मारुती मंदिर

मानवाडी, ता. हदगाव, जि. नांदेड

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जडणघडणीत मारुती किंवा हनुमानाचे स्थान अनन्यसाधारण आहे. राज्यात मारुती उपासनेचा प्रसार करण्याचे मोठे श्रेय समर्थ रामदास स्वामींना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तरुणांमध्ये शक्ती, युक्ती आणि स्वाभिमान जागवण्यासाठी समर्थांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात ‘११ मारुती’ स्थापन केले. आज प्रत्येक गावात मारुतीचे मंदिर पाहायला मिळते. समर्थांनी दिलेला शक्ती आणि भक्तीचा वारसा या मंदिरांमधून आजही जपला जात आहे. त्यापैकीच एक प्रसिद्ध व जागृत स्थान म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मानवाडी येथील मारुती मंदिर होय. हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील मारुती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

येथील पुजाऱ्यांच्या मते हे मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. परिसरातील प्राचीन मूर्ती व दीपमाळ पाहता त्याच्या प्राचीनत्वाची खात्री पटते. परंतु मंदिराचा नेमका कालखंड सिद्ध करू शकेल, असा कोणताही शिलालेख अथवा ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर भव्य स्वागतकमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूंना नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. त्यावर महिरप आणि स्तंभांवरील आडव्या तुळईवर ‘महिरप बाशिंग’ कोरलेले आहे. बाशिंगात मध्यभागी देवकोष्ठक आहे, ज्यात मारुतीचे शिल्प आहे. कमानीवर बाशिंगाच्या दोन्ही बाजूस दोन व वर मध्यभागी एक, असे एकूण तीन आमलक आणि त्यावर कळस आहेत.

मानवाडी गावाच्या वेशीवर वसलेल्या या मारुती मंदिरापर्यंत पक्की सडक आहे. प्रवेशद्वारासमोर लोखंडी स्तंभावर पत्र्याचे छत असलेला मंडप आहे. रस्त्यापेक्षा उंचावर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाह्य बाजूस लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चौथरे आहेत. येथे पूजा साहित्याची दुकाने थाटली जातात. मंदिराच्या फरसबंदी केलेल्या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणात प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला सलग तीन मंदिरे आहेत. यातील पहिले मंदिर श्रीराम-लक्ष्मण-सीता यांचे आहे. दुसऱ्या मंदिरात विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती, तर तिसऱ्या मंदिरात संत गाडगेबाबा व कैकाडी महाराज या संतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्राचीन पाषाणी बांधणीचा चौथरा आहे. त्यावर सुमारे पंधरा फूट उंचीचा व तीन थर असलेला दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ वरच्या बाजूस निमुळता होत गेला आहे. या चौथऱ्यावर भाविक दिवे व कापूर प्रज्वलित करतात. या चौथऱ्यासमोर शनि मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर शनिदेवाची उठाव शैलीतील पाषाण मूर्ती आहे. शनि मंदिराच्या बाह्य भिंतीस लागून प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मेघडंबरीत गणेशाची मूर्ती आहे. मेघडंबरीच्या बाजूला शेंदूर लावलेले पाच गोलाकार पाषाण आहेत. हे स्थानिक देवतेचे पाषाण असल्याचे सांगितले जाते. या पाषाणांच्या बाजूला असलेल्या वटवृक्षाच्या पारावर पाषाण पादुका, नंदी व काही जीर्ण मूर्ती आहेत. प्रांगणात डावीकडे सरस्वती देवीचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर हातात वीणा असलेली सरस्वती देवीची मयुरारूढ मूर्ती आहे. प्रांगणात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रशस्त सभागृह व इतर वास्तू आहेत.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी येथील मारुती मंदिराची रचना आहे. अलीकडील काळात बांधलेल्या अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपात यज्ञकुंड देखील आहे. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वर्तुळ व त्यात पुष्प नक्षी कोरलेली आहे. स्तंभशाखांवर आडव्या धारेची नक्षी दिसते, तर ललाटबिंबावरील देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. देवकोष्ठकावर पर्णलता नक्षीचे तोरण कोरलेले आहे. प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार सरकत्या झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. येथे मेजावर मारुतीची पितळी उत्सवमूर्ती आहे.

त्यानंतर गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. मूर्तीवरील मुखवटा व मुकुट चांदीचा आहे. मूर्तीसमोर चांदीच्या पादुका आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखरातील खालील दोन थर अष्टकोनी आहेत आणि त्यात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. तिसरा नक्षीदार थर गोलाकार व वर निमुळता होत गेला आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.

मंदिरात चैत्र शुद्ध नवमी (श्रीराम नवमी) ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या काळात मोठा जत्रोत्सव साजरा केला जातो. या काळात काकडा, भजन, पारायण, प्रवचन, हरिपाठ, नामसंकीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र पौर्णिमेला पहाटे ४ ते ६ या वेळेत मारुतीचा अभिषेक व आरती केली जाते. तसेच सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत येथे जन्मोत्सवाचे कीर्तन होते. यावेळी देवाची पालखी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. त्यावेळी अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखीत सहभागी होण्यासाठी गर्दी करतात. दर शनिवारी व मंगळवारी देखील देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथे भंडारा म्हणजेच अन्नदानाचे नवस केले जातात. त्यामुळे विशेषतः शनिवारी येथे महाप्रसादाचे आयोजन असते.

उपयुक्त माहिती:

  • हदगाव येथून ७ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ६१ किमी अंतरावर
  • हदगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

मारुति मंदिर

मनावाडी, ता. हदगांव, जिला. नांदेड़

Back To Home