
मारुती हा आपल्या भक्तांना आपला सखा, सवंगडी, रक्षक, संकटमोचक, उद्धारकर्ता इतकेच काय तो मायबाप देखील वाटतो. त्यामुळेच मारुतीची मंदिरे त्याच्या विविध नावांनी प्रसिद्ध आहेत. मूर्तीच्या अवस्थेवरून त्याला, झोप्या मारुती, उभा मारुती अशी नावे आहेत. तर मूर्ती लहान किंवा मोठी असेल तर तेव्हाही त्यास बारका मारुती किंवा मोठा मारुती अशा नावाने ओळखले जाते. नंदुरबार शहरात असेच एक भव्य पाषाणमूर्ती असलेले मोठ्या मारुतीचे मंदिर आहे. येथील जागृत मारुती नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या ठिकाणी पूर्वी एका चौथऱ्यावर पंचगव्यापासून बनवलेली मारुतीची मूर्ती होती. हा परिसर नंदुरबार शहराची वेस होती. वेशीबाहेर घनदाट जंगलात असलेले हे ठिकाण निर्जन होते. नंदुरबार शहराचे रक्षण करण्यासाठी नंद राजाने या मारुतीची स्थापना केल्याची अख्यायिका आहे. कालौघात प्राचीन मूर्तीची झीज होऊन ती भंग पावली तेव्हा ग्रामस्थांनी १८५८ साली या नव्या मंदिराची निर्मिती करून त्यात पाषाण मूर्तीची स्थापना केली. पुढे १९७० मध्ये मारुतीची सुमारे ११ फूट उंचीची नवी मूर्ती येथे स्थापित केली. तेव्हापासून हे मंदिर मोठा मारुती म्हणून संबोधले जाऊ लागले. अलीकडील काळात झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.
दुमजली मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वाहनतळ आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती भक्कम आवारभिंत आहे. या भिंतीतील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वारास दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यावरील सज्जावर तीन मेघडंबरी आहेत. डाव्या बाजूच्या मेघडंबरीत गणपती, उजवीकडे लक्ष्मी व मध्यभागी श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. दक्षिण भारतीय शैलीतील या नक्षीदार मेघडंबरींवर कळस आहेत. प्रवेशद्वारावरील नक्षीदार महिरपी कमानीवर पानफुलांची नक्षी आहे. या प्रवेशद्वारातून ११
पायऱ्या चढून मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. येथून पुढे श्रीराम मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपात विठ्ठल–रखुमाई, राधाकृष्ण, श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराशेजारी मोठा मारूती मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावर मारुतीची ११ फूट उंचीची शेंदूरचर्चित, गदाधारी पाषाण मूर्तीं आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व शेजारी चांदीची गदा आहे. मूर्तीच्या मागील पाठशिळेत दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ व त्यावर महिरपी कमान आहे.
मंदिराच्या छतावर द्रविड शैलीतील उरूश्रूंगी प्रकाराचे चौकोनी शिखर आहे. मुख्य शिखरात चारही बाजूंना उपशिखरे व शीर्षभागी घुमटावर स्तुपी, त्यावर कळस आणि ध्वजपताका आहे. प्रांगणात अनेक मंदिरे व त्यात विविध देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. त्यात गणपती, इच्छेश्वर महादेव मंदिर, महालक्ष्मी, दुर्गामाता, राधा कृष्ण, महंत दगडूजी महाराज यांच्या मंदिरांचा समावेश आहे. या सर्व मंदिरांवर निमुळती गोलाकार शिखरे आहेत. मोठा मारुती मंदिराच्या तळघरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व मंगल कार्यालय आहे.
मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, शारदीय नवरात्रौत्सव, महाशिवरात्री आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दर शनिवारी व शनी अमावस्येला भाविकांची गर्दी असते.