क्षेत्रपाल देवतांच्या पूजनाची परंपरा आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. गाव, नगर आणि क्षेत्रांचे रक्षक देव हे शंकराचे अवतार मानले जातात. त्यांच्या मूर्ती विविध स्वरूपात असल्या तरी गाभाऱ्यासमोर असणारा नंदी शिवअवतारावर शिक्कामोर्तब करतो. ग्रामरक्षक देवतांच्या यात्रा उत्सवांच्या परंपराही हजारो वर्षे टिकून आहेत. या परंपरेतील एक प्राचीन, प्रसिद्ध आणि स्वयंभू माणकेश्वर मंदिर वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या पेठ गावात आहे. येथील जागृत देव नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माणकेश्वराचे हे देवस्थान किती वर्षे प्राचीन आहे याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. ते एक हजार वर्षांहूनही प्राचीन असल्याचे सांगितले जाते. हे स्वयंभू देवस्थान गावापासून काही अंतरावर आहे. प्राचीन काळी गावातील मानकऱ्यांनी गावाचे रक्षण करण्यासाठी देवाला येथे येण्याचे आवाहन केले. तेव्हा आपण याच ठिकाणी विद्यमान असल्याचा दृष्टांत देवाने दिला. त्या दृष्टांतानुसार मानकऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला असता, सध्या मंदिर जेथे आहे त्या ठिकाणी देवाची स्वयंभू पाषाणमूर्ती आढळली. त्यानंतर याच जागी देवाची स्थापना करून येथे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने येथे भव्य व सुंदर अशा दाक्षिणात्य स्थापत्यशैलीतील मंदिराची उभारणी करण्यात आली. हे मंदिर आज भाविकांप्रमाणेच या परिसरात येणाऱ्या पर्यटकांचेही आकर्षणस्थळ बनले आहे.
पेठ गावाच्या सीमेवर असलेल्या या मंदिरास भक्कम आवारभिंत आहे. या आवारभिंतीत पूर्वेकडे असलेल्या भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभालगत व्यालशिल्प व द्वारपाल आहेत. प्रवेशद्वारावरील सज्जावर दाक्षिणात्य प्रकारचे पाच थरांचे उंच गोपूर आहे. गोपुरातील प्रत्येक थरात गवाक्षांच्या दोन्ही बाजूस द्वारपाल व त्यांच्या बाजूस विविध पौराणिक प्रसंग दाखवणारी देवतांची शिल्पे, स्तंभ, घुमट, कळस आहेत. गोपुराच्या शीर्षभागी रांगेत सात कळस आहेत.
आवारभिंतीत उत्तर व दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन नक्षीदार स्तंभ व स्तंभांच्या पुढे गदाधारी द्वारपाल आहेत. स्तंभांवरील सज्जावर शिखर आहे. शिखरात तीन देवकोष्टके व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला मंदिराच्या आवारभिंतीजवळ माणकेश्वराचा रथकक्ष आहे. उत्सवकाळात वापरला जाणारा दुमजली लाकडी रथ येथे ठेवलेला आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून पुढे काही पायऱ्या चढल्यावर उंच जगतीवर उभ्या असलेल्या मंदिरासमोर येता येते. या मंदिरासमोर चौथरा व त्यावर वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार दीपमाळ आहे. पायापासून शिखरापर्यंत संपूर्ण दीपमाळ पानाफुलांसह विविध नक्षीकामाने सुशोभित आहे. प्रांगणात दुसऱ्या बाजूला नक्षीदार तुलसी वृंदावन आहे. येथून पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात येता येते. उत्तर प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यास समोर चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. पुढे गर्भगृहासमोर बारा लाकडी स्तंभ असलेला खुला मंडप आहे. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या मंडपास विशिष्ट विधीने परिक्रमा केली असता दैवी अनुभव येतात तसेच मानसिक व शारीरिक बाधा दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) हवा खेळती राहण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात चारही कोनांत चार नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर मंदिराचे वर व खाली असे दोन भागात विभागलेले छत आहे. सभामंडपातील भिंतींवर विविध देवतांच्या प्रतिमा आहेत.
पुढे दोन स्तंभ व तीन महीरपी कमानी असलेले अंतराळ आहे. मधल्या कमानीच्या वर भिंतीवर नंदीमुख आहे. अंतराळातील डाव्या बाजूच्या देवकोष्टकात मारुती व उजव्या बाजुला गणपतीची मूर्ती आहे. दोन्ही देवकोष्टकांमध्ये गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या तिनही द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती आहे. मंडारकावर पानाफुलांची नक्षी आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर चार स्तंभ असलेल्या दगडी मखरात माणकेश्वर देवाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे सुवर्ण प्रभावळ व त्यात मध्यभागी नागछत्र आहे. मखराच्या घुमटावर दोन्ही बाजूस यक्षशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूस, चतुरानन ब्रह्मा, शिव, महिषासुरमर्दिनी, गणपती, यक्षिणी, यक्ष आदी शिल्पे व नक्षीदार स्तंभ, त्यावर कणी व हस्त आहेत. गर्भगृहाच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे व त्यावर नंदी, शिवगण, नटराज, २५ मुखांचा रावण, दशभुजा यक्षिणी आदी शिल्पे आहेत. मंदिराच्या मुखमंडपावर चार, सभामंडपावर एक व गर्भगृहावर एक अशी एकूण सहा शिखरे आहेत. सभामंडपावरील शिखर चौकोनी आहे. गर्भगृहावरील शिखर उरूशृंग प्रकारचे आहे. शिखराच्या चारही बाजुला पानाफुलांची नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वज पताका आहे.
मंदिराच्या मागे डाव्या बाजूस जोगेश्वरी देवीचे व उजव्या बाजूस नायकोबा देवाचे मंदिर आहे. दोन्ही मंदिरास प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. छतावर शिखर व कळस आहेत. शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. नायकोबा मंदिरात वज्रपिठावर ढाल व तलवार धारण केलेली नायकोबा देवाची द्विभुज मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात या मंदिराचा सन १८८५ साली जीर्णोद्धार झाला असल्याचा शिलालेख कोरलेली शिला आहे. मंदिरात महाशिवरात्रीपासून पाच दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान गावातील खंडोबा देवाची व माणकेश्वर देवाची पालखी एकत्रित ग्रामप्रदक्षिणा घालतात. या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होतात. दररोज सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात माणकेश्वर देवाचे दर्शन घेता येते.
पेठ या गावाला सिद्धपुरुषांची मोठी परंपरा लाभलेली आहे. या गावात अठराव्या शतकापासून अनेक सिद्धपुरुषांनी जिवंत समाधी घेतली आहे. त्यात धनंजय महाराज (१७३०), रामजी काका महाराज (१७९१), भगवानदास महाराज (१८१४), कान्होबा महाराज, रघुवीर महाराज, नाथपंथी महाराज १, नाथपंथी महाराज २, गंगाधर स्वामी, सिद्राम स्वामी, आनंदमूर्ती, पेठकर यांचा समावश आहे. पेठ या गावाची आणखी एक ओळख म्हणजे सुप्रसिद्ध मराठी कथा आणि कादंबरीकार शंकर पाटील यांचे हे मूळ गाव होय.