मिरननाथ मंदिर

देवळी, ता. देवळी, जि. वर्धा

मिरननाथ मंदिर हे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याचे ग्रामदैवत समजले जाते. जन्माने मुस्लिम असूनही स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी, नामदेवांचे अभंग लिहिणारे, पंढरपुरात कीर्तन आणि निरुपण करून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या मिरननाथ महाराजांना देवळीवासीयांनी देवत्व बहाल केले. मिरननाथ महाराजांनी १८७८ मध्ये अश्विन शुक्ल अष्टमी या दिवशी देवळी येथे समाधी घेतली. नंतरच्या काळात या जागेवर त्यांचे मोठे मंदिर बांधण्यात आले.

विदर्भ ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतश्री गाडगे महाराज, संत नानाजी महाराज, संत नगाजी महाराज, संत आबाजी महाराज यांसारख्या संतांनी सर्वसामान्य जनतेला जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पारंपरिक विळख्यातून बाहेर काढून परमार्थाचा साधा सरळ मार्ग दाखवला. परकीयांच्या सततच्या आक्रमणांमुळे भरकटलेल्या धास्तावलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून भक्तीच्या मार्गाला लावले. या परंपरेतील एक विठ्ठलाचे उपासक संत मिरननाथ महाराज यांनी कीर्तन निरुपणांतून लोकांच्या मनात विठ्ठल भक्तीची बीजे रोवली. देवळी शहरातील मिरननाथ मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे भरणारी १५ दिवसांची यात्रा ही विदर्भातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते.

मिरननाथ यांचा जन्म पिंजारी मुस्लिम कुटुंबात झाला होता. लहानपणापासून पांडुरंगाची भक्ती वारकरी संप्रदायाकडे त्यांचा ओढा होता. वयाच्या दहाव्या वर्षी ते अमरावती जिल्ह्यातील शेंडोळे गावात आले होते. त्यावेळी येथे श्री विश्वनाथ महाराज यांची कीर्तने होत. मिरननाथ चुकता त्यांची सर्व कीर्तने ऐकत असत. विश्वनाथ महाराज सोप्या शब्दांत अध्यात्म पटवून देत असत. त्यामुळे मिरननाथ प्रभावित झाले त्यांनी विश्वनाथ महाराजांकडे आपणास अनुग्रह द्यावा, अशी विनंती केली. विश्वनाथ महाराजांनीही विठ्ठलावर असलेली निष्ठा सिद्ध करून दाखविण्यासाठी मिरननाथांना स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढण्यास सांगितली. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून मिरननाथांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिली. ते करतानाच त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी आत्मसात केली, त्याचबरोबर त्यांनी संत नामदेवांचे सर्व अभंगही लिहून काढले.

विश्वनाथ महाराजांनी दिलेला अनुग्रह, ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास यामुळे त्यांना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे मनोमन वाटू लागले. त्यासाठी त्यांनी एकदा शेंडोळे येथून पंढरपुरासाठी वारी केली; परंतु मुस्लिम असल्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. तेथून त्यांना हाकलून लावण्यात आले. त्यावेळी ते नाराज होऊन पुन्हा शेंडोळे येथे परतले. पुन्हा दुसऱ्या वेळीही तोच प्रकार. पुन्हा त्यांना पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन घेता परतावे लागले. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी निश्चय केला की पांडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातून परतायचे नाही. त्यानुसार त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील बडव्यांनी त्यांना मंदिरात घेतले नाही.

याबाबत अशी आख्यायिका आहे की बडव्यांनी मंदिर प्रवेश नाकारल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन मिरननाथ महाराजांचे पुंडलिकाच्या मंदिरासमोर सलग १२ ते १४ तास कीर्तन सुरू होते. त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने एका ब्राह्मणाला दृष्टांत देऊन वाळवंटात कीर्तन करीत असलेल्या मिरननाथांना मंदिरात घेऊन ये, असे सांगितले. दृष्टांतानुसार तो ब्राह्मण तेथे जाऊन पाहतो तर सलग कीर्तन करून मिरननाथांच्या पायाला फोड आले होते; परंतु त्यांचे कीर्तन सुरूच होते. त्या ब्राह्मणाने मी तुम्हाला मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातो, असे सांगितल्यावर त्यांनी आपले कीर्तन थांबविले ते ब्राह्मणासोबत मंदिरात जाण्यास निघाले. मंदिराजवळ गेल्यानंतर पुन्हा तोच प्रकार. बडव्यांनी त्यांना दारातच थांबविले. तेवढ्यात त्या ब्राह्मणाचे लक्ष गर्भगृहातील पांडुरंगाच्या मूर्तीकडे गेले असता त्याला पांडुरंगाच्या पायाशी मिरननाथ दिसू लागले. सर्व बडव्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी मिरननाथांची माफी मागितली ते सर्व त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.

वर्धा शहराच्या सीमेवर वर्धादेवळी राज्यमार्गालगत मिरननाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. १८७८ मध्ये अश्विन शुक्ल अष्टमी या दिवशी मिरननाथांनी देहत्याग केला. देहत्याग करण्याच्या एक महिना आधी त्यांनी समाधीसाठी देवळी येथील ही जागा निश्चित केली होती. मिरननाथांच्या जन्मतिथीबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांची जयंती साजरी होत नाही. मात्र अश्विन शुक्ल अष्टमीला त्यांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. यावेळी येथे १५ दिवसांची यात्रा भरते. या उत्सवादरम्यान मिरननाथांची गावातून रथयात्रा काढली जाते. मिरननाथ मंदिराचा महाद्वार तीन मजली असून तिसऱ्या मजल्यावर मध्यभागी गणेशमूर्ती आहे त्यावर कळस आहेत. मंदिराचे बांधकाम प्राचीन असून ते हेमाडपंती रचनेचे आहे. गर्भगृहात मिरननाथांचे समाधी स्थान असून या स्थानाच्या समोरील बाजूस त्यांची मूर्ती आहे. मंदिरात विठ्ठलरुख्मिणी यांच्या मूर्ती, नंदी शिवपिंडीही आहे. याशिवाय या मंदिरात शिवराम महाराज ठाकूर आणि हरिसूत ऊर्फ रामजी हरी फुटाणे यांच्या समाध्या आहेत.

उपयुक्त माहिती:

  • देवळी बसस्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • वर्धा शहरापासून १७ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home