बीड जिल्ह्याला मांजरा, गोदावरी व सीना यांसारख्या प्रमुख नद्यांचे वरदान लाभले आहे. येथे सिंदफणा, वाण, मिखाटी, कांगळी, कडी, लेंडी, अमृता, बिंदुसरा, सरस्वती, गुणवती, रेना, केज, लिंबा, चौसाळा, वांगी, होळ, बोकडी, इंचना, बाभती इत्यादी अनेक लहान नद्या वाहतात. मोहिदरा ही मांजरा नदीची उपनदी आहे आणि या नदीच्या तीरावर मादळमोही गावात मोहिमाता देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. जमिनीखालील सुंदर पुष्करणीत असलेल्या या मंदिरातील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. मंदिर मादळमोही गावाच्या मधोमध आहे. असे सांगितले जाते की मोहिदरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मादळ गावाचे पुनर्वसन मोही गावात झाल्यामुळे गावास मादळमोही हे नाव पडले. मोहिमाता ही या गावाची ग्रामदेवता आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी तुळजापूर येथील तुळजा भवानी या ठिकाणी स्वयंभू तांदळा स्वरूपात प्रकट झाली आणि तसा दृष्टांत तिने गावकऱ्यांना दिला. त्यावेळी येथे मंदिर बांधले गेले. काही अभ्यासकांच्या मते ही एक जलदेवता मानली जाते, जी मोही नदीचे एक रूप आहे. त्यामुळे येथील विशाल पुष्करणीत मोही मातेचा तांदळा प्राचीन काळापासून पूजला जातो. हे मंदिर एका प्रशस्त पुष्करणीत वसलेले आहे. या पुष्करणीबाबत
अशी कथा सांगितली जाते की प्राचीन काळी देवीच्या उत्सवाच्या वेळी स्वयंपाक करण्यासाठी या पुष्करणीतून भांडी प्रकट होत असत.
मंदिराभोवती दगडी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दुमजली प्रवेशद्वारे जमिनीपासून सुमारे पंधरा ते वीस फूट खाली आहेत, त्यामुळे पायऱ्या उतरून खाली यावे लागते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी कोरलेली आहे. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या आत लोखंडी कठडे लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन केले आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस छताला पितळी घंटा आणि अष्टकोनी वितानावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्यात दोन्ही बाजूला वातायने व छतावर मध्यभागी पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांचे चौकोनी शिखर आहे.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर पुष्करणीच्या चारही बाजूंना ओसऱ्या असलेल्या जागेत प्रवेश होतो. या ओसऱ्यांमध्ये एकूण २८ नक्षीदार स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. त्यांच्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. या मार्गातून पुष्करणीस प्रदक्षिणा घातली जाते. ओसरीच्या मागील चारही बाजूंच्या भिंतीत एकूण २४ देवकोष्ठके आहेत. सर्व देवकोष्ठकांत स्तंभनक्षी आहे. सद्यस्थितीत ही देवकोष्ठके रिकामी असली, तरी एकेकाळी यात विविध देवतांच्या मूर्ती होत्या, असे सांगितले जाते. ओसरीच्या पश्चिम दिशेला गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर चौकट नक्षी व स्तंभनक्षी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मोहिमातेची संगमरवरी द्विभुज आणि उभ्या स्थितीतील मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात पद्मफूल व दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर मुकुट आहे. पूर्वी गर्भगृहासमोर देवीचा स्वयंभू तांदळा होता, परंतु मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर देवीची संगमरवरी मूर्ती बसवण्यात आली आहे.
गर्भगृहाच्या छतावर सुमारे सात थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या चारही कोपऱ्यांवर सिंहशिल्पे आहेत. शिखराच्या खालील पहिल्या थरात गजथर आहेत. त्यातील गजराज वेगवेगळ्या भावमुद्रेत दिसतात. शिखराच्या दुसऱ्या थरात बारा देवकोष्ठके आहेत आणि त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या तिसऱ्या थरात २४ आमलक व त्यावर कळस आहेत. शिखराच्या चौथ्या व पाचव्या थरात प्रत्येकी बारा देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पाचव्या थरातील देवकोष्ठकांच्या छतांवर शिखर आहे आणि शिखरांच्या शीर्षभागी आमलक आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी दोन आमलक व कळस आहे.
ओसरीतून पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पुष्करणीच्या चारही बाजूंना संयुक्त रचनेच्या पायऱ्या दिसतात. पूर्वी ही पुष्करणी सुमारे पन्नास फूट खोल होती, मात्र अलीकडील काळात पुष्करणीच्या खालील भागातील पायऱ्या ढासळू लागल्यामुळे पुष्करणीत मध्यभागी सिमेंट काँक्रिटचे थर टाकण्यात आले आहेत. काँक्रिट थराच्या मध्यभागी गोलाकार विहीर तयार करण्यात आली आहे. या विहिरीची खोली पुष्करणीच्या मूळ खोली एवढी आहे. या विहिरीत वर्षभर जलसाठा असतो. पावसाळ्यात ही पुष्करणी पाण्याने तुडुंब भरलेली असते.
मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव हा दहा दिवसांचा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानंतर आश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा हा पाच दिवसांचा जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सवाच्या काळात देवीची मिरवणूक (छबिना) ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणेला जाते. यावेळी बारा बैलगाड्या (गाडा) ओढण्याची परंपरा आहे. नवसपूर्ती म्हणून यात्रेच्या वेळी भाविक गाडा ओढतात. नवस पूर्ण झालेले भाविक इतर भाविकांना अन्नदान व वस्त्रदान करतात. दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन, जागरण, गोंधळ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दिवाळी, नागपंचमी, संक्रांत, श्रावण मास आदी सण व उत्सव साजरे केले जातात. भाद्रपदातील गणेश विसर्जन मंदिरातील पुष्करणीत केले जाते. दर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते.