मन्नाथेश्वर मंदिर

घोगरा, ता. नरखेड, जि. नागपूर

नागपूर ते वरूड मार्गावरील भारसिंगी गावापासून किमी अंतरावर असलेल्या घोगरा गावाच्या टेकडीवर अतिप्राचीन मन्नाथेश्वर मंदिर आहे. या परिसरात वनवासकाळात श्रीराम, लक्ष्मण सीता यांनी काही काळ वास्तव्य केले होते. श्रीरामांनी मन्नाथगड येथे शिवलिंग स्थापित करून महादेवांची पूजाअर्चा केली होती, अशी आख्यायिका आहे. गुरू मच्छिंद्रनाथ (मन्नाथबाबा) यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून या तीर्थक्षेत्राला मन्नाथगड आणि येथील महादेवाला मन्नाथेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

मन्नाथेश्वर देवस्थान उंच टेकडीवर असल्यामुळे येथील वातावरण निसर्गरम्य आहे. घोगरा गावावरून मन्नाथगडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून तो वळणावळणाचा तीव्र चढाईचा आहे. मन्नाथगड ही या परिसरातील सर्वात उंच जागा आहे. मंदिराच्या प्रांगणातून खाली असलेल्या सुमारे १५ गावांचे विहंगम दृश्य दिसते. एका आख्यायिकेनुसार, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना त्र्यंबकेश्वरनाशिक येथून मोझरीच्या दासटेकडीवर आले होते. तेथून ते मन्नाथगडला आले आणि काही काळ त्यांनी येथे वास्तव्य केले. मन्नाथगडाहून त्यांनी नागपूरजवळील रामटेककडे प्रस्थान केले. मन्नाथगडाच्या पायथ्याला सीता न्हाणी आहे. काळ्या कातळांनी बांधलेला हा कुंड येथील एक तीर्थस्थान आहे.

मन्नाथेश्वर मंदिर हे हेमाडपंती असून सभामंडप, अंतराळ गाभारा अशी त्याची रचना आहे. या पूर्वाभिमुख मंदिराच्या सभामंडपात १६ दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर विशेष असे कोरीव काम दिसत नाही. अंतराळात नंदी स्थित असून तेथून फूट खाली गाभारा आहे. गर्भगृहात असलेल्या शिवपिंडीचा आकार चौकोनी आहे. मंदिराच्या भिंतींना बाहेरील बाजूने त्रिकोणी आकाराच्या भिंती बांधून आधार दिलेला आहे. गर्भगृह अंतराळावर शिखर आहे.

मन्नाथेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या मंदिरात त्रिकोणी आकाराची शिळा आहे. ही गुरू मच्छिंद्रनाथ (मन्नाथबाबा) यांची मूर्ती आहे. हे मंदिर नंतरच्या काळात बांधण्यात आले. या मंदिराच्या जागेवर पूर्वी एक घोगलीचे झाड होते आणि त्याखाली ही मन्नाथबाबांची मूर्ती होती. मन्नाथबाबा नवसाला पावतात, अशी श्रद्धा असल्याने तेव्हा भाविक घोगलीच्या झाडाला लाल कपड्याची चिंधी बांधून नवस करत असत. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आधी मन्नाथबाबांची मूर्ती त्रिकोणी आकारात होती. आता त्या मूर्तीला नाक, कान, डोळे, तोंड असे अवयव दिसू लागले आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनेकदा मन्नाथगडावर कार्यक्रम झालेले आहेत. त्यांचे येथे लहानसे मंदिरही आहे. तुकडोजी महाराज यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त येथे उत्सव साजरे केले जातात. याशिवाय येथे रामदास महाराज यांची समाधी आहे. मूळ बुलढाण्याचे असलेले रामदास महाराज यांनी मन्नाथेश्वर मंदिरात ११ वर्षे तपश्चर्या केली होती. मूळ मंदिराशिवाय शेजारी असणाऱ्या लहान मंदिरांचे बांधकाम परिसराचा विकास त्यांच्याच काळात झाला.

प्रत्येक सोमवारी मन्नाथेश्वर मंदिरात महादेवांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय ऋषी पंचमीला श्रावण महिन्यातील सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. निसर्गरम्य वातावरण आणि अतिप्राचीन असलेल्या या मंदिराला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला आहे.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून ९२ किमी, तर नरखेडपासून ३८ किमी अंतरावर
  • नरखेडपासून भारसिंगी गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध नाही
Back To Home