मंगेश मंदिर

प्रियोळ, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’ या ‘महानंदा’ चित्रपटाकरीता शांता शेळकेंनी लिहिलेल्या व उषा मंगेशकर, राणी वर्मा यांनी गायलेल्या अजरामर गीताने संपूर्ण महाराष्ट्रास परिचित झालेला मंगेश हे गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय दैवत होय. मंगिरीश वा मंगेश या नावाने विराजमान असलेल्या महादेवाचे येथील देवस्थान हे गोव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक संचित मानले जाते. या मंदिरात रोज शेकडो भाविक तसेच देश-विदेशातील पर्यटक दर्शनासाठी येतात. पंडित नेहरूंनी येथे येऊन मंगेशाचे दर्शन घेतले होते.

इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर रचण्यात आलेल्या व स्कंद पुराणांतर्गत असलेल्या सह्याद्री खंडात ‘मांगीशमाहात्म्य’ कथन केले आहे. त्यातील आख्यायिका अशी की एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती हे द्यूत खेळत होते. त्यात पार्वतीचा विजय झाला. तेव्हा तीने कठोर शब्दांनी शंकराची खिल्ली उडवली. ते शब्द ऐकून शंकरास फार कष्ट झाले व त्यांनी स्थानत्याग करण्याचा निर्णय घेतला. तेथून निघून ते कृष्णा-वेण्णाच्या संगमावर संगमेश्वर येथे आले. तेथे ते तप करू लागले. नंतर परशुरामाने स्थापन केलेल्या भूमीत राहावे, असे ठरवून ते तेथे राहू लागले. दरम्यान, गंगेसह शंकर स्थान सोडून गेल्याने पार्वती दुःखी झाली. तेव्हा सख्यांनी तिला शंकराचा शोध घे, असे सांगितले. या काळात शंकर रामेश्वर, हरिहरेश्वर येथे वास करून गोमंतक पर्वतावर आले.

इकडे पार्वतीमाता महादेवास सर्वत्र शोधत शोधत अघाशी नदीच्या पश्चिम तीरावर पोचली. तेथे तिने शंकराची आराधना केली. त्यावेळी पार्वती नदीत स्नानास गेली असता अचानक तिच्यासमोर एक वाघ आला. शंकरानेच त्या वाघाचे रूप धारण केले होते. त्याचे अक्राळविक्राळ रूप पाहून पार्वती घाबरली व तिने ‘त्राही माम् गिरीश’ म्हणजे ‘हे गिरीशा, मला वाचव’ असा धावा केला. परंतु भयव्याकुळतेमुळे तिच्या मुखातून केवळ माम् गिरीश वा मांगीश असे शब्द बाहेर पडले. ते ऐकून भगवान शंकरांनी व्याघ्ररूप टाकून शिवरूप धारण केले. यानंतर काही काळ येथे वास्तव्य करून शंकर-पार्वती कैलासास परतले. जाण्यापूर्वी पार्वती मातेच्या इच्छेनुसार, शंकराने येथे मांगीश या नावाने शिवलिंग स्थापन केले. हे स्थान म्हणजे कुशस्थली होय व मांगीशचेच पुढे मंगेश झाले. अन्य एका नामस्पष्टीकरण कथेनुसार, पार्वतीने उच्चारलेल्या ‘माम् गिरीश’ या शब्दाचे अपभ्रंशरूप मांगरीश असे झाले व त्याचेच पुढे मंगेश असे रूप झाले. या स्थळाविषयीची आणखी एक कथा सह्याद्री खंडात आहे. ती अशी की कनौज देशी देवशर्मा नावाचा वत्सगोत्री ब्राह्मण राहात असे. तो पत्नीसह तीर्थयात्रा करीत चालला असता अघाशी नदीजवळ पोचला व तेथे वास्तव्य करू लागला. एकदा त्यास येथे अत्यंत अद्‌भत असे दृश्य दिसले. दुपारच्या वेळी या नदीत एका गाईने प्रवेश केला व पाण्यात बुडूनसुद्धी ती पुन्हा बाहेर आली. हे काय घटीत आहे याचा शोध त्याने सुरू केला व एकदा ती गाय पाण्यात जाऊ लागली तेव्हा तिची शेपटी धरून तो पाण्यात गेला. तेथे त्याला शंकराच्या तेजोरूप लिंगाचे दर्शन झाले. त्या लिंगावर त्या गोमातेने दुग्धाभिषेक केला. त्या ब्राह्मणानेही शंकराची प्रार्थना केली. ते मांगीशाचे लिंग होते. कालांतराने ते ईश्वरेच्छेने पाण्याबाहेर आले. या देवशर्मा ब्राह्मणाची ग्रामपुरूष म्हणून पूजा केली जाते.

या विषयीच्या अन्य एका आख्यायिकेनुसार, कुशस्थलीतील मंगेशाच्या लिंगाभोवती कालांतराने जंगल माजले व ते लिंग मातीत गाडले गेले. यास अनेक वर्षे लोटली. येथे काही गोपालक आपली गाईगुरे चरण्यासाठी आणत असत. एकदा एका गोपालकास येथे अद्‌भूत दृश्य दिसले की एक गाय आपल्या कळपापासून दूर जाऊन विशिष्ट स्थानी पान्हा सोडत होती. ही बाब त्याने देवशर्मा या ब्राह्मणास सांगितली. त्याने येथे येऊन शोध घेतला. खोदकामात त्यांना एक शिवलिंग सापडले. लोकांनी तेथे छोटेसे मंदिर बांधले व या शिवलिंगाची ते पूजा करू लागले. ज्या गोपालास प्रथम ते दृश्य दिसले, त्यास आता प्रियोळ येथील मंगेशाच्या परिवार दैवतांत स्थान देण्यात आले आहे. येथे त्याची मूलकेश्वर या नावाने पूजा केली जाते.

मंगेश देवालयाचे आद्यस्थान हे अशा प्रकारे कुशस्थली (हल्लीचे कुठ्ठाळ) येथे होते. असे सांगण्यात येते की येथील देवालय अत्यंत वैभवशाली होते. मंदिरात सोन्याचांदीचे दागदागिने, भरजरी रेशमी वस्त्रे अशा नानाविध मौल्यवान वस्तू होत्या. देवालयातील मोठ्या घंटा चांदीच्या मोठ्या साखळदंडांना टांगलेल्या होत्या. पोर्तुगीज आक्रमणानंतर या देवालयावर संकट आले. २८ फेब्रुवारी १५१० या काळ्या दिवशी गोवा बेटात पोर्तुगीज आरमार अवतरले आणि या भूमीच्या दुर्दशेस प्रारंभ झाला. धर्मांध पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदू-मुस्लिमांस बाटवण्यास सुरूवात केली. येथील देवस्थानांवर त्यांची वक्रदृष्टी वळली. पोर्तुगालच्या राणीने लिस्बन येथून २६ मार्च १५५९ रोजी एक फर्मान जारी केले. त्यानुसार यापुढे गोवा बेट व संलग्न बेटांत हिंदूंची देवालये असणार नाही. त्यातील मूर्ती कोणत्याच घरात वा बाहेर असता कामा नयेत. त्या संपूर्णपणे उद्‌ध्वस्त करून जाळून टाकण्यात याव्यात. या हुकूमाने येथील बिगर ख्रिश्चनांना त्यांची धार्मिक कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली. या परिस्थितीत पोर्तुगीज धर्मगुरू आणि सैनिकांची वाकडी नजर कुठ्ठाळवर लवकरच वळणार हे पाहून मंगेशाच्या कुळाव्यांनी एक गुप्त बैठक घेतली. शेजारील अंत्रुज प्रांतात मंदिरास सुरक्षितता लाभेल या खात्रीने गावातील लोकांनी तेथे मूर्तींचे स्थलांतर करण्याचे ठरविले. मंगेशाच्या शिवलिंगासह परिवार देवतांच्या मूर्ती वा प्रतिके बरोबर घेऊन गावकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात गुपचूप अंत्रुज प्रांताचा रस्ता धरला. होडीने नदी ओलांडून ते मडकईच्या तीरावर आले व तेथून ती मूर्ती प्रियोळमधील हाडिये या खेड्यातील मंगेशी वाड्यावर आणली. ही घटना इ.स. १५६० मध्ये घडली. इतिहासाचार्य विनायक नारायण शेणवी धुमे यांचा असा कयास आहे की त्या वर्षीच्या कार्तिक शुक्ल द्वादशीची रात्र व त्रयोदशी या दिवशी हे स्थलांतर झाले असावे. त्याच प्रमाणे प्रियोळमध्ये १५६१ मध्ये माघ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी मंगेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी. याच तिथीला येथे मंगेश देवस्थानचा वार्षिक महोत्सव साजरा केला जातो.

येथील देवस्थान स्थापनेच्या ज्ञात इतिहासानुसार, इ.स. १७४४ आणि १८९० मध्ये या देवालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुढे पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्यानंतर हे देवालय पुरातन वास्तू म्हणून जाहीर केले. १९७०मध्ये देवालयाची वास्तू मंदिर समितीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पुन्हा देवालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला. १७ फेब्रुवारी १९७३ रोजी हे जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाले. त्यावेळी गौडपादाचार्य संस्थान, कैवल्यपूरचे मठाधीश सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले.

गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात या मंदिरास महत्त्वाचे स्थान आहे. कवी सुबानंत, तसेच विठ्ठल कृष्ण कायकिणी यांनी याच मंदिरात बसून श्रीमांगीश माहात्म्य लिहिले. याच प्रमाणे महेश्वरशास्त्री सुखठणकर यांनी ‘मांगिरिशाष्टकम्’च्या लेखनास येथेच प्रारंभ केला. या मंदिरात शिवस्तुती केली जात असे. त्यातूनच येथे संगीताची मोठी परंपरा निर्माण झाली. येथील उत्सवांतील सांगितिक कार्यक्रमांसाठी मोठमोठ्या गायक-कलावंतांना येथे पाचारण केले जात असे. या मंदिराचा आणि मंगेशकर घराण्याचा निकटचा संबंध होता. भारतरत्न लता मंगेशकर यांचे वडिल मास्टर दिनानाथांचा जन्म मंगेशाची पूजा करणाऱ्या सेवेकऱ्यांपैकी अभिषेकी नामक ब्राह्मण घराण्यात २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. त्यांना संगीताचे बाळकडू येथूनच प्राप्त झाले. देवालयातील मंत्र, गायनातून त्यांच्यावर बालपणी संगीत संस्कार झाले. या देवालयात येऊन अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी, अगणित साधुसंतांनी मंगेशाचे दर्शन घेतले आहे. यात भारताचे तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच स्वामी विवेकानंद यांचा समावेश आहे.

निसर्गरम्य वातावरणात, उंच जागेवर हे मंदिर वसले आहे. मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर प्रसाद साहित्याबरोबरच मूर्ती, कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांची मोठी रांग आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर डावीकडे मोठी पुष्करणी आहे. काही पायऱ्या चढून, मंदिराच्या महाद्वारातून प्राकारात प्रवेश होतो. येथे मंदिराच्या सन्मुख कालभैरवाचे मंदिर आहे. डावीकडे अतिभव्य असा आठ स्तरीय अष्टकोनी दीपस्तंभ आहे. हा गोव्यातील सर्वांत उंच दीपस्तंभ असल्याचे सांगितले जाते. यापुढे मंदिराची भव्य दुमजली वास्तू उभी आहे. गोमंतकीय स्थापत्यशैलीतील या देवालयाची संरचना मुखद्वार, मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. मुखमंडपावर खाली षटकोनी बांधकाम व त्यावर घुमट आणि कलश असलेले शिखर आहे. सभामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे, तर गर्भगृहावर खालचा भाग अष्टकोनी बांधकामाचा, त्यावर घुमट, त्याच्याही वर गोलाकार देवळीसारखी रचना आणि तिच्या घुमटावर कलश अशा प्रकारचे शिखर आहे. मुखमंडप आणि सभामंडपास अनेक कमानदार खिडक्या आहेत. भव्य गोलाकार स्तंभ, उंच वितान, त्यातील काचेच्या हंड्या आणि झुंबरे, जमिनीवरील संगमरवरी चकचकीत फरशा यांद्वारे येथील सभामंडप सुशोभित करण्यात आला आहे. सभामंडपातून पुढच्या बाजूला डाव्या आणि उजव्या दिशेला दोन प्रवेशमंडप आहेत. सभामंडपात नंदीची चांदीचा पत्रा मढवलेली मोठी मूर्ती आहे. त्यापुढे संगमरवरी चौकावर देवशर्मा या ग्रामपुरूषाची मूर्ती आहे.

अर्धमंडपाच्या दर्शनीभिंतीस लागून चांदीच्या मखरात डावीकडे काळ्या पाषाणात घडवलेली गणेशाची, तर उजवीकडे देवी भगवतीची मूर्ती विराजमान आहे. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या उंच देवकोष्ठकांत वैष्णव द्वारपालांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. द्वारचौकटीच्या वरील बाजूस मंगेशाची मोठी प्रतिमा लावलेली आहे व तिच्या बाजूस चांदीत कोरलेल्या नंदिकेश्वराची शिल्पे आहेत. अर्धमंडपातून मंदिराच्या गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. आत अष्टकोनाकार गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार बारीक नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व दोन्ही बाजूंस दोन-दोन नागमूर्ती आहेत. गर्भागृहात मंगेशाचे पुष्पमालांनी सुशोभित शिवलिंग आहे. त्याभोवती नागप्रतिमा आहेत. त्याच्या मागच्या बाजूस एका उच्चासनावर मंगेशाचा मुखवटा प्रतिष्ठापित आहे. दाढी-मिशा, कपाळावर मोत्यांच्या माळा, मस्तकी नागफणा व गंगा अशा स्वरूपात येथे महादेव विराजमान आहेत. या मुखवट्याच्या मागे सोन्याची आणि चांदीची मोठी प्रभावळ आहेत. त्यावर मध्यभागी कीर्तिमुख व विविध शुभचिन्हे कोरलेली आहेत. देवालयाच्या मागच्या, पश्चिमेकडील बाजूस काही अंतरावर एका मंदिरातील एका गर्भगृहात शीलास्वरूपातील मुलकेश्वर विराजमान आहे. त्या बाजूच्या गर्भागारात लक्ष्मीनारायणाची मूर्ती, शीलास्वरूपातील सूर्यनारायण, मूर्तीस्वरूपात गरुडदेव, तसेच लिंगरूपात वीरभद्र व देवी सातेरीचे स्थान आहे.

मंदिरात विविध सण आणि उत्सव विधिवत साजरे केले जातात. चैत्रात रामनवमी, वैशाखात अक्षय्यतृतीया, आषाढात शुद्ध पक्षात श्रीशयन द्वादशी, श्रावणात श्रीकृष्ण जन्माष्टमी, अश्विन नवरात्र, तसेच कोजागरी पौर्णिमा, दीपावली, कार्तिकात शुद्ध प्रतिपदेपासून चौदा दिवसांचा दीपोत्सव, मार्गशीर्षात शुद्ध एकादशीस गीता जयंती आदी उत्सव येथे हर्षोल्हासात साजरे केले जातात. माघ शुक्ल सप्तमी ते माघ पौर्णिमा या काळात भरणारी जत्रा हा येथील मोठा उत्सव. याची सुरूवात सप्तमीला विजयरथाने होते. अष्टमीला हत्ती अंबारी, नवमीला शिबिकोत्सव, दशमीला खांद्यावरील रथ, एकादशीला रौप्य शिबिकोत्सव, द्वादशीला मंदिराच्या तळ्यात नौका विहार, त्रयोदशीला सुखासन, चतुर्दशीला धाकटा रथ, पौर्णिमेला थोरला रथ असे कार्यक्रम होतात. भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये येथे माघ कृष्ण त्रयोदशीला पहाटे चारपासून श्रींच्या अभिषेकास प्रारंभ होतो. तो दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू असतो. या उत्सवांस होणाऱ्या भाविकांच्या गर्दीप्रमाणेच येथे देशविदेशातील पर्यटकांचीही नेहमी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ९ किमी आणि पणजी येथून २२ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • गोव्यातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७६६६४२९८१४, ९४०३१६७७९९
Back To Home