ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. गाणपत्य संप्रदायाचा प्रसार व प्रचारासाठी प्रयत्नशील असलेल्या गणेश उपासिका संध्याताई अमृते यांनी हे मंदिर उभारले अहे. येथे होणाऱ्या विविध उत्सवांना हजारो भाविक हजेरी लावतात. विविध रूपांतील सुमारे तीन हजार गणेशमूर्तींचा संग्रह असलेली गणेश आर्ट गॅलरी हे येथील वैशिष्ट्य आहे.
अनेक वर्षांपासून गणेश भक्तीचा प्रसार व प्रचार करणाऱ्या संध्याताई अमृते यांना त्यांचे वडील, ज्येष्ठ गाणपत्य (गणेश भक्त) महादेव लोखंडे यांच्याकडून हे मंदिर उभारण्याची प्रेरणा मिळाली. ४ मे २००१ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उपासनेच्या तक्तपोशीवर रचलेल्या या मंदिराचे, तसेच त्यासमोरील अंगीरस आश्रमाचे भूमिपूजन व शिलान्यास सोहळा झाला. ११ मे २००५ रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केम्पवाडचे गणेश महाराज यांच्या हस्ते मंदिराच्या कलशाची स्थापना व प्रतिष्ठापना करण्यात आली. ३० एप्रिल २००६ रोजी संध्याताई अमृते व दिलीप अमृते यांच्या हस्ते मंदिरातील परिवार देवता व कळसाची स्थापना झाली.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील देसले पाडा–भोपरच्या कमानीतून जाणाऱ्या रस्त्याने लोढा हेरिटेज संकुलाच्या कमानीजवळ आल्यावर काही पावलांवर मंदिराची कमान लागते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या बाजूला कारंजा, तसेच सेल्फी पॉइंट दिसतो. येथून काही पावलांवर मंदिराची दुमजली वास्तू आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गणेश आर्ट गॅलरी व पहिल्या मजल्यावर मयुरेश्वर मंदिर आहे. मंदिरालगत असलेल्या एका नग्नभैरवाच्या मंदिरातील भैरवाचे दर्शन घेतल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नग्नभैरवाची मूर्ती असलेल्या मंदिरात यज्ञशाळा, नवग्रहांच्या मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, तसेच नाग–नागिणीच्या मूर्तीही आहेत.
दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे मयुरेश्वर मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात नंदी आणि मूषक यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी संगमरवरी कासवमूर्ती आहे. येथील भिंतींवर गोंदवलेकर महाराज, साईबाबा, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या डावीकडे गणेश गायत्रीची, तर उजवीकडे गणेश दत्ताची मूर्ती आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या गर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर मोरगावच्या मयुरेश्वरासारखी गणेशाची डाव्या सोंडेची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर नाग व दोन बाजूला रिद्धी–सिद्धीच्या मूर्ती आहेत. येथील चांदीच्या मखरातील महिरप आकर्षक आहे. त्यावर अष्टविनायक कोरण्यात आले आहेत. अष्टविनायकांच्या मध्ये नागफणा असून त्यावरच्या भागात कीर्तिमुख आहे. अष्टविनायक मूर्तींच्या खाली दोन्ही बाजूंना सोंड उंचावलेले हत्ती आहेत. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या महिरपीवर मोर, पऱ्या, गजांतलक्ष्मी, ॐ तसेच चंद्र–सूर्य कोरण्यात आले आहेत. दररोज पहाटे ५.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन मयुरेश्वराचे दर्शन घेता येते.
मंदिरात गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी) आणि वसंत पंचमीला मोठा उत्सव होतो. या दोन्ही दिवशी हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेला या मंदिरात गणेशाचे आगमन झाल्याने, त्या दिवशी येथे विशेष उत्सव होतो. गणेश चतुर्थी आणि ऋषी पंचमीलाही येथे मोठा उत्सव होतो. नवरात्रोत्सवात होणाऱ्या सोहळ्यात नऊ दिवस गणेशगायत्री मातेचा दर्शन सोहळा होतो. दत्त जयंतीला गणेश दत्त देवतेचा मोठा उत्सव होतो. संकष्टी तसेच विनायकी चतुर्थीला गणेशाची विशेष पूजा होते. गुरुपौर्णिमेला मंदिरात पालखी मिरवणूकही निघते. ४ मे रोजी अमृते यांच्या जन्मदिनीही येथे मोठा सोहळा होतो. याशिवाय मंदिरात गुढीपाडवा, त्रिपुरी पौर्णिमा, अक्षय्य तृतीया या दिवशीही विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
येथे सतत धार्मिक पारायणे, यज्ञयाग, पूजा, अनुष्ठान, आध्यात्मिक शिबिरे, चक्री पारायण, संध्याताई अमृते यांचे प्रवचन आदी कार्यक्रमही होतात. मंदिराचा मयुरेश्वर सेवा मंडळ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टही आहे. २३ जानेवारी १९९६ रोजी स्थापन झालेल्या या ट्रस्टच्या माध्यमातून विविध आध्यात्मिक व सामाजिक प्रकल्प राबवले जातात. या ट्रस्टतर्फे किडनी रुग्ण, गरजू, होतकरू विद्यार्थी, गतिमंद मुलांच्या संस्थांना मदत दिली जाते. विविध नैसर्गिक व मनुष्यनिर्मित आपत्तींदरम्यानही ट्रस्टतर्फे लोकांना मदत केली जाते.
काही शुल्क भरून या मंदिराच्या तळमजल्यावरील ‘गणेश आर्ट गॅलरी’ पाहता येते. यामध्ये देशातील अनेक राज्यांसह चीन, थायलंड, दुबई आदी विविध देशांतील गणेशमूर्तींच्या प्रतिकृती आहेत. शंख–शिंपल्यापासून बनवलेली मूर्ती, विठ्ठल, ज्ञानेश्वरांच्या रूपातील मूर्ती, पिंपळपानातील गणेश, विविध धातू व रत्नांपासून घडवलेल्या गणेशमूर्ती, सुमारे ८०० वर्षे जुन्या पंचधातूंच्या मूर्ती, याकच्या शिंगांपासून बनवलेला गणेश आदी सुमारे तीन हजार गणेश मूर्तींचा संग्रह येथे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंदिराला भेट दिलेली बल्लाळेश्वराची मूर्तीही येथे आहे. शनिवार तसेच रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ही गॅलरी खुली असते.