मराठा साम्राज्याचा इतिहास आणि अध्यात्म याचा अनोखा संगम वाळव्यातील मच्छिंद्रगडावर झालेला आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रनाथांच्या नावाने उभारलेला हा गड आहे. आजही या गडाच्या अवशेषांतून शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये येथे पाहावयास मिळतात. किल्ला आकारास येण्यापूर्वी या डोंगरावर नाथ संप्रदायातील आद्यनाथ मत्स्येंद्रनाथ तथा मच्छिंद्रनाथ, तसेच गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांचे वास्तव्य होते. या थोर विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड आज नाथ संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थस्थळ मानले जाते.
नाथ संप्रदायाच्या इतिहासातील मत्स्येंद्रनाथ हे पहिले ऐतिहासिक पुरूष मानले जातात. ‘हठयोगप्रदीपिका’ या ग्रंथावरील टीकेत ब्रह्मानंद यांनी मत्स्येंद्रनाथांच्या अवताराची कथा दिलेली आहे. ती आख्यायिका अशी की एकदा एका नदीकाठी भगवान आदिनाथ पार्वतीला योगाचा उपदेश करीत होते. तेव्हा त्या पाण्यातील माशाने तो ऐकला व मनाची एकाग्रता होऊन तो निश्चलकाय बनून राहिला. ते पाहिल्यानंतर त्याने उपदेश ऐकल्याचे आदिनाथाच्या लक्षात आले. तेव्हा आदिनाथाने त्याच्यावर कृपा करून जलप्रोक्षण केले व त्याबरोबर त्या माशाचा मत्स्येंद्रनाथ बनला. संत ज्ञानेश्वर हेही नाथपंथीय होते व त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या अखेरीस गुरुपरंपरा सांगताना या कथेचा निर्देश केला आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, की ‘आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।।’
मत्स्येंद्रनाथ यांची मच्छिंद्रनाथ, मच्छेंद्रपाद, मच्छघ्नपाद, मीनपाद आदी विविध नामरूपे विविध ग्रंथांत आढळतात. मत्स्येंद्रनाथ यांचे मूलस्थान अज्ञात आहे. थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मते मत्स्येंद्रनाथ यांचा काळ इ.स. १०१५ पूर्वीचा आहे. त्यांच्या नावावर ‘कौलज्ञाननिर्णय’, ‘अकुलवीरतंत्रम्’, ‘कुलानंदतंत्रम्’, ‘ज्ञानकारिका’, तसेच ‘योगविषय’, ‘मत्स्येंद्रसंहिता’ असे ग्रंथ आहेत. यातील पहिले चार ग्रंथ हे कौलमताचे ग्रंथ आहेत. कौलमत ही शाक्ततंत्राची एक शाखा आहे. यातील कुल म्हणजे शक्ती व अकुल म्हणजे शिव. कौलमत हा शिव आणि शक्तीच्या समरसीकरणाचा मार्ग आहे. मत्स्येंद्रनाथ यांच्या कौलमतामध्ये मद्य, मत्स्य, मांस, मुद्रा व मैथून या पंचमकारांप्रमाणेच विष्ठा, धारामृत, शुक्र, रक्त व मज्जा ही पंचपवित्रे मानण्यात येत असत. मद्यमांसादी कुलद्रव्यांचे सेवन करून, तसेच मैथुनादी तांत्रिक प्रक्रियांच्या द्वारे समाधीसुख मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. यास वामाचार असे म्हणत. गुरु गोरक्षनाथ हे मत्स्येंद्रनाथांचे शिष्य होते. त्यांना संत ज्ञानेश्वरांनी ‘विषयविध्वंसैकवीर’ असे म्हटले आहे, कारण गोरक्षनाथांनी या वामाचारी तंत्रसाधनेविरुद्ध आंदोलन उभे केले व भारतीय साधनेचे शुद्धीकरण केले. गोरक्षनाथांनी योगिनींच्या जाळ्यातून मत्स्येंद्रनाथांची सुटका केल्याची कथा याच संदर्भात येते. मत्स्येंद्रनाथ हे योगिनीकौलमतात अडकले होते. त्यांचा शिष्य असलेल्या गोरक्षनाथांनी त्यांना त्यातून मुक्त केले.
अशा या गुरू–शिष्याचे वास्तव्य वाळव्यातील या परिसरात काही काळ होते. याबाबत येथे अशी आख्यायिका सांगण्यात येते की आपल्या भ्रमणकालात मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या परिसरात आले होते. त्यावेळी मत्स्येंद्रनाथांच्या झोळीत सोन्याची वीट होती. स्नानासाठी जाताना ही झोळी त्यांनी गोरक्षनाथांकडे सोपवली. जड लागल्याने त्यांनी त्यात काय आहे ते पाहिले. त्यात सोन्याची वीट पाहिल्यावर आपल्यासारख्या योग्यांना या विटेचा काय फायदा म्हणत त्यांनी ती वीट पाण्यात फेकून दिली. ते कळल्यावर मत्स्येंद्रनाथ खूप चिडले. वेड्यासारखे करू लागले. तेव्हा आपल्या गुरुला शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने शेजारचा संपूर्ण डोंगर सोन्याचा केला. गोरखनाथांनी आपले सामर्थ्य दाखल्यावर मत्स्येंद्रनाथांचे समाधान झाले. आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी आपण असे वेड्यासारखे वागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसराला आता ‘येडे मच्छिंद्र’ या ग्रामनामाने ओळखले जाते, तर आख्यायिकेत उल्लेख असलेला तो डोंगर म्हणजे मच्छिंद्रगड असल्याचे सांगितले जाते. या घटनेची आठवण म्हणून आताही दर बारा वर्षांनी येथे नाथपंथीय साधुंचा मेळा जमतो.
धुंडीसूत मालू या कवीच्या ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथाच्या २३व्या अध्यायात ही सोन्याचा डोंगर केल्याची कथा वर्णिलेली आहे. मात्र या कथेमध्ये या डोंगराचे नाव गर्भगिरी असे दिलेले आहे. या अध्यायातील आठव्या ओवीत ‘मार्गी चालितां गोदासव्य। तो वाल्मीकस्थान विपिनमय। गर्भगिरि पर्वतप्राय। येऊनियां तेथें पोचले।।’ असा गर्भगिरीचा उल्लेख आहे. त्याच प्रमाणे ६८व्या, तसेच ८३व्या ओवीतही गर्भगिरीचा नामोल्लेख आहे. ८३ व ८४व्या ओवीत हा पर्वत सोन्याचा कसा केला हे सांगितले आहे, ते असे – ‘तो महानग पर्वत गर्भगिरी। उभे चढले तयावरी। चढतां लघुशंका करी। पर्वतमाथा गोरक्ष।। सिद्धीयोग मंत्र जपूनी। मंत्रधार कनकवर्णी। सकळ पर्वत देदीप्यमानी। शुद्ध हाटकीं मिरवला।।’ गर्भगिरीचा हा पर्वत नगर जिल्ह्यात आहे. तेथील गोरक्षनाथ गड ते डोंगरकिन्ही या दरम्यानच्या पर्वतरांगेला गर्भगिरी म्हणून ओळखले जाते.
वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारल्याची नोंद आहे. ‘सभासद बखरी’त ‘राजियांनी नवे गड वसविले त्यांची नावांनिशीवार सुमारी गड रास दुसरी (१०८)’ या मथळ्याखाली जी यादी दिलेली आहे, त्यात या गडाचा उल्लेख ‘मच्छंद्रगड’ असा आहे. इ.स. १६७६च्या सुमारास याची उभारणी झाली असावी असे इतिहासकारांचे मत आहे. १६९३मध्ये हा गड औरंगजेबाच्या ताब्यात गेला. १७५५ मध्ये शाहुराजांनी गड जिंकला. त्यानंतर त्याची जबाबदारी औंधच्या पंतप्रतिनिधींकडे होती. १७६३ साली राघोबादादांचे पक्षपाती सरदार नारो गणेश व राधो विठ्ठल यांनी किल्ला ताब्यात घेतला होता. पण श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर गड पुन्हा पंत प्रतिनिधींकडे गेला. १८१० साली बापू गोखल्यांनी तो पंत प्रतिनिधींकडून घेतला. अखेर १८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला. या गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मच्छिंद्रगड गावातून आणि दुसरा मार्ग बेरड माची गावातून आहे. हल्ली थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यत नेणारा गाडी रस्ताही झाला आहे. माथ्यावर मध्यभागी मत्स्येंद्रनाथांचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती तटबंदी आहे. त्यात असलेल्या बुरुजासारख्या रचनेतून मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे वीस पायऱ्या आहेत. वर आल्यानंतर नजरेत भरतात ती दोन मोठी शोभिवंत तुळशीवृंदावने. शके १८६५ (इ.स. १९४३) मध्ये ही तुळशीवृंदावने बांधण्यात आली होती. जवळच नव्यानेच लाकडी गाडे तयार करून त्यावर मांडलेल्या तोफा दिसतात. मंदिरासमोर असलेल्या एका झाडाच्या पाराच्या बांधकामात एक शिलालेखाचा पाषाण दिसतो.
मंदिरातील एका संगमरवरी शिळेवर, हे मंदिर इ.स. १९३१ ते १९३६ या काळात लवणमाची आणि बेरडमाची गावातील लोकांनी बांधल्याची नोंद दिसते. अर्थात मूळ मंदिराची उभारणी त्यापूर्वीची आहे. मंदिराच्या बाजूला काही भग्न शिल्पकृती, तसेच कोरीव दगड दिसतात. त्याच्या बाजूलाच एका वास्तुचे भग्नावशेष आहेत. येथे फार पूर्वीपासून मंदिर असल्याच्या त्या खुणा आहेत.
दोन तुळशीवृदांवनांमधून मंदिराच्या दिशेने जाताना समोर नंदी चौथरा लागतो. काळ्या नंदीच्या मूर्तीवर उत्तम कोरीवकाम आहे. सभामंडपात प्रवेश करताच डाव्या बाजूला नाथांची धुनी दिसते. मंदिराच्या सभामंडपाची बांधणी लाकडी जुन्या धाटणीची आहे. त्याच्या बाहेर असलेल्या भिंती मात्र दगडी आहेत. मंदिराची रचना दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. प्रत्येक थरात देवकोष्टके आहेत व शीर्षभागी कमळदल नक्षी असलेला आमलक आणि त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दुहेरी द्वारशाखांवरची नक्षी झिजलेली आहे. गर्भगृहाची घडण दगडी आहे. येथे नंतर झालेल्या जीर्णोद्धारात आधुनिक टाईल्सचा वापर झाला आहे. गर्भगृहात मत्स्येंद्रनाथ लिंग स्वरूपात आणि मूर्ती स्वरूपात स्थापित आहेत. या स्थानाच्या आणखी वर दोन मूर्ती आहेत. त्या मत्सेंद्रनाथांच्या शिष्योत्तमांच्या असल्याचे सांगितले जाते. गडावर गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची स्वतंत्र मंदिरेही आहेत.
मत्स्येंद्रनाथ मंदिराच्या अगदी शेजारीच पत्र्याचे छत असलेले एक साधेसुधे पण पुरातन मंदिर आहे. त्यातही तीन मुख्य आणि इतर छोटे पाषाण मांडलेले दिसतात. हे नवनाथांचे मंदिर असल्याचे सांगतात. थोडे मागच्या बाजूला गहिनीनाथांचे छोटेखानी मंदिरही आहे. या ठिकाणी गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून गहिनीनाथांना विविध विद्या प्रदान केल्याची कथा सांगण्यात येते. येथूनच थोड्या अंतरावर दोन समाध्या आहेत. यापैकी एक समाधी नाथभक्त मारुतीबुवा यांची व दुसरी त्यांच्या पत्नीची आहे. मारुतीबुवा अंध होते. तरीही नाथांच्या पुजेसाठी ते दररोज गड चढून येत. त्या भक्तराजाचा गौरव करण्यासाठी त्यांना येथे स्थान दिल्याचे सांगतात.
या समाधीपासून काही अंतरावर गडावरच्या सर्वात उंच ठिकाणी गोरक्षनाथांचे मंदिर आहे. याही मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी आतील नंदीसह असलेले शिवलिंग आणि गोरक्षनाथांची दगडात कोरलेली मूर्ती त्याच्या पुरातनतेची साक्ष देतात. मच्छिंद्रगडावर पाहण्याजोग्या अशा अनेक वस्तु आणि वास्तु आहेत. त्यात दक्षिण टोकावर असलेला बुरुज, त्यावरील छत्री, चुन्याचा पुरातन घाणा, परिसरात असलेले पाण्याचे टाके, दत्त मंदिर आणि दगडात कोरलेले राम मंदिर यांचा समावेश आहे. येथील मत्स्येंद्रनाथांच्या मंदिरास शासनाचा ‘क’ वर्ग दर्जा आहे.