म्हाडका देवी मंदिर

कासार्डे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील अष्टभुजाधारी महिषासुरमर्दिनीचे रूप असलेल्या म्हाडका देवीचे मंदिर कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हाकेला धावणारी नवसाला पावणारी, अशी या देवीची ख्याती आहे. माहेरवाशिणींमध्ये (या गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रिया) विशेष प्रिय असलेल्या देवतांमध्ये कोकणातील या देवीचा समावेश होतो. त्यामुळे ११ १२ मे रोजी येथील वार्षिक उत्सवाच्या वेळी हजारो माहेरवाशिणी देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी येतात. माहेरवाशिणींसोबतच या उत्सवासाठी कोकणातील हजारो भाविक हजेरी लावतात. त्यामुळेच देवीच्या अनेक लोकगीतांतूनसंपूर्ण कोकण कासार्डे येथे अवतरतो’, असा उल्लेख येतो

कणकवली या निसर्गसमृद्ध तालुक्यात, मुंबईगोवा महामार्गापासून साधारणतः दोन किमी अंतरावर, कासार्डे या गावातील घनदाट वनराईमध्ये म्हाडकादेवीचे सुंदर प्रसिद्ध मंदिर आहे. जमिनीपासून उंचावर असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. १५ ते २० पायऱ्या चढल्यावर तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण फरसबंदी असलेल्या या प्रांगणाच्या मध्यभागी म्हाडका देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका उंच चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाचे वैशिष्ट्य असे की त्यावर आमलक कळस आहे. साधारणतः मंदिराच्या मुख्य शिखरावर आमलक कळस असतात. याच चौथऱ्यावर दीपस्तंभाच्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह अशी म्हाडका देवी मंदिराची रचना आहे. चार खांबांवर असलेला येथील दर्शनमंडप खुला असून त्यावर लहानसे शिखर, आमलक कळस आहे

सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. येथील सभामंडप हा अर्धखुल्या प्रकारचा आहे त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. या कक्षासनांच्या वर असलेले खांब एकमेकांशी कमानीसदृश्य आकाराने जोडलेले आहेत. कोकणी स्थापत्यशैलीनुसार सभामंडपाचा मधला आयताकृती भाग हा बाजूच्या जमिनीपासून काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्ठकांमध्ये गणपती सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस एका कमी उंचीच्या वज्रपीठावर वाघावर आरूढ म्हाडका देवीची अष्टभुजाधारी मूर्ती आहे. सोनेरी मुकुट, कपाळावर कुंकू, नाकात नथ, कानात कर्णकुंडले, हातांमध्ये विविध अस्त्रे, हिरवी साडी नेसलेली अंगभर दागिने ल्यालेली ही देवीची मूर्ती सुबक भासते. मंदिराच्या सभामंडपावर एक लहानसे शिखर गर्भगृहावर मुख्य शिखर आहे

दरवर्षी ११ १२ मे या दोन दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. कधीकधी हा उत्सव तीन दिवसांचा असतो. यावेळी मंदिर परिसरासह संपूर्ण गावाचीही सजावट केली जाते. ठिकठिकाणी पताका लावल्या जातात विद्युत दिव्यांची रोषणाई केलेली असते. प्रत्येक घरासमोर, तसेच गावातील रस्त्यांवरही रांगोळ्या काढल्या जातात. या उत्सवासाठी सर्व माहेरवाशिणी चाकरमानी आवर्जून उपस्थित असतात. कणकवली तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी ही एक यात्रा मानली जाते. या यात्रोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. म्हाडका देवीचे हे जागृत स्थान असल्यामुळे या उत्सव काळात देवीला नवस बोलण्यासाठी तसेच पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठीही भाविकांची गर्दी असते. ११ मे या दिवशी मंदिरात सत्यनारायणाची महापूजा होते. या दोन्ही दिवशी येथे भजन, भजनाची डबलबारी, कीर्तन असे अनेक कार्यक्रम होतात. या उत्सवाच्यावेळी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी केली जाते

यात्रोत्सवाच्या दोन दिवसांत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिर समिती आणि ग्रामस्थांतर्फे दुपारी सायंकाळी मोफत जेवणाची सुविधा असते. त्यासाठी ५०० किलोहून अधिक तांदूळ, २५० किलो भाजी, २५० किलो डाळ जिलेबी बनविली जाते. या उत्सवाशिवाय येथे नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या मंदिरात शिवलिंग असल्यामुळे महाशिवरात्र श्रावणी सोमवारीही अनेक भाविक दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • कणकवलीपासून २६ किमी, तर खारेपाटणपासून २० किमी अंतरावर
  • कणकवली, राजापूर खारेपाटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home