम यास केली होती. मौनी महाराजांनी इ.स. १६८६ मध्ये पाटगाव येथे माघ शुद्ध एकादशीस जिवंत समाधी घेतली. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठिंब्याने तुरूतगिरी हे मौनी मठाचे पीठपती झाले. छत्रपती राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्गावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात बसवण्यासाठी शिवरायांची दगडी मूर्ती तयार करून घेतली, त्या वेळी त्यांनी मौनी महाराजांचीही मूर्ती तयार करवून घेतली होती. पाटगाव मठाच्या वार्षिक खर्चासाठी सरकारातून ७०० होन दिले जात; परंतु मुघली आक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ते मिळत नव्हते. तेव्हा पाटगावचे मठाधिपती जिंजीला छत्रपती राजाराम महाराजांकडे गाऱ्हाणे घेऊन गेले होते. त्यावेळी राजाराम महाराजांनी होनांऐवजी मठास दोन गावे इनाम दिली. महाराणी ताराबाई साहेबांनीही २५ मे १७०१ रोजी या मठास अन्न व उत्सवासाठी खानापूर तर्फातील कोडोसी हे गाव नवीन इनाम करून दिले होते. त्याच प्रमाणे हिंदूराव घोरपडे यांनी बालेधोल हा गाव मठास इनाम दिला होता. यावरून छत्रपतींच्या घराण्याचे या मठाशी असलेले जवळचे संबंध स्पष्ट होतात.

असे सांगण्यात येते की येथील सध्याच्या मठातील मंदिराचा गाभारा मौनी महाराज हयात असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिला होता. मौनी महाराजांच्या समाधीनंतर तुरूतगिरी हे इ.स. १७२८ पर्यंत पीठपती होते. त्यांनी समाधीपुढील सभामंडप व नगारखाना या इमारती बांधल्या. अशा प्रकारे सतराव्या व अठराव्या शतकात आताचे येथील मंदिर उभे राहिले.

पाटगावच्या मध्यभागी प्रशस्त जागेमध्ये हे मठ-मंदिर वसलेले आहे. त्याच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी भक्कम असे दगडी महाद्वार लागते. हे महाद्वार महाराणी ताराबाई साहेबांनी बांधल्याचे सांगण्यात येते. प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी केलेली आहे. मध्यभागी जुन्या पेशवाई वाड्यासारखी दिसणारी मठ-मंदिराची वास्तू आहे. या मंदिराचा सभामंडप दुमजली आहे. तो दगडात व लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून बांधलेला आहे. सभामंडपास समोरच्या बाजूने बंदिस्त सदरेसारखी जागा आहे. खांब ताशीव लाकडाचे असून, लाकडात कोरलेल्या महिरपीने ते एकमेकांस जोडलेले आहेत. हा सभामंडप मुख्य मंदिरवास्तूस अठराव्या शतकात जोडण्यात आला. जुने मंदिर संपूर्णतः दगडात बांधलेले आहे. प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे.

सभामंडपाचे प्रवेशद्वार पाषाणाची द्वारचौकट असलेले आहे. पाना-फुलांच्या नक्षीने ते सुशोभित केले आहे. द्वारस्तंभांवर वरच्या बाजूला द्वारपालांची दोन छोटी शिल्पे कोरलेली आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील एका द्वारपालाच्या हातात धनुष्यबाण आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे, तर त्याच्या वरील बाजूस कीर्तिमुख कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खास मराठा शिल्पशैलीतील द्वारपालांच्या सुमारे पाच फूट उंचीच्या मूर्ती आहेत. या द्वारपालांच्या मस्तकी कोळ्यांच्या डोक्यावर असते त्या प्रकारची टोपी आहे. कमरेला मांड्यांपर्यंतच्या चोळण्यासारखे वस्त्र आहे. हातात गदेसारखे शस्त्र व कमरेला जांबिया खोचलेला आहे. यातील एका द्वारपालाच्या खांद्यावर शुकशिल्प आहे. द्वारचौकटीच्या वरच्या बाजूला तुळईच्या बाहेर आलेल्या भागांवर अश्वशिल्पे बसवलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडील भिंतीवर अलीकडे तयार करण्यात आलेली भित्तिशिल्पे (म्युरल्स) बसवण्यात आली आहेत. यातील एका भित्तीशिल्पामध्ये मौनी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट चित्रित करण्यात आली आहे, तर उजव्या बाजूस असलेल्या भित्तीशिल्पात सिंहासनाधिष्ठित शाहू छत्रपतींचा दरबार आहे.

या भिंतीच्या छताकडील बाजूस आडवी शिल्पपट्टी आहे. यातील शिल्पे मौनी महाराजांच्या जीवन चरित्राशी संबंधित असावीत असे दिसते. सभामंडपाच्या जगतीवर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला गरूड व हनुमंताचे शिल्प, तसेच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे शरभशिल्प कोरलेले आहे. येथे शरभाने सहा हत्तींना पकडल्याचे दाखवले आहे. असेच परंतु अधिक स्पष्ट शरभशिल्प मंदिराच्या बाह्यभिंतीवरही आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरही अशी अनेक शिल्पे दिसतात. त्यात हत्ती, घोडे, यांबरोबरच उंट, पालखी, वीरयोद्धे यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे या मंदिराचे एक खास आकर्षण मानले जाते.

या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यात डाव्या व उजव्या बाजूस दोन छोटे दरवाजे आहेत. या शिवाय उजेडासाठी छोट्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या भिंतींपासून काही अंतर सोडून दोन्ही बाजूंना चार-चार स्तंभांच्या रांगा आहेत. या अष्टकोनी रुंदसर पाषाण स्तंभांच्या शीर्षस्थानी तरंगहस्त आहेत. त्यांवर कीचक शिल्पे दिसतात. काही ठिकाणी योद्धे, कुस्तिगीर यांचीही शिल्पे आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर वरच्या बाजूलाही शिल्पपट्ट्या आहेत.
गर्भगृहास दगडी द्वारचौकट आहे. द्वारस्तंभावर चक्र, फुले यांची नक्षी तसेच द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व त्यावरील भागात कीर्तिमुख आहे. द्वारचौकटीच्या वरील भिंतीवर म्हणजेच उत्तरांग स्थानी काही शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात मध्यभागी मौनी महाराजांची समाधी आहे. येथे काळ्या पाषाणाचा उंच चौथरा आहे व त्यावर पायऱ्यांसारखी दिसणारी पाच चौकोनांची उतरंड आहे. वरील चौकोनावर कोरलेल्या कमलदलांमध्ये शंकराची पिंडी आहे. पिंडीवर पितळेचा नागफणा व त्याच्या वर तांब्याची गलंतिका (अभिषेक पात्र) आहे. ही चौकोनाकारांची उतरंड एकाच सलग शिळेत कोरलेली असल्याचे सांगण्यात येते.

या समाधी मंदिराच्या मागे तीन बाजूंनी लांबलचक दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या ओसरीस असलेले जाडजूड लाकडी खांब, त्यावरील कोरीव काम, या खांबांमधील महिरप, कडीपाटाची रचना हे सर्व मठाच्या जुन्या वैभवाची साक्ष देणारे आहे. येथील एका द्वारचौकटीच्या वरच्या भागात म्हणजे उत्तरांग स्थानी लाकडात कोरलेले राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे शिल्प लक्षवेधक आहे.

याच प्रांगणात मंदिराच्या डावीकडील बाजूस एक छोटे व घुमटाकार शिखर असलेले दगडी समाधी-मंदिर आहे. येथे मौनी महाराजांनंतरचे मठाधिपती तुरूतगिरी महाराज यांची समाधी आहे. या समाधी मंदिरासमोर छोटी दगडी छत्री व तुळशी वृंदावन आहे. या छत्रीमध्ये छोटी शिवपिंडी आहे. छत्रीवर ‘श्री क्षात्रजगद्‌गुरू निधन ५-७-१९८२’ असा लेख कोरलेला आहे. या समाधी-मंदिराच्या डावीकडेही एका उंच चौथऱ्यावर आणखी एक समाधी बांधलेली दिसते. मंदिरातील समाधीसारखीच या समाध्यांची रचना आहे. या येथील नंतरच्या मठाधिपतींच्या समाध्या असाव्यात. येथे त्याबाबत कोणतीही नोंद नाही.

मौनी महाराजांच्या या समाधी मंदिरात दरवर्षी रथसप्तमीपासून पाच दिवस महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या या स्थळाच्या दर्शनाकरीता, तसेच येथील लाकडात व पाषाणात कोरलेली वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे पाहण्यासाठी येथे सतत पर्यटक व अभ्यासकांचाही राबता असतो.

उपयुक्त माहिती

  • भुदरगडपासून १९ किमी, तर कोल्हापूरपासून ८६ किमी अंतरावर
  • भुदरगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home