माणकेश्वर मंदिर

माणकेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव

स्थापत्यकलेचा प्राचीन वारसा जपणाऱ्या मोजक्या मंदिरांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर मंदिर हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. खिद्रापूर येथील कोपेश्वर, देगलूर येथील सिध्देश्वर, सिन्नर येथील ऐश्वर्येश्वर, पुरंदरच्या पायथ्याशी असलेले नारायणेश्वर, अंबरनाथ येथील शिवमंदिर आदी प्राचीन शिल्पकला असलेल्या मंदिरांच्या यादीत भूम येथील माणकेश्वर मंदिराचे नाव आवर्जून येते. या मंदिरासोबत असलेल्या सटवाई मंदिरामुळे या ऐतिहासीक मंदिराला वेगळे वलय प्राप्त झालेले आहे.
विश्वरुपा नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर सन ११०० ते ११५० या काळातील आहे. यादव राजा तिसरा सिंघणदेव याने या मंदिरास दान दिल्याचा शिलालेख मंदिर परिसरात सापडला असल्याने मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध होते. मंदिरावरील शिल्पकला, हेमाडपंती स्थापत्यशैली आदी गोष्टी हा ऐतिहासीक प्राचीन वारसा असल्याचे सांगतात. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की चालुक्य राजा दक्ष याने या मंदिरात माणिक लिंगाची स्थापना केली होती. त्यामूळे या देवाला माणकेश्वर नाव पडले. दुसऱ्या अख्यायिकेनुसार हे मंदिर असुरांनी एका रात्रीत बांधले व पहाट होताच ते अदृश्य झाले.
गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरासमोर वाहनतळ आहे. हे मंदिर तीन फूट उंच अधिष्ठानावर आहे. अधिष्ठानात अधःपाद, कणी व विविध नक्षीथर आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस जगतीवर गजथर, नरथर व पुष्पथर आहेत. मुखमंडपात दोन्ही बाजूस कक्षासने व त्यांवर चार नक्षीदार स्तंभ आहेत.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभपादावर उभे असलेले हे स्तंभ वर्तुळाकार, चौकोन, षट्कोन, अष्टकोन अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. त्यांवर विविध शिल्पे, भौमितिक आकृत्या, पर्ण-पुष्पे, प्राणी-पक्षी, सर्प, विविध देव-देवता आदी शिल्पे व नक्षी कोरलेल्या आहेत. स्तंभपटलावर पौराणिक प्रसंग दाखवणारी शिल्पे कोरलेली आहेत. येथील एका स्तंभावर विष्णूचे वराह अवतारशिल्प व दुसऱ्या स्तंभावर वेणूगोपाळ शिल्प आहे. या शिल्पात बासरी वाजवणाऱ्या चतुर्भुज श्रीकृष्णाच्या मागील दोन हातांत शंख व चक्र आहे. सभामंडपात मध्यभागी जमिनीपेक्षा काही इंच उंच रंगशिला आहे. रंगशिलेवर चारही कोनांवर स्तंभ आहेत.
सभामंडपाच्या पुढे असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास सप्तद्वारशाखा आहेत. त्यांत खालील बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे, वर वेलबुट्टीशाखा, व्यालशाखा, नरशाखा, स्तंभशाखा यांचा समावेश आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगेवर शिखरशिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिला व त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे. अंतराळाच्या तिन्ही बाजूस तीन गर्भगृहे आहेत. मुख्य, उजव्या व डाव्या बाजूच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारांना प्रत्येकी पाच द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिकाशिल्पे व वर वेलबुट्टीशाखा, नरशाखा, व्यालशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व त्यावर शिखरशिल्पे आहेत.
मुख्य गर्भगृह अंतराळापेक्षा सुमारे आठ फूट खाली आहे. दहा पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. या पिंडीवर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीच्या बाजूला पितळी त्रिशूल आहे. उजव्या बाजूच्या गर्भगृहातही शिवपिंडी आहे. मात्र डावीकडील गर्भगृह रिक्त आहे. तिन्ही गर्भगृहांच्या वितानांवार नक्षी आहेत.
मंदिराच्या मंडोवरांवर एकूण १०९ मूर्ती आहेत. मंदिरातील एकूण मूर्तींची संख्या ३४७ आहे. मंडोवरावर मध्यभागी असलेले पत्रलेखिका सुरसुंदरी शिल्प वादग्रस्त झाल्याने महत्वाचे ठरले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मूर्तीची सटवाई म्हणून पूजा केली जात असे. त्यामुळे या मूर्तीस शेंदूर लेपन केले जात असे. परंतू प्राचीन मंदिर व शिल्पकला अभ्यासकांच्या मते शेंदूरलेपन केल्याने मूर्ती विद्रूप होऊन ऐतिहासीक शिल्पांना धोका निर्माण होतो. हल्ली या मूर्तीचे शेंदूर लेपन काढून टाकले आहे. त्यामुळे ही मूर्ती आता मूळ रूपात पाहता येते.
येथे एक भैरव मूर्ती आहे. भैरवाच्या गळ्यात नरमुंड माळा व हातात कपाळखड्ग आहे. पायाजवळ नंदी आहे. येथेच एक विष्णू मूर्ती आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा ही आयुधे व पायाजवळ गरुड आहे. शैव व वैष्णव या प्राचीन काळापासून एकमेकांना विरोधी समजणाऱ्या दोन पंथात समेट घडवून आणण्याचे काम करणारी हरीहर मूर्ती देखील येथे आहे. मूर्तीच्या पायाजवळ एका बाजूला गरुड व दुसऱ्या बाजूला नंदी असल्याने ही मूर्ती सहज ओळखता येते. याच रांगेत शाक्त पंथीयांची पूज्य देवता महिषासुरमर्दिनीची मूर्तीही आहे. या मूर्तीच्या बाजूला गळ्यात नरमुंडमाळा, हातात नरमुंड, डमरू व पायाला नागबंध असलेल्या भैरवाची मूर्ती आहे. याशिवाय येथे पुत्र वल्लभा, विषकन्या, मर्दला, नर्तकी आदी सुरसुंदरी शिल्पे आहेत. मंडोवरात तीन देवकोष्टके आहेत. कधी काळी येथे देव मूर्ती असाव्यात, असे अभ्यासकांचे मत आहे. मंदिराच्या मागे बाह्य बाजूस अभिषेकाचे पाणी जाण्यासाठी मकरमुख शिल्प आहे. मंदिराच्या बाह्य बाजूने अधिष्ठानावरून प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
या मंदिराच्या समोर नंदीमंडपाचे अधिष्ठान आहे. अधिष्ठानातील गजथर उत्तम स्थितीत आहे. सध्या येथे फक्त चौथरा आहे. त्यावर नंदी व इतर शिल्पे आहेत. मात्र वरील मंडप नाहीसा झालेला आहे. प्रांगणात एक मेघडंबरी व त्यात शिवलिंग आहे. शिवमंदिराच्या बाजूला सटवाई देवीचे अलिकडील काळात बांधलेले मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावर सटवाई देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.
महाशिवरात्री हा माणकेश्वर महादेवाचा मुख्य जत्रोत्सव तर चैत्र पौर्णिमा हा सटवाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. देवीला कोंबडे, बकरे, साडी, चोळी, खण, नारळ आदी नवस बोलण्याची प्रथा आहे. श्रावण मास, अधिक मास, चैत्र पाडवा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी या वेळी मंदिरात विशेष उत्सव साजरे केले जातात. उत्सवकाळात हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • भूम शहरापासून १४ किमी, तर धाराशिवपासून ५५ किमी अंतरावर
  • भूम येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : भालचंद्र जाधव, मो. ९४०४४१७५००
Back To Home