मल्लिकार्जुन मंदिर

विलासगड (येडे निपाणी), ता. वाळवा, जि. सांगली

जेथे जेथे यादवांची सत्ता होती तेथील गडांवर आवर्जून शिवमंदिरे आढळतात. राजे, सरदार, प्रशासकीय अधिकारी, राजगुरू राजपुरोहित यांची ती श्रद्धास्थाने होती. राजाश्रयप्राप्त या मंदिरांची पूर्वीची रया पुढे लुप्त होत गेली तरीही लोकश्रध्देने या मंदिरांचे अस्तित्त्व टिकवून ठेवलेले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येडेनिपाणी गावाजवळील विलासगड किल्ल्यावर असेच एक प्राचीन मंदिर आहे. गडावरील डोंगर गुहेत असलेले मल्लिकार्जुनाचे हे मंदिर शेकडो वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहे ते केवळ लोकश्रद्धेमुळेच.

शिवपुराणातील श्रीकोटीरुद्र संहितेच्या १५व्या अध्यायात मल्लिकार्जुनाची आख्यायिका सांगितलेली आहे ती अशी की एकदा शिवपार्वतीने आपल्या गणेश कार्तिकेय या दोन्ही मुलांना पृथ्वी परिक्रमा करण्यास सांगितले. कार्तिकेय परिक्रमेवरून परतत असताना त्यांना वाटेत नारद भेटले. नारदाने त्यांना सांगितले की तुझ्या मातापित्याने तुला परिक्रमेस पाठवून पाठीमागे तुझ्या छोट्या भावाचा विवाह लावून दिला आहे. ते ऐकून कार्तिकेय संतापले. कैलास पर्वतावर येऊन, आईवडिलांशी वाद घालून ते क्रौंच पर्वतावर निघून गेले. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवपार्वती तेथे गेले असता कार्तिकेय तेथूनही अन्यत्र गेले. तेव्हा शिवपार्वतीला दुःख झाले ते तेथेच ज्योतिर्मय रूप धारण करून राहू लागले. त्या पवित्र लिंगास मल्लिका (पार्वती) अर्जुन (शिव) यांच्या एकत्र नावाने ओळखले जाऊ लागले.

विलासगड येथील मल्लिकार्जुनाच्या स्थानाबाबत आख्यायिका अशी की हजारो वर्षांपूर्वी अगस्त्य ऋषी आपल्या परिवारासह येथील गुहांमध्ये वास्तव्यास होते. त्या वेळी त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली. या मंदिराच्या सभामंडपाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम तेराव्या शतकातील (यादवकालीन) असल्याचे सांगितले जाते. अलीकडील काळात मंदिराच्या तटबंदीत स्वागतद्वाराच्या बाजूला एक तीनशे वर्षापूर्वीचा शिलालेख सापडला. त्यावर या मंदिराच्या भिंतीचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. हे मंदिर असलेला विलासगड किल्ला हजार वर्षे पुरातन आहे. नंतर हा किल्ला आदिलशाहच्या ताब्यात होता. .. १७१७ मध्ये हा किल्ला कोल्हापूरचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या ताब्यात आला. १७९८ साली गडाचा जीर्णोद्धार करण्याचा ठराव केल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळी या गडाचा वापर टेहळणीसाठी केला जात असे

किल्ल्यावर जाण्याकरीता डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत घडीव दगडात बांधलेल्या पायऱ्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आहेत. या पायरी मार्गावर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. कातळात खोदलेल्या प्राचीन पायरी मार्गावरच या नव्या पायऱ्या बांधल्या असल्याचे सांगितले जाते. या मार्गाच्या दोन्ही बाजूस डोंगरावर दाट झाडी आहे. पायरी मार्गाने वर पोहोचताच पेव्हर ब्लॉक लावलेले सपाट मैदान आहे. मैदानाच्या एका बाजूला मंदिराच्या तटबंदीची भिंत आहे. येथील गुहा वगळता मंदिराचे संपूर्ण बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे

मंदिराच्या प्रवेशद्वारास सात पायऱ्या आहेत. येथून पुढे मंदिराचे फरसबंदी प्रांगण आहे. प्रांगणात प्रवेशद्वारासमोर चौथरा त्यावर पाषाण स्तंभ आहे. बाजूला तुलसी वृंदावन आहे. तुलसी वृंदावनाच्या शेजारी एका चौथऱ्यावर दोन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेच्या चौकोनी पायाच्या चारी दिशांना चार गजशिल्पे आहेत दीप प्रज्वलन करण्यासाठी २४ स्वतंत्र हस्त आहेत. या दीपमाळेवर वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला दीप प्रज्वलन केले जाते. पुढे मंदिराचे दोन मुखमंडप आहेत

सभामंडपात डाव्या बाजूस भिंतीलगत देवकोष्टकात सती शिळेसारखे दिसणारे सासुरवाशीण शिल्प आहे. असे सागितले जाते की एक देवभक्त सासुरवाशिण या ठिकाणी गुप्त झाली होती. या शिल्पाच्या बाजूला देवकोष्टकात कोटलिंग (शिवपिंडी) आहे. या शिवपिंडीवर अत्यंत लघु आकारातील एक कोटी लिंगे असल्याचे सांगण्यात येते. या पुढील देवकोष्टकात भीमाशंकर उमा शंकर नावाने ओळखले जाणारे पिंडीच्या आकारातील दोन पाषाण समोर त्रिशूल आहेत. देवकोष्टकासमोर काळ्या पाषाणात पाचफणी नागाचे शिल्प वज्रपिठावर शेंदूर लावलेली नंदीची लहान मूर्ती आहे. एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताची तीन बोटे वापरून ही मूर्ती उचलल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुढे स्तंभाजवळ ऋषिकेश मूर्ती बाजूला देवकक्षात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. कार्तिक स्वामींच्या कक्षाबाहेर जमिनीवर मोठी सहाण त्यावर चंदनाचे मोठे खोड आहे. या सहाणेवर चंदन उगाळून पहाटे सर्व देवांना चंदनउटी लावली जाते

पुढे गर्भगृहाचे नक्षीदार प्रवेशव्दार आहे. द्वारशाखा ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणेशशिल्प आहे. प्रवेशद्वाराची चौकट शेंदूर लावलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर सोमनाथाची स्वयंभू शिवपिंडी आहे. या पिंडीखाली जमिनीत पाषाणरुपी कासव असल्याचे सांगितले जाते. बाजूला वज्रपिठावर इतर देवतांचे पाषाण आहेत

या गर्भगृहाच्या समोरच्या बाजूला मल्लिकार्जुनाचे मुख्य गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारासमोर मखरात गणेश पाचफणी नाग यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मल्लिकार्जून शिवलिंग आहे. ही शिवपिंडी अगस्त्य ऋषींनी स्थापन केली असल्याची मान्यता आहे. गर्भगृहाच्या बाजूच्या कक्षात वज्रपिठावर काळ्या पाषाणातील मान वळवलेल्या नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या मागील भिंतीवर सप्तमातृकापट कोरलेले आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या द्वारातून गुहेतील कक्षात जाता येते. येथील कक्षात मल्लिकार्जुनाची पिंडी आहे. मंदिराच्या बाजूला बसवेश्वर मंदिरात नंदीची मूर्ती आहे. येथेच स्वयंपाक घर आहे त्यात देवाच्या नित्य प्रसादाचा स्वयंपाक शिजवला जातो. येथील नंदीला प्रसादाचा गंध पोहोचला की सर्व देवांना प्रसाद पोचतो, अशी मान्यता आहे.

मंदिराच्या डाव्या बाजूस काळभैरवनाथांचे लहान मंदिर आहे. येथील प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेश शिल्प प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दोन अश्वमुख आहेत. मंदिरात वज्रपिठावर भैरवनाथ, काळभैरव, जुगाई जानाई या देवतांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत

मंदिरापासून काही अंतरावर बाजूंनी कठडा असलेली पातळगंगा गुफा विहिर आहे. त्यातील पाण्याचा वापर येथे पिण्यासाठी केला जातो. विहिरीत उतरण्यासाठी खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या विहिरीपासून काही अंतरावर आत तीन शिवपिंडी काही प्राचीन पाषाण असलेले लहानसे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेल्या मंदिरावर शिखर कळस आहे. मंदिरासमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. श्रावणात महिनाभर भाविकांची देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. वार्षिक उत्सवांचे वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत महाप्रसादाचे आयोजन केले जाते

उपयुक्त माहिती

  • वाळवा शहरापासून १२ किमी, तर सांगलीपासून ३७ किमी अंतरावर
  • वाळवा, इस्लामपूर कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायरीमार्गाजवळ येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
Back To Home