मल्लिकार्जुन मंदिर

श्रीस्थळ, ता. काणकोण, जि. दक्षिण गोवा

गोव्याच्या अगदी दक्षिणेकडील भागात, कर्नाटक सीमेनजीक काणकोण हा तालुका आहे. कण्व मुनींच्या वास्तव्यामुळे त्याला काणकोण नाव प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या तालुक्यात श्रीस्थळ या रम्य स्थळी प्रशस्त परिसरात मल्लिकार्जुन मंदिर वसले आहे. गोव्यातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक असलेल्या या मंदिरात मल्लिकार्जुनाचे स्वयंभू लिंग आहे, असे सांगण्यात येते. या मंदिर परिसरात साठहून अधिक देवतांची स्थाने आहेत. या मंदिरात शीर्षारान्नी आणि वीरामेळ हे आदिवासी संस्कृतीतील आगळेवेगळे उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे.

‘शिवपुराणा’तील श्रीकोटीरुद्र संहितेच्या १५व्या अध्यायात मल्लिकार्जुनाची आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशी की एकदा शिव-पार्वतीने आपल्या गणेश व कार्तिकेय या दोन्ही मुलांना पृथ्वीपरिक्रमा करण्यास सांगितले. कार्तिकेय परिक्रमेवरून परतत असताना त्यांना वाटेत नारद भेटले. नारदाने त्यांना सांगितले की तुझ्या माता-पित्याने तुला परिक्रमेस पाठवून पाठीमागे तुझ्या छोट्या भावाचा विवाह लावून दिला आहे. ते ऐकून कार्तिकेय संतापले. कैलास पर्वतावर येऊन त्यांनी आई-वडिलांशी वाद करून ते क्रौंच पर्वतावर निघून गेले. त्यांची समजूत काढण्यासाठी शिव-पार्वती तेथे गेले असता कार्तिकेय तेथूनही अन्यत्र गेले. तेव्हा शिव-पार्वतीला दुःख झाले व ते तेथेच ज्योतिर्मय रूप धारण करून राहू लागले. त्या पवित्र लिंगास मल्लिका (पार्वती) व अर्जुन (शिव) यांच्या एकत्र नावाने ओळखले जाऊ लागले.

येथील मंदिरातील ‘शमीपत्रा’मध्ये काणकोणचा कण्वपूरम, क्रौंचक्षेत्र, क्रोंचपूर तसेच अडवट या नावांनीही उल्लेख आढळतो. येथील मल्लिकार्जुनाच्या स्थानाबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथील एका शेतकऱ्याची एक काळी गाय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन पान्हा सोडायची. एकदा त्या शेतकऱ्याला मल्लिकार्जुनाचा स्वप्नदृष्टांत झाला की ‘मी त्या विशिष्ट ठिकाणी आहे, मला बाहेर काढ.’ त्याने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर एके रात्री सर्व गावकऱ्यांना तसेच स्वप्न पडले. तेव्हा मात्र गावकऱ्यांनी ती गाय जेथे पान्हा सोडत असे त्या ठिकाणी खोदकाम केले. तेथे त्यांना स्वयंभू पिंडी सापडली. त्यानंतर गावात काही दिवसांनी एका साधुचे आगमन झाले. या शिवपिंडीचे नाव मल्लिकार्जुन असल्याचे त्याने सांगितले. गावकऱ्यांनी नंतर येथे मल्लिकार्जुनाचे छोटे मंदिर उभारले. ‘मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर महापती’ अशा भारदस्त नावाने हे मंदिर ओळखले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर या गावानजीक असलेल्या प्रचितगडावरील काही कुटुंबे काही कारणांमुळे काणकोण येथे स्थलांतरित झाली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या या आराध्यदैवताचे मंदिर उभारले.

गोवा गॅझेटियरमध्येही या मंदिराविषयीची नोंद आहे. त्यात असे म्हटले आहे की हे मंदिर हब्बू ब्राह्मणांनी उभारले होते. धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागातील प्राध्यापक एन. के. काडेतोताड यांच्या ‘द अस्लिमेट रिॲलिटी अँड मिनिंग ऑफ द सिद्दीज ऑफ नॉर्थ कॅनरा’ या शोधनिबंधानुसार, कर्नाटकात हब्बू ब्राह्मण आणि हब्बू वोकल्लिग या जातीचे लोक आहेत. ॲबिसिनियातून येथे आलेले हबशी (ॲबिसेनियन) आणि येथील ब्राह्मण व वोकल्लिग या उच्च जाती यांच्या मिश्रणातून ही जात निर्माण झाली आहे. कोंकणी व कन्नड मिश्रित भाषा बोलणाऱ्या या हब्बू ब्राह्मणांचे महादेव हे आराध्यदैवत आहे. त्यांनी प्राचीन काळात उभारलेले हे मंदिर कालांतराने जीर्ण झाले. त्यानंतर शके १७००मध्ये (इ.स. १७७८) या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या घुमटीवर असलेल्या शिलालेखात याची नोंद आहे.

हे मंदिर डोंगराळ प्रदेशात एका खोलगट भागात वसलेले आहे. छोट्या प्रवेशकमानीपासून मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी सुमारे २८ पायऱ्या उतराव्या लागतात. येथे वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक छोटी-मोठी देवळे आहेत. या परिसरात साठहून अधिक देवतांचे विग्रह (मूर्ती किंवा स्थाने) असल्याचे सांगितले जाते. समोरच मोठ्या प्रांगणात मोठा पिंपळपार आहे. मधोमध सात स्तरांचा भव्य अष्टकोनी दीपस्तंभ आहे. त्या नजीक एका उंच संमगमरवरी चौथऱ्यावर सासणो या लोकदेवतेची अश्वारूढ मूर्ती आहे. सासणो ही रक्षक देवता असून तिचे हे रूप मूर्तीच्या हाती असलेल्या ढाल-तलवारीतून दृगोचर होते. याच्या जवळच तुलसी वृंदावन आहे. मुख्य मंदिराच्या प्राकारात जाण्यासाठी येथूनही २५ पायऱ्या उतराव्या लागतात. या पायरीमार्गावर दोन्ही बाजूंना भारदस्त संगमरवरी कठडे आहेत.

गोमंतकीय स्थापत्य शैलीत उभारलेल्या या मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. छोट्याशा मुखमंडपाच्या पुढच्या दोन्ही स्तंभांवर अश्वारुढ पुरूषाचे मोठे कोरीव शिल्प आहे. पुढचे दोन्ही पाय उंचावलेला अश्व, त्याचे हे उंचावलेले पाय आपल्या हातांनी पेललेला सेवक, अश्वावर स्वार असलेला पुरुष आणि त्याने एका हातात धारण केलेले मोठे खड्‌ग, त्याचप्रमाणे अश्वाच्या खालच्या बाजूस छोटी गजप्रतिमा अशा प्रकारचे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.

मुखमंडपातून अर्धसभामंडपात प्रवेश करण्यासाठी असलेला दरवाजा त्यावर केलेल्या कोरीव कामाने शोभिवंत दिसतो. या ठिकाणी छतावर लाकडी कोरीव काम आहे. सभामंडपात छतापासून भिंतीपर्यत आणि खांबांपासून अंतराळाच्या दर्शनी भिंतीपर्यत सर्व ठिकाणी अतिशय सुंदर अशी चित्रे, मूर्ती आणि लाकडी कोरीव काम दिसते. सभामंडपातील सहा लाकडी खांबांवर पुराणातील प्रसंग कोरण्यात आले आहेत. यातील एका खांबावरील फुलापाकळ्यांच्या नक्षीवरून भविष्य वर्तविले जाते. सभामंडपाच्या भिंतीवर पुराणातील प्रसंग रंगवलेल्या पुरातन कापडी चित्रांच्या तसबिरी लावण्यात आल्या आहेत. छताजवळील देवकोष्टकात अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर लहान लहान शिल्पे कोरलेली आहेत. लाकडी दरवाजाच्या ललाटबिंबस्थानी श्रीशंकराची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर चांदीच्या पत्र्याची महिरप असून गर्भगृहात स्वयंभू लिंग स्थापित आहे. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीवर चांदीच्या महिरपीत मल्लिकार्जुन-पार्वतीची मूर्ती आहे.

मंदिराच्या उजव्या बाजूस निराकाराचे गोमंतकीय शैलीतील एक छोटे मंदिर आहे. या मंदिरात एका प्राचीन लाकडी स्तंभाच्या रुपातील निराकार स्थापित आहे. पानाफुलांच्या नक्षीने सुशोभित असलेल्या, तसेच शीर्षस्थानी मोदकासारखा आकार असलेल्या या गोलाकार स्तंभावर शिव, पार्वती, गणपती आदी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. येथे छोटी शिवमंदिरे आणि बगिलपैक म्हणजे रक्षक देवतांची मंदिरेही आहेत. अन्य देवळांमध्ये काशी पुरुष मंदिर, पार्श्वराम मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिरांचा समावेश आहे. या परिसरात दोन रथगृहे आहेत. त्यात कोरीव नक्षीकामाने सुशोभित असे लाकडी रथ ठेवलेले आहेत. दीपस्तंभापासून काही अंतरावर भव्य यज्ञगृह आहे. मंदिर परिसरात पुष्करणीही आहे.

मल्लिकार्जुन मंदिरात विविध उत्सव साजरे केले जातात. विजयादशमीला सीमोल्लंघनप्रसंगी एका पुरातन पत्राचे वाचन केले जाते. त्यात काणकोण नावाच्या संदर्भात कण्वपुरम, क्रोंचक्षेत्र, क्रोंचपूर आणि अडवट या प्राचीन नावांचा निर्देश येतो. शिमग्याच्या जत्रोसवानिमित्त येथे दर दोन वर्षांनी एकदा शीर्षारांन्नी व एकदा वीरामेळ हे उत्सव साजरे होतात. शीर्षारांन्नी हा उत्सव फाल्गुन शुद्ध षष्ठीला तर वीरामेळ फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला होतो. वीरामेळ उत्सवात १८ गाडे (भाविक) तलवारींसह, ढोल वाजवत गावफेरी करतात आणि पान-सुपारी मिळवतात. यात युद्धासारखे वारही केले जातात. वीरामेळ हा प्रकार चित्तथरारक आणि भीतीदायक असल्याने महिलांना तो पाहण्यास मज्जाव आहे. या मंदिरातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा उत्सव म्हणजे शीर्षारान्नी. शीर्ष म्हणजे डोके आणि रान्नी म्हणजे रांधणे. या उत्सवात इतर अनेक उपचार पार पडल्यानंतर गाड्यांच्या दंडावर टोकदार सळईने टोचले जाते. त्यास गरा असे म्हणतात. या तिन्ही व्यक्तींना जमिनीवर झोपवण्यात येते आणि त्यांच्या तीन डोक्यांची चूल तयार केली जाते. शिसवी लाकडे वापरून चूल पेटवण्यात येते. त्यावर भांडे ठेवून त्यात तांदूळ शिजवले जातात. या उत्सवांसाठी गोव्यातून तसेच देशाच्या अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

अन्य उत्सवात, महाशिवरात्र हा रात्रभर जागरणाचा उत्सव आहे, ज्यात भजन – कीर्तन, आरती होते. वार्षिक जत्रेत देवाची मूर्ती राजबाग समुद्रकिनारी नेली जाते. तिथे देवाचे स्नानविधी होतात. भक्तही सागरात स्नान करतात. रथसप्तमी आणि शिगमोत्सवात रथयात्रा होते. यावेळी अन्नदान व प्रसाद वाटप होते.

उपयुक्त माहिती

  • काणकोण येथून ६ किमी आणि मडगावपासून ४३ किमी अंतरावर
  • काणकोण येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ ६६८९०५३

मल्लिकार्जुन मंदिर श्रीस्थल,

कैनकन, जि. दक्षिण गोवा

Back To Home