भायखळा हे मुंबईतील पहिल्या श्रेणीतील ‘हेरिटेज’ रेल्वेस्थानकांपैकी एक असलेले स्थानक होय. येथे मुंबईच्या रेल्वेइतकेच जुने असलेले आणि अनेक शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले माणकेश्वर महादेवाचे मंदिर वसले आहे. त्या काळात सुमारे ५० हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे शिवमंदिर ऐतिहासिक मंदिर स्थापत्यकलेचा वारसा जपत आजही उभे आहे. जागृत मानले जाणारे शिवलिंग, काळ्या पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती, मराठा स्थापत्यशैलीतील दोन दीपमाळा आणि उंच शिखर हे या मंदिराचे आकर्षण आहे.
या भागास भायखळा हे नाव कसे पडले याच्या अनेक उत्पत्त्या सांगितल्या जातात. ‘गॅझेटियर ऑफ ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट’मध्ये याविषयीची नोंद अशी आहे की या नावाचा संबंध बहावा किंवा भावा (कॅशिया फिस्टुला) या झाडाशी आहे. बहावा आणि खळे या दोन शब्दांनी मिळून भायखळा हे नाम तयार झाले असावे, असे गॅझेटियरकारांचे म्हणणे आहे. ‘कालनिर्णय’कार जयराज साळगावकर यांच्या ‘मुंबई शहर गॅझेटियर’ या मराठी पुस्तकात असे म्हटले आहे की ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव भाया होते. भायाचे खळे म्हणून भायखळा हे नाव अस्तित्वात आले.
ही व्युत्पत्ती सर्वप्रथम रावबहादूर पी. बी. जोशी यांनी दिली, असे डॉ. अरुण टिकेकर यांच्या ‘स्थल-काल’ या ग्रंथात म्हटले आहे. मुंबईविषयक जुन्या इंग्रजी पुस्तकांमध्ये भायखळा ही गुरचरणाची जागा होती. १८५७ च्या बंडानंतर पाच वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात गोविंद नारायण माडगांवकर यांनी असे म्हटले आहे की ‘पूर्वीं नागपाडा, भायखळें ह्मटलीं म्हणजे केवळ अप्रयोजक ठिकाणें होतीं. हीं गुराख्यांचीं रहायाचीं व ढोरें चरविण्याचीं ओसाड स्थळें होती. तीं आज राजे लोकांस वस्ती करण्याजोगीं झालीं आहेत.’ यावरून भायाचे खळे ही व्युत्पत्ती असमर्पक असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
येथील हंसराज लेन या शांत परिसरात माणकेश्वर महादेवाचे मंदिर उभे आहे. या मंदिराचा इतिहास मुंबईतील रेल्वेच्या इतिहासास समांतर आहे. मुंबईमध्ये रेल्वेमार्ग टाकण्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव (सायन) येथे झाली. याच सुमारास भायखळा येथील हे मंदिर बांधण्यास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर शेठ हंसराज करमशी रत्नसी या श्रीमंत व्यापाऱ्याने ५० हजार रुपये खर्चून बांधले असून येथील गल्लीस त्यांचेच नाव देण्यात आले आहे.
मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ रोजी रेल्वे धावली. यानंतर वर्षभरात कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी ‘लोखंडी रस्त्याचें संक्षिप्त वर्णन’ हे पुस्तक लिहिले. ‘लार्डनर साहेबाच्या रेलवे इकॉनमी नामक ग्रंथा’तील मजकुराचे भाषांतर करून लिहिलेले हे पुस्तक १८५४ साली ‘दक्षिणी भाषेंत पुस्तकें प्रसिद्ध करणाऱ्या मंडळींच्या आज्ञेवरून गणपत कृष्णाजी यांचे छापखान्यांत छापिलें.’ या पुस्तकामध्ये चित्रकार आनंदराव रघुनाथजी यांनी काढलेले ‘भायखळ्यावरील लोखंडी रस्त्याचें ठाणें’ या नावाचे चित्र आहे. त्यात एका मंदिराचे शिखर दिसते. मुंबईच्या इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते हे माणकेश्वराचे मंदिर आहे व मूळचे भायखळा रेल्वेस्थानक हे सध्याच्या स्थानकाच्या दक्षिणेस माणकेश्वर मंदिरानजीक होते. काही अभ्यासकांच्या मते, मुंबईचे गव्हर्नर ल्युसियस कॅरी (लॉर्ड फॉकलंड) यांच्या पत्नी अमेलिया कॅरी (लेडी फॉकलंड) यांनी त्यांच्या आत्मवृत्तात, हे मंदिर भायखळा स्टेशनला खेटून असल्याचे म्हटले आहे. मुंबई-ठाणे या पहिल्या रेल्वे प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या इंजिनास लॉर्ड फॉकलंड यांचे नाव देण्यात आले होते.
या प्रवासात स्वतः लेडी फॉकलंड सहभागी झाल्या होत्या. त्यांनी भारत, इजिप्त व सीरियातील त्यांच्या वास्तव्यावर आधारित ‘चाव-चाव’ (हर्स्ट अँड ब्लॅकेट पब्लिशर्स, लंडन, १८५७) हे पुस्तक लिहिले असून त्यात महाराष्ट्रातील काही मंदिरांचा उल्लेख आहे. त्यात माणकेश्वर मंदिराचा समावेश नसला, तरी हे मंदिर पहिल्या रेल्वेमार्गाच्या बांधकामाच्या काळातच उभारण्यात आल्याचे स्पष्ट आहे.
भायखळा पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर मोठ्या आवारात हे मंदिर वसले आहे. मंदिर आवारास अलीकडच्या काळात बांधलेले मोठे प्रवेशद्वार आहे. नक्षीदार खांब, महिरपी कमान, स्तंभांच्या दोन्ही बाजूंस गजराजांची उठावशिल्पे, वरच्या बाजूस आडवी छत्री असे या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. वरच्या छत्रीमध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे. तिच्या एका बाजूस नंदी, तर एका बाजूस सिंहाची मूर्ती आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या मंदिर आवारात मध्यभागी हे भव्य मंदिर उभे आहे. त्याच्या समोर दोन बाजूंना दोन उंच दीपमाळा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना असून मंदिर उंच जगतीवर बांधले आहे. सात पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप साधारणतः दोन मजल्यांएवढा उंच व प्रशस्त आहे. त्याच्या वरच्या भागात सुंदर नक्षीकाम केलेला कठडा असून या कठड्यावर शैवप्रतिमा विराजमान आहेत. सभामंडपास समोरून,
बाजूने व मागे अशी पाच प्रवेशद्वारे आहेत, तसेच अनेक उंच खिडक्या आहेत. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपाच्या भिंतींवर वरच्या भागात सूरसुंदरींची उठावशिल्पे आहेत. छतावर मोठे बिलोरी झुंबर टांगलेले आहे.
मंदिराच्या अंतराळासमोर नंदीची काळ्या पाषाणात कोरलेली मोठी व सुबक मूर्ती आहे. त्यासमोर काळ्या पाषाणातील कूर्मशिल्प आहे. अंतराळाच्या दर्शनी भागात असलेले कोरीव स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. यातील मधल्या दोन स्तंभांच्या वर वीणावादक सूरसुंदरींची दोन उंच शिल्पे आहेत.
अंतराळातील उजवीकडील देवकोष्टकात हनुमानाची, तर डावीकडे गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहास मराठा स्थापत्यशैलीची छाप असलेले त्रिशाखीय दगडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प आहे. द्वारचौकटीच्या मंडारकावर अर्धचंद्रशिला व कीर्तिमुखे आहेत. गर्भगृहात भूतलावर चांदीच्या नक्षीदार शाळुंकेमध्ये पाषाणाचे शिवलिंग विराजमान आहे.
या शिवलिंगावर चांदीचा नागफणा व त्याच्या वरच्या बाजूस चांदीची गलंतिका आहे.
गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील देवळीत पार्वतीमातेची मूर्ती विराजमान आहे. या देवळीच्या डाव्या बाजूस वरच्या भागात शंकराचा चांदीचा मुखवटा ठेवलेला आहे. सण-उत्सवादी विशेष प्रसंगी हा मुखवटा शिवलिंगावर ठेवण्यात येतो. गर्भगृहावर नागर स्थापत्यशैलीतील उरूशृंग प्रकारचे उंच शिखर आहे.
या मंदिरात सकाळी ५.३० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९.३० या काळात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी ६.१५ वाजता, दुपारी ११.३० वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता अशा तीन वेळा आरती होते.
या मंदिरात दर सोमवारी भाविकांची मोठी वर्दळ असते. महाशिवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव असतो.
गेल्या २८ वर्षांपासून येथे महाशिवरात्रीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या काळात येथे रोज रात्री ८ ते १० या काळात कीर्तन होते.
आठव्या दिवशी सकाळी १० वाजता येथे काल्याचे कीर्तन आयोजित केले जाते आणि त्यानंतर दुपारी १२ ते ३ या काळात महाप्रसाद असतो. याशिवाय मंदिरात विविध हिंदू सण-उत्सवही उत्साहाने साजरे केले जातात.