हिंदू धर्मात अनेकविध पंथ, विचारधारा, देव, संत, साधू-संन्यासी आणि महापुरुष होऊन गेले आहेत. हिंदू धर्म हा प्रत्येक ‘जीवाच्या ठाई देव पाहणारा’ इतकेच काय तर पशुपक्षी आणि अगदी ‘निर्जीवाचे ठाई सुद्धा देव पाहणारा’ आहे. चराचरात भगवंत मानत जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी देव पाहणारा भाविक अगदी डोंगराची व पाषाणाचीही पूजा करतो. देवासोबतच देवाच्या भक्तीत लीन झालेल्या भक्तालाही तो देवत्व बहाल करतो. त्यामुळेच देशात अनेक देवभक्तांची मंदिरे पहायला मिळतात. अशाच महादेवाची निस्सीम भक्त असलेल्या रत्नेश्वरी देवीचे एक प्राचीन मंदिर लोहा तालुक्यातील वडेपूरी गावाजवळील डोंगर माथ्यावर आहे.
रत्नेश्वरी देवीबाबत आख्यायिका अशी की वडेपूर गावातील नारायण व लक्ष्मी माळी यांच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला व मातापित्यांनी तिचे नाव रत्नेश्वरी ठेवले. ती शंकराची निस्सिम भक्त होती व रोज सूर्योदयापूर्वी उठून ती शंकराच्या मंदिरात जाऊन पूजापाठ करीत असे. यथावकाश रत्नेश्वरीचे लग्न शंभूनाथ माळी याच्याशी झाले. लग्नानंतरही तिने आपला नित्यनेम चालू ठेवला, मात्र शंभूनाथाला पत्नी रत्नाचा संशय येऊ लागला. एके दिवशी रत्नेश्वरी सूर्योदयापूर्वी शिवमंदिरात जायला निघाली, तेव्हा शंभूने तिचा पाठलाग केला. वाटेत गाठून तो तिचा शिरच्छेद करणार इतक्यात रत्नेश्वरीच्या अंगावर विजेचा लोळ पडून ती शिळेत रूपांतरित झाली. त्याच क्षणी देवी प्रकट झाली व तिने सांगितले की आपणच रत्नेश्वरीच्या रुपात जन्म घेतला होता आणि आता आपला वास या शिळेत कायम राहील. पुढे येथे या देवीचे मंदिर बांधले गेले. तेव्हापासून देवी सर्व भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करते, अशी श्रद्धा आहे.
हेमाडपंती शैलीचे हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या माथ्यावर असलेल्या मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ व पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. पुढे मंदिराचे प्रशस्त महाद्वार आहे. महाद्वारात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार स्तंभ व त्यावर छत आहे. समोरील स्तंभांवर द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत, तर छतावर सिंह शिल्पे आहेत. दोन्ही बाजूस असलेल्या छतावर महिरप कमानीने जोडलेले प्रत्येकी दोन वामन स्तंभ व त्यावरील सज्जावर तीन मेघडंबरी आहेत. त्यात मध्यभागी असलेल्या मेघडंबरीत रत्नेश्वरी देवीची मूर्ती आहे. उजवीकडील मेघडंबरीत महादेव व डावीकडे गणपतीची मूर्ती आहे. महाद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या बाजूला गोड्या पाण्याचे त्रिशूल कुंड आहे. अशी मान्यता आहे की देवीने आपल्या हातातील त्रिशूल जमिनीवर मारल्याने या कुंडाची निर्मिती झाली होती. या कुंडातील पाण्याने स्नान केले असता त्वचारोग बरे होतात, अशी श्रद्धा आहे. देवीच्या मंदिरात जाण्याआधी या कुंडातील पाण्याने शुचिर्भूत होऊन जाण्याची प्रथा आहे.
प्रांगणापासून उंचावर असल्याने मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे २५ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे व वर पत्र्याचे छत आहे. त्यापुढे आणखी पाच पायऱ्या चढल्यावर सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद चौकोनी व स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, गोलाकार अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. षटकोनी आकाराच्या वितानावर चक्राकार नक्षी व आकर्षक पाषाणी झुंबर आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास धातू आच्छादित नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात मागील भिंतीलगत रत्नेश्वरी देवीचा स्वयंभू पाषाण मुखवटा असून त्यावर चांदीचे डोळे लावलेले आहेत. असे सांगितले जाते की देवीचे संपूर्ण शरीर जमिनीत आहे व केवळ मुख जमिनीवर राहिले आहे. ही देवीची मूर्ती संगमरवरी मखरात विराजमान आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या मागे, बाह्य बाजूस देवीचे केस आहेत, असे मानले जाते.
मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. सभामंडपाच्या छतावर प्रवेशद्वाराकडील बाजूस पाच घुमटाकार लघूशिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर सात थरांचे द्वादशकोनी भव्य शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात बारा देवकोष्ठके असून त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक देवकोष्ठकावर शिखर व त्यावरील आमलकावर कळस आहेत. मुख्य शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिरापासून काही अंतरावर गर्द झाडीत एक शिवमंदिर आहे. रत्नेश्वरी देवी नेहमी या शंकराच्या मंदिरात पूजेसाठी येत असे, असे सांगितले जाते.
या मंदिरात नवरात्रौत्सव हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवरात्रीदरम्यान मंदिरातील त्रिशूल कुंडात दहा दिवस अखंड दीप प्रज्वलित करण्यात येतात. यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांतून भाविक पायी दिंडीने या देवीच्या दर्शनासाठी येतात.