शहापूरमधील माहुली गडाच्या निसर्गरम्य अशा परिसरात ‘शत्रुंजय तीर्थधाम भुवनभानू मानस मंदिर’ स्थित आहे. जैन तीर्थंकर आदिनाथ भगवान हे या मंदिरातील मुख्य दैवत आहेत. एका छोट्याशा टेकडीवरील विस्तीर्ण जागेमध्ये हे आधुनिक आणि पारंपरिक वास्तुकलेच्या संगमातून निर्माण झालेले मंदिर स्थित आहे. परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरातमधील असंख्य भाविकांबरोबरच धार्मिक-पर्यटकांचेही हे एक आकर्षण स्थान आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील क्षेत्रपाल देवता सर्पाच्या स्वरूपात भाविकांना दर्शन देते. ही देवता नवसाला पावत असल्याच्या श्रद्धेमुळे तिच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
भगवान आदिनाथ हे जैन धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर होत. वृषभनाथ किंवा ऋषभनाथ या नावानेही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म अयोध्येत झाला. असे सांगण्यात येते की तत्कालीन समाजाला त्यांनी असि (शस्त्र), मषि (लेखन), कृषि, विद्या, शिल्प व वाणिज्य या सहा व्यवहारांचा उपदेश देऊन मार्गदर्शन केले. भारतभूमीला भारत हे नाव ज्यावरून पडले ते चक्रवर्ती भरत व वीरशिरोमणी बाहुबली हे त्यांचे पुत्र होते. वायु, ब्रह्मांड, अग्नि, विष्णु, मार्कंडेय, कूर्म, लिंग, वराह, स्कंद
तसेच भागवत या वैदिक पुराणांमध्येही आदिनाथांचा निर्देश आहे. तेथे त्यांचा परमहंस, अवधूत, योगी जटाधारी असा उल्लेख केलेला आहे. शहापूर येथील मानस मंदिरात आदिनाथ भगवान यांच्यासह विविध तीर्थकरांचीही मंदिरे व मूर्ती आहेत. या दृष्टीने मानस मंदिर हे क्षेत्र म्हणजे एक मंदिर संकुल आहे. या मंदिराचा इतिहास असा की आचार्य भूवनभानूसुरीश्वर महाराज यांच्या प्रेरणेतून या मंदिराची उभारणी करण्यात आली. आचार्य भूवनभानूसुरिश्वर महाराज हे श्वेतांबर जैन धर्मियांचे ख्यातकीर्त धर्मगुरू होते. अहमदाबादमध्ये १९ एप्रिल १९११ रोजी जन्मलेल्या आचार्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी दीक्षा घेतली होती. १९७२ मध्ये त्यांना आचार्य ही पदवी मिळाली. दूरदृष्टीचे धर्मनेते म्हणून ओळखले जाणारे आचार्य १९ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी अहमदाबाद येथे कालवश झाले. महाराष्ट्रात मुंबईनजीक पालिताणा सारखे जैन तीर्थ असावे, अशी त्यांची इच्छा होती.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील शत्रुंजय पर्वतावर स्थित असलेले पालिताणा जैन तीर्थ हे जैन धर्मियांचे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. एका उंच टेकडीवर येथे ९०० हून अधिक जैन मंदिरे आहेत. या मंदिरांना टुंक असे म्हटले जाते. येथे सर्वांत उंच स्थानी तीर्थंकर भगवान आदिनाथ यांचे मंदिर आहे. जैन धार्मिक श्रद्धांनुसार, येथील मंदिरे ही भगवानांची निवासस्थाने आहेत. येथे ते रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी रात्री पुजाऱ्यांसह कोणासही थांबण्याची परवानगी नाही. या पवित्र पालिताणा तीर्थाच्या धर्तीवर हे मानस मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या उभारणीत जैनाचार्य विजय हेमरत्नसुरीश्वर महाराज यांचे मोठे योगदान आहे.
गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातील भालक या गावी १६ एप्रिल १९५१ रोजी जन्मलेल्या विजय हेमरत्नसुरीश्वर महाराजांचे मूळचे नाव मनुभाई ताराचंदभाई पटवा असे होते. आचार्य भुवनभानूसुरीश्वर महाराज हे त्यांचे शिक्षा विद्याप्रदाता होते. १९९६ मध्ये हेमरत्नसुरीश्वर महाराजांना आचार्यपद प्राप्त झाले. जैन युवकांसाठीच्या ‘ॲलर्ट ग्रुप’ची स्थापना त्यांनी केली होती. युवाहृदयसम्राट म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. शहापूर येथील टेकडीवरील ही जागा त्यांनीच निश्चित केली होती आणि त्यांच्या प्रयत्नांतून येथे हे मंदिर संकुल साकारले. पालिताणा तीर्थ हे शत्रुंजय पर्वतावर स्थित असल्याने येथील मंदिरासही शत्रुंजय तीर्थधाम असे संबोधले जाते.
विस्तीर्ण जागेवर वसलेल्या या मंदिरास चारी बाजूंनी मोठी आवारभिंत आहे. आवाराच्या प्रवेशद्वारावरूनच या मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. रुंद असे मुख्य आणि दोन उपमार्ग असलेल्या या प्रवेशद्वाराच्या छतावर तीन मोठी देवळ्यांसारखी देवकोष्टके आहेत. त्यात तीर्थंकरांच्या छोट्या मूर्ती विराजमान आहेत. मोठमोठे वृक्ष, कलात्मकरीत्या बनवलेले बगीचे, त्यात कारंजी अशा या आवारात प्रवेश करताच डाव्या बाजूस भक्त निवासाची तीन मजली इमारत आहे. त्यासमोर पेव्हर ब्लॉक्स लावलेले मैदानासारखे प्रांगण आहे. उजवीकडे मानस वाटिका हे सुंदर उद्यान आहे. येथून पुढे बऱ्याच अंतरावर मुख्य मंदिर आहे. जैन मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे संगमरवरी पाषाणाचा वापर, त्यात कोरलेले स्तंभ, त्यावरील मकरतोरणे, दगडी छत्र्या, बारीक नक्षीकाम, द्वारपाल आणि परिचारकांची, तसेच समृद्धीचे प्रतीक असलेल्या गजराजांची देखणी शिल्पे, त्याचप्रमाणे सभामंडपावरील घुमटाकार आणि गर्भगृहावरील नागर स्थापत्य शैलीत बांधलेली शिखरे. या सर्व वैशिष्ट्यांनी येथील सर्व मंदिरे संपन्न आहेत. हे मंदिर संकुल उंच टेकडीवर बांधलेले असल्यामुळे येथे ठिकठिकाणी वर जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या बांधलेल्या आहेत.
मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी अनेक पायऱ्या असलेला रुंद मार्ग आहे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी मंदिरे (देवकुलिका) आहेत. या मंदिरांमध्ये विविध परिवार देवतांच्या मूर्ती आहेत. अत्यंत लांब आणि रुंद अशा जगतीवर भगवान आदिनाथाचे मंदिर उभारलेले आहे. पांढऱ्या संगमरवरी पाषाणातील या मंदिरास नक्षीदार स्तंभांवर आधारलेले असे तीन मुखमंडप आहेत. मुख्य मुखमंडपाच्या छतावरील देवळीत गणेशाची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या सभामंडपास एक मुख्य आणि दोन उप अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. या तिन्ही प्रवेशद्वारांच्या द्वारस्तंभांवर विविध धार्मिक प्रतिके कोरलेली आहेत व तळाकडील बाजूस द्वारपाल आणि परिचारिकांची सुंदर शिल्पे आहेत. मध्यभागी असलेले मुख्य प्रवेशद्वार रुंद आहे व त्यास ‘मोक्षद्वार – शृंगारचौकी’ असे म्हणतात. त्याच्या डावीकडील प्रवेशद्वारास ‘पुण्यद्वार’, तर उजवीकडील प्रवेशद्वारास ‘धर्मद्वार’ असे नाव दिलेले आहे. मंदिराचा सभामंडप शब्दशः भव्य असा आहे. त्यावरील ७६ फूट रुंदीचा घुमट आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास एकही खांब नाही. या घुमटावर सुंदर कोरीव काम आहे व त्याच्या मधोमध बिलोरी काचेचे झुंबर लटकवलेले आहे. वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या सभामंडपाकडे पाहिले जाते. सभामंडपाच्या भिंतीलगतच्या विविध सोनेरी देवकोष्टकांत जैन तीर्थकरांच्या, तसेच परिवार देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत. सभामंडपातील आणखी एक आकर्षण म्हणजे येथील हत्तीचे शिल्प. या हत्तीवरील अंबारीत जैन देवता विराजमान आहेत. मंदिराच्या गर्भगृहात उंच वेदीवर भगवान पार्श्वनाथांची पद्मासनातील उंच संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
मुख्य मंदिराशिवाय येथे मुलनायक शांतीनाथ भगवान यांचे मंदिर, तसेच समवसरण मंदिरही आहे. मानस मंदिरात येणाऱ्या असंख्य भाविकांचे आणखी एक श्रद्धास्थान म्हणजे येथील भगवान पार्श्वनाथांचे तसेच क्षेत्रपालदादा मंदिर. क्षेत्रपाल ही लोकदेवता भैरवस्वरूप आहे. या मंदिरात सर्प आणि मयूरशिल्पे कोरलेल्या एका उंच वेदीवर क्षेत्रपालाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मखराच्या स्तंभांवरही वेटोळे घातलेल्या सर्पाकृती कोरलेल्या आहेत. क्षेत्रपालाची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. या मूर्तीवर सात फण्यांच्या नागराजाने छत्र धरलेले आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार सर्प आहेत व ती श्वान या वाहनावर विराजमान आहे. क्षेत्रपाल ही संकटनिवारक देवता मानली जाते. या मंदिराच्या मागच्या बाजूस मोठा प्राचीन वटवृक्ष आहे. क्षेत्रपालास नवस केलेले भाविक या वटवृक्षाच्या पारंब्यांना लाल सुती कापडात बांधलेला नारळ टांगतात. अशा नारळांनी या वटवृक्षांचा खालचा भाग लाल झालेला आहे. येथे क्षेत्रपाल देवता अनेकदा सर्पाच्या स्वरूपात दर्शन देते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
याचप्रमाणे मानस मंदिराच्या आवारामध्ये आचार्य भुवनभानूसुरीश्वर महाराज यांचे गुरुमंदिरही आहे. चारी बाजूंनी खुल्या असलेल्या मंडपाच्या मधोमध उभारलेल्या नक्षीदार मखरासारख्या गर्भगृहामध्ये भुवनभानूसुरीश्वर महाराज यांची बैठी मूर्ती विराजमान आहे. याच प्रमाणे येथे विजय हेमरत्नसुरीश्वर महाराजांचे समाधीस्थळही आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी नडियाद येथे ३० एप्रिल २००९ रोजी ते कालवश झाले. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अग्निदाह संस्कार करण्यात आला होता.
या मंदिर परिसरात भक्तांसाठी विश्रामाची, तसेच भोजनालयाचीही व्यवस्था आहे. त्याच प्रमाणे येथे मोठी गोशालाही आहे. मंदिरात पर्युषण पर्व, महावीर जयंती, तसेच दिवाळी हे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करण्यात येतात.