माऊली महाराज समाधी मंदिर

चाकरवाडी, ता. बीड, जि. बीड

महाराष्ट्राला महनीय संत परंपरा लाभलेली आहे. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, तर सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी या संप्रदायाचा कळस चढवला. त्यानंतरही ही संत परंपरा अखंड प्रवाही ठेवण्याचे कार्य अनेक संतांनी केले. सन १९१८ मध्ये संत बंकटस्वामी यांनी बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेचे फलित म्हणून संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, बाबुराव डवरी, श्रीकृष्णदास महाराज अशी अनेक संत रत्ने तयार झाली. याच शिक्षण संस्थेत भीमाशंकर गिरी यांनी वारकरी संप्रदायाचे धडे गिरवले आणि त्यांच्यापोटी १९३० मध्ये संत माऊली महाराज यांचा जन्म झाला. संत माऊली महाराजांचे समाधी मंदिर बीड जिल्ह्यातील चाकरवाडी गावात आहे. येथे आजही संत माऊली महाराजांचा अनुग्रह होतो, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. चाकरवाडी गावात बाळनाथ महाराज यांचे प्राचीन समाधी मंदिर आहे. उत्तरेश्वर पिंपरी हे जन्मगाव असलेले संत ज्ञानेश्वर माऊली महाराज १९९० मध्ये चाकरवाडी येथील बाळनाथ महाराजांच्या मठात आले. या ठिकाणी राहून ते जनतेची आध्यात्मिक सेवा करू लागले. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबर त्यांनी नित्य अन्नदान सुरू केले. त्यांच्या सहवासात भाविकांना आध्यात्मिक अनुभूती होऊ लागल्यामुळे, ते एक संत व दैवी सत्पुरुष असल्याची प्रचिती लोकांना येऊ लागली. लाखो भाविकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. १६ जून २००० रोजी संत माऊली महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या पश्चात अनुयायांनी महाराजांचे व त्यांच्या पत्नी भागीरथीबाई गिरी (आईसाहेब) यांचे भव्य समाधी मंदिर येथे उभारले. हे मंदिर गावापासून काही अंतरावर स्थित आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे; तसेच तिथे विविध वस्तूंची दुकाने आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची सुबक रचना आहे. मंदिर प्रांगणापेक्षा उंच जोत्यावर बांधले आहे. मुखमंडपात प्रवेश करण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. मुखमंडपापेक्षा सभामंडप उंच असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर दहा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत आणि कठड्यावर गजराज शिल्पे आहेत. सभामंडपाचे प्रवेशद्वार मुक्तद्वार स्वरूपाचे आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा खेळती राहण्यासाठी वातायने आहेत. येथे प्रत्येकी सहा नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सर्व स्तंभ भक्कम स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार कोरले आहेत. येथील स्तंभ, तुळई, सज्जा व छतावर विविधरंगी वेलीबुट्टी आणि पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपात स्तंभांच्या रांगा व भिंती यांच्या मधील सुमारे सहा फूट जागेत दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. सभामंडपापेक्षा उंच असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला सात पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत रिकामी देवकोष्टके आहेत आणि भिंतीवर शंख, चक्र आदी शुभचिन्हे आहेत. सुमारे बारा फूट उंच व आठ फूट रुंद असलेले हे प्रवेशद्वार भव्य दिसते. या द्वारशाखेवर विविध भौमितिक नक्षी आहे; तसेच प्रवेशद्वारास लाकडी नक्षीदार महिरपी तोरण आहे. गर्भगृहात वज्रपीठावर माऊली महाराजांची पद्मासनात बसलेली ध्यानस्त मुद्रेतील मूर्ती आहे.

गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. येथून तळमजल्यावर असलेल्या माऊली महाराजांच्या समाधीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तळमजल्यावर समाधी चौथरा आहे आणि त्यावर मुख्य समाधी पाषाण आहे. मागील भिंतीवर महाराजांचे चित्र असलेली तसबीर आहे. येथून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूस दरवाजा आहे. या दरवाजातून मंदिराच्या मागे असलेल्या उद्यानात प्रवेश होतो. मंदिराच्या बाह्यभिंती नक्षीकामाने सुशोभित आहेत. छतावर चहुबाजूंनी कठडा आहे. कठड्यात समोरील देवकोष्ठकात माऊली महाराजांची मूर्ती आहे; तसेच ठरावीक अंतराने लघूशिखरे आहेत. सभामंडपाच्या व गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी शिखरे आहेत. त्यावर कुट व शाल रचना आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आणि त्यावर कळस आहे.

या मंदिराच्या सन्निध माऊली महाराजांच्या पत्नीचे, म्हणजेच आईसाहेबांचे समाधी मंदिर आहे. या मंदिरास समोर एक व डाव्या-उजव्या बाजूला प्रत्येकी एक असे एकूण तीन मुखमंडप आहेत. तसेच समोरील मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला गजराज शिल्पे आहेत. मुखमंडपातून काही पायऱ्या चढून वर आल्यावर सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी सात चौकोनी नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सभामंडपापेक्षा गर्भगृह उंचावर असल्यामुळे तिथे जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व महिरप तोरण आहे. गर्भगृहात वज्रपीठावर आईसाहेबांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने सांधार प्रकारचा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि येथून तळघरात असलेल्या समाधीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तळघरात समाधीचा चौथरा आहे आणि त्यावर समाधीचे शीर्षपाषाण आहे. मागील भिंतीवर आईसाहेबांचे चित्र असलेली तसबीर आहे. मंदिराच्या छतावर द्रविडी शैलीतील पाच शिखरे आहेत आणि शिखरांच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहेत.

मंदिरापासून जवळच मारुतीचे दुमजली मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथे दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन पायरीमार्ग आहेत. बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप प्रशस्त आहे आणि तिथे हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा आहे आणि कठड्यात उभ्या व आडव्या रचनेची लघुशिखरे आहेत. सभामंडप व गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील शिखरे आहेत. शिखरांच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहेत. मंदिरापासून जवळच विशाल अन्नछत्र मंडप आहे. याच मंडपात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मंदिरात वर्षातून तीन वेळा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. श्रावण महिन्यात बाळनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने, ज्येष्ठ महिन्यात माऊली महाराजांची पुण्यतिथी व आईसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. याशिवाय मंदिरात दसरा, दिवाळी, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आदी तिथींना भाविकांची मोठी गर्दी होते. रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि मंदिरात दैनंदिन अन्नछत्र चालते.

उपयुक्त माहिती:

  • बीड येथून ३३ किमी अंतरावर
  • बीड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

माऊली महाराज समाधि मंदिर

चाकरवाड़ी, ताल. बीड, जिला. बीड

Back To Home