हिंदू धर्मात देवता, ऋषीमुनी, साधुसंत आणि महापुरुषांचा पदस्पर्श लाभलेली ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून गणली जातात. त्यात नद्यांच्या तीरावर असलेली तीर्थक्षेत्रे व मंदिरे विशेष महत्त्वाची मानली जातात. असेच एक प्राचीन मंदिर नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या तीरावर आहे. मार्कंड गावातील हेमाडपंती शैलीतील सुबक दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती व त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना येथे दर्शन दिले होते. त्यामुळे येथील हा जागृत महादेव भक्ताच्या हाकेला धावून येतो व नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मार्कंड गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. प्राचीन आख्यायिकेनुसार, ऋषी मृकंद व मनस्विनी यांच्या पोटी जन्मलेल्या मार्कंडेय ऋषींना ‘आपण अल्पायुषी आहोत’ हे समजल्यावर, त्यांनी महादेवाला प्रसन्न करून सात कल्प आयुष्य मागून घेतले. (हिंदू पुराणानुसार, ‘एक कल्प’ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. मानवी वर्षगणनेनुसार ते ४,३२,००,००,००० वर्षे होतात.) दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार,
‘कर्म श्रेष्ठ की ज्ञान’ या विषयावर देव आणि ऋषीमुनी यांच्या सभेत मोठी चर्चा झाली. त्यावेळी ‘कर्म श्रेष्ठ’ असे ठाम मत मार्कंडेय ऋषींनी व्यक्त केले. मात्र, या वादावर अंतिम निर्णय करण्यासाठी सर्व देवांनी महादेवाला साकडे घातले. शेवटी महादेवाने मार्कंडेय ऋषींचे म्हणणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला. ही देवसभा गोदावरी नदीच्या काठावर म्हणजेच सध्याच्या मंदिराच्या ठिकाणी भरली होती, असे सांगितले जाते.
हे मंदिर गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले आहे. मंदिरापर्यंत पक्की सडक असून येथे वाहनतळ आहे. वाहनतळापासून मंदिराच्या प्रांगणापर्यंत सुमारे २५ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना स्टेनलेस स्टीलचा संरक्षक कठडा आहे. तसेच, पायऱ्यांच्या मध्यभागी असलेल्या कठड्यामुळे येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार झाले आहेत. पेव्हर ब्लॉक बसवलेल्या स्वच्छ प्रांगणात पायरीमार्गाच्या डाव्या बाजूला पाच थरांच्या पिरॅमिडसदृश चौथऱ्यावर नक्षीदार तुळशी वृंदावन आहे. चौथरा व वृंदावनाच्या भिंतीत दीपकोष्ठके आहेत. या प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. तुळशी वृंदावनासमोर मार्कंडेश्वर मंदिर व बाजूला प्राचीन शिवमंदिर आहे.
मार्कंडेश्वर मंदिर प्रांगणापेक्षा उंच असलेल्या अधिष्ठानावर उभे आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस कठडे व त्यालगत चौथरे आहेत. मुखमंडपात दोन्ही बाजूस कठड्यावर नक्षीदार अर्धस्तंभ आहेत. स्तंभपाद वर्तुळाकार व स्तंभदंड षटकोन, अष्टकोन, चौकोन अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. स्तंभावर गोलाकार कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर पुढच्या दिशेने उतरते छत आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार सरकत्या झडपा आहेत. या बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभांचा तळाकडील सुमारे तीन फूट भाग चौकोनी व त्यावरील भाग चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारांत आहे. शीर्षभागी वर्तुळाकार कणी व त्यावर हस्त आहेत. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. उजव्या बाजूला चौथऱ्यावर लोखंडी हुंडी आहे.
पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांच्या बाजूला देवकोष्ठके आहेत. उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती व डावीकडे विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर पानफुलांची नक्षी आहे. नक्षीदार स्तंभशाखांवर सज्जा व मंडारकास चंद्रशीळा आहे. गर्भगृहात मधोमध जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पाचफणी पितळी नाग आहे. जलधार धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर हातात शिवलिंग धरलेल्या मार्कंडेय ऋषींचे ध्यानस्थ मुद्रेतील शिल्प आहे. त्याच्या बाजूला बाल्यावस्थेतील मार्कंडेय ऋषींनी शिवपिंडीला मिठी मारलेली मूर्ती आहे. या मूर्तीत महादेवाने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आहे, असे दृश्य आहे. या मूर्तीच्या शेजारी रेड्यावर बसलेल्या यमाची मूर्ती आहे. मुखमंडपाच्या छतावर चौकोनी शिखर व त्यावर चार नक्षीदार स्तंभ आहेत. शिखराच्या दर्शनी भिंतीवर कमळफुलांची नक्षी व देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी संरक्षक कठडा आहे. त्यातील दर्शनी बाजूच्या सहा देवकोष्ठकांत गणपती, महादेव, राम, कृष्ण आदी देवतांच्या मूर्ती आहेत.
मार्कंडेश्वर मंदिराच्या शेजारी आणखी एक प्राचीन शिवमंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. वितानावर चक्राकार नक्षी व त्यात मध्यभागी पाषाणी झुंबर आहे. अंतराळातून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभशाखा व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीवरील उत्तरांगावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. अंतराळापेक्षा खाली असलेल्या गर्भगृहात तीन पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृहात मधोमध जमिनीवर शिवपिंडी आहे. मंदिराच्या वाहनतळालगत गोदावरी नदीच्या काठावर बांधीव पायऱ्यांचा घाट आहे.
मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वार्षिक उत्सवाचे वेळी व श्रावणातील सर्व सोमवारी देवाचा लघुरुद्र व महाअभिषेक केला जातो. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.